Why Brushing Before Bed is Crucial: अनेकांसाठी सकाळी दात घासणे हीच तोंडाच्या स्वच्छतेतील सर्वात महत्त्वाची सवय वाटते. यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होते, रात्री साचलेला थर साफ होतो आणि दिवसाची सुरुवात ताजेतवाने होते. मात्र, खरा धोका सकाळी नाही तर रात्री निर्माण होत असतो, हे तुम्हाला माहिती आहे का?
अलीकडील एका व्हिडिओमध्ये दंततज्ज्ञ अपर्णा यांनी एक महत्त्वाची पण अनेकदा दुर्लक्षित सवय अधोरेखित केली. रात्री दात न घासणे. त्या म्हणाल्या, “रात्री तुम्ही ब्रश करत नाही, म्हणजे दिवसभर साचलेले अन्नकण तोंडात तसेच राहतात. झोपताना तोंडात लाळ साचून राहते, आपण काही खात-पीत किंवा बोलत नसतो, त्यामुळे तिथे जंतू वाढत राहतात. सकाळी ब्रश केल्यानंतर मिळणारी फ्रेशनेस काही मिनिटांतच निघून जाते.”
यावरून एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो तो म्हणजे अनेक लोक तोंडाच्या स्वच्छतेकडे ‘फ्रेशनेस’ म्हणून पाहतात, ‘प्रतिबंध’ म्हणून नाही.
रात्री तोंडात नेमकं काय घडतं?
आकाश हेल्थकेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील दंतविभागाच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. भूमिका मदान यांनी दि इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, “रात्रीचे ओरल हायजीन अधिक महत्त्वाची असते. “लाळ ही तोंडाची नैसर्गिक स्वच्छता करणारी घटक आहे. ती अन्नकण दूर करते आणि आम्लाचा प्रभाव कमी करते. मात्र झोपेत लाळेचे उत्पादन कमी होते, त्यामुळे हा संरक्षणात्मक प्रभाव घटतो.”
यामुळे तोंडात जंतू वाढण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होते. “ब्रश न करता झोपल्यास अन्नाचे कण दातांवर राहतात, ज्यामुळे जंतू अनेक तास वाढत राहतात आणि आम्ल तयार करतात,” असे डॉ. मदान यांनी सांगितले. दीर्घकाळात हे आम्ल दातांच्या एनॅमलला कमकुवत करून किड लागण्याचा धोका वाढवते.
दिवसातून एकदाच ब्रश पुरेसा आहे का?
“नाही,” असे स्पष्ट उत्तर डॉ. मदान देतात. “सकाळी ब्रश केल्याने तोंड स्वच्छ वाटते, पण रात्री होणाऱ्या जंतूंच्या वाढीला ते थांबवत नाही. काही तासांतच प्लाक पुन्हा तयार होतो. जर तुम्ही दिवसातून एकदाच ब्रश करत असाल, तर दात जास्त वेळ जंतूंच्या संपर्कात राहतात.”
त्या पुढे सांगतात की, जर एखाद्याला दिवसातून एकदाच ब्रश करता येत असेल, तर रात्री ब्रश करणे अधिक गरजेचे आहे. “झोपण्यापूर्वी ब्रश केल्याने दिवसभर साचलेले प्लाक आणि अन्नकण दूर होतात, त्यामुळे ते टाळता येत नाही,” असे त्या म्हणाल्या.
दीर्घकालीन परिणाम काय?
रोज रात्री ब्रश टाळल्यास त्याचे दुष्परिणाम हळूहळू वाढतात. “सुरुवातीला तोंडाची दुर्गंधी आणि प्लाक साचणे दिसते. नंतर हा प्लाक कडक होऊन टार्टरमध्ये बदलतो, जो केवळ ब्रशने निघत नाही आणि त्यासाठी तज्ज्ञांकडून साफसफाई करावी लागते,” असे डॉ. मदान सांगतात.
यामुळे पुढे जाऊन गंभीर समस्या उद्भवू शकतात. “उपचार न केल्यास प्लाक आणि टार्टरमुळे जिंजीव्हायटिस आणि पुढे पेरिओडॉन्टायटिस होऊ शकतो, ज्यामुळे दात गळण्याचा धोका असतो,” असे त्या म्हणतात. याशिवाय, हिरड्यांमधील दीर्घकालीन सूज शरीराच्या इतर आजारांशीही संबंधित असू शकते.
प्रतिबंधावर भर देणे गरजेचे
एकूणच, चांगली ओरल हायजीन ही अधूनमधून केलेल्या डीप क्लिनिंगपेक्षा दररोजच्या सवयींवर अवलंबून असते. “दिवसातून दोनदा, विशेषतः झोपण्यापूर्वी फ्लोराइडयुक्त टूथपेस्टने ब्रश करणे हे तोंडाच्या आरोग्यासाठी अत्यंत सोपे आणि प्रभावी पाऊल आहे,” असे डॉ. मदान यांनी सांगितले.
