Eating Ghee in Morning Health Benefits: बॉलीवूड अभिनेत्रींची चमकदार त्वचा आणि फिट बॉडी पाहून अनेकजण आश्चर्यचकित होतात. पण, त्यांच्या या ग्लोइंग लूकमागे एक साधी, पण प्रभावी सवय लपलेली आहे; सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी एक चमचा तूप खाणे! जान्हवी कपूर, मलायका अरोरा आणि कृती सेनन यांसारख्या अभिनेत्री ही सवय पाळतात. पण, हा फक्त सेलिब्रिटी ट्रेंड आहे की यामागे खरोखरच आरोग्यदायी फायदे आहेत?

आरोग्यतज्ज्ञांच्या मते, तूप हे केवळ चव वाढवणारे नसून शरीरासाठी अत्यंत उपयुक्त पोषक घटकांनी समृद्ध असते. एका मोठ्या चमच्यात साधारण १२३ कॅलरीज असतात. त्यात हेल्दी फॅट, सॅच्युरेटेड फॅट, तसेच व्हिटॅमिन A, E आणि K यांचा समावेश असतो, जे शरीराच्या अनेक कार्यांसाठी महत्त्वाचे मानले जातात. तुपामुळे जेवणाची चव वाढते, शिवाय आरोग्यासही असंख्य फायदे मिळतात. शरीरासाठी आवश्यक असणारे पोषणतत्त्व तुपामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. विशेषतः सकाळी रिकाम्या पोटी तूप खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.

फोर्टिस हॉस्पिटल, वसंत कुंज येथील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट आणि हेपेटोलॉजिस्ट डॉ. शुभम वात्स्य यांच्या मते, “दररोज सकाळी रिकाम्या पोटी योग्य प्रमाणात तूप घेतल्यास पचनक्रिया सुधारण्यास मदत होते आणि शरीराला आवश्यक पोषण मिळते.”

Award Banner

तूप खाण्याचे फायदे

तुपामध्ये ‘ब्युटिरिक अॅसिड’ नावाचा घटक असतो, जो आतड्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतो; त्यामुळे पोटातील सूज, अॅसिडिटी कमी होण्यास मदत होते आणि पचन सुधारते. तसेच तुपातील अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्मांमुळे सांधेदुखी आणि अंगदुखी कमी होण्यास मदत होऊ शकते. तुपातील व्हिटॅमिन्स हाडे मजबूत ठेवण्यासाठी आणि हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात.

विशेष म्हणजे, योग्य प्रमाणात तूप सेवन केल्यास वजन वाढत नाही, उलट भूक नियंत्रणात राहण्यास आणि ब्लड शुगर संतुलित ठेवण्यास मदत होऊ शकते.

तूप खाण्याची योग्य पद्धत

तज्ज्ञांच्या मते, सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा कोमट पाण्यासोबत तूप घेणे सर्वात प्रभावी मानले जाते.
यामुळे तुपातील पोषक तत्वे शरीरात सहजपणे शोषली जातात.
तसेच तूप गरम डाळ-भात किंवा पोळीमध्ये मिसळूनही खाऊ शकता. मात्र, तूप खूप थंड किंवा तळलेल्या स्वरूपात खाणे टाळावे.

जीवनसत्त्वे, निरोगी चरबी आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड सारख्या पोषक तत्वांनी समृद्ध असलेले तूप हे एकंदर आरोग्यासाठी एक सुपरफूड आहे. जर तुम्ही ते मर्यादित प्रमाणात तुमच्या आहारात समाविष्ट केले तर ते अनेक फायदे देऊ शकते. 

लक्षात ठेवा

ही माहिती सर्वसाधारण मार्गदर्शनासाठी असून प्रत्येकाची शारीरिक गरज वेगळी असते, त्यामुळे आहारात कोणताही मोठा बदल करण्यापूर्वी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.