Tooth Sensitivity: चहाचा एक घोट घेताना किंवा फळाचा तुकडा खाताना अचानक दातात कळ येणे (Tooth Sensitivity) ही समस्या अनेकांसाठी त्रासदायक ठरते. बहुतेक लोक यासाठी लगेच ‘सेन्सेटिव्ह टूथपेस्ट’चा वापर सुरू करतात. मात्र केवळ टूथपेस्टने हा प्रश्न सुटत नाही. एशियन हॉस्पिटलमधील डेंटल सर्व्हिसेसचे वरिष्ठ सल्लागार डॉ. झुल्फिकार हाफीझ यांनी दि इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, आपल्या दैनंदिन सवयीच या समस्येसाठी अधिक कारणीभूत असतात.

“मऊ ब्रिस्टल्स असलेला टूथब्रश वापरणे आणि हळुवारपणे दात घासणे ही पहिली महत्त्वाची पायरी आहे,” असे डॉ. हाफीझ सांगतात. “जोरात घासल्यामुळे दातांचे एनेमल (Enamel) घासले जाते आणि डेंटिन उघडे पडते, त्यामुळे दातांची संवेदनशीलता वाढते.”

संवेदनशीलता कमी करण्यासाठी सोप्या सवयी

आंबट पदार्थ खाल्ल्यानंतर काळजी

आंबट किंवा ॲसिडिक पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच दात घासू नका. किमान ३० मिनिटे थांबा आणि त्याआधी पाण्याने चूळ भरा. ॲसिडमुळे मऊ झालेले एनेमल लगेच ब्रश केल्याने खराब होऊ शकते.

माउथ रिन्स आणि लवंग तेल

फ्लोराईडयुक्त माउथ रिन्समुळे एनेमल मजबूत होण्यास मदत होते, तर लवंग तेल तात्पुरता आराम देऊ शकते.

नाईट गार्ड

ज्यांना झोपेत दात खाण्याची (Grinding) सवय आहे, त्यांनी नाईट गार्ड वापरल्यास दातांचे होणारे नुकसान टाळता येते.

एनेमल घरच्या घरी मजबूत करता येते का?

एकदा नष्ट झालेले एनेमल पुन्हा पूर्णपणे तयार होऊ शकत नाही, पण ते अधिक मजबूत नक्कीच करता येते. “कॅल्शियमयुक्त पदार्थ म्हणजेच दूध, पनीर आणि व्हिटॅमिन-डी युक्त आहार घेतल्यास दातांची ताकद टिकून राहते,” असे डॉ. हाफीझ स्पष्ट करतात.

तसंच लाळ निर्मितीसाठी शुगर-फ्री च्युइंगम चघळण्याचा सल्लाही ते देतात. लाळ नैसर्गिकरित्या तोंडातील ॲसिड कमी करते. वारंवार गोड पदार्थ किंवा शीतपेये घेतल्याने एनेमलला स्वतःची दुरुस्ती करण्यासाठी वेळ मिळत नाही.

केव्हा सावध व्हावे?

कधीतरी दात शिवशिवणे सामान्य आहे, पण जर वेदना सतत होत असतील किंवा एकाच विशिष्ट दातात जाणवत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

कधी धोका आहे?

दात दुखणे, छिद्र दिसणे (कॅव्हिटी), हिरड्यांमधून रक्त येणे किंवा हिरड्या खाली सरकणे ही गंभीर समस्या असू शकते. जर हा त्रास एका आठवड्यापेक्षा जास्त काळ टिकला, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

व्यावसायिक उपचार काय आहेत?

डॉ. हाफीझ यांच्या मते, दातांवर फ्लोराईड वॉर्निश, डी-सेन्सेटायझिंग एजंट्स आणि रेझिन सीलंट्स वापरून उघड्या पडलेल्या डेंटिनला सुरक्षित करता येते. हिरड्या जास्त खाली सरकल्या असतील तर गम ग्राफ्ट (Gum Graft) हा कायमस्वरूपी उपाय ठरतो. दातांमधील कीड, दातांची ठेवण नीट करणे किंवा गरज पडल्यास रूट कॅनल करून ही समस्या मुळापासून नष्ट केली जाऊ शकते.