Kidney Stone Prevention Tips: किडनी स्टोन म्हणजेच मूत्रपिंडातील खडे एकदा काढून टाकले की, समस्या कायमची संपते, असा अनेकांचा समज असतो. मात्र तज्ज्ञांच्या मते, हा समज धोकादायक ठरू शकतो. प्रत्यक्षात उपचारानंतरही अनेक रुग्णांना काही वर्षांत पुन्हा खडे होण्याचा त्रास जाणवतो. चुकीचा आहार, कमी पाणी पिण्याची सवय, जास्त मीठ, ऑक्झलेटसयुक्त पदार्थांचे अति सेवन, लठ्ठपणा आणि काही चयापचयाशी संबंधित समस्या यांमुळे खडे पुन्हा तयार होण्याची शक्यता वाढते. योग्य काळजी घेतली नाही, तर पाच वर्षांत ४० ते ५० टक्के रुग्णांमध्ये ही समस्या पुन्हा उद्भवू शकते, असे तज्ज्ञ सांगतात.

खडे पुन्हा तयार होण्यामागचे कारण काय?

मूत्रामधील खनिजे आणि क्षार यांचे प्रमाण वाढले की, ते मूत्रपिंडात स्फटिकांच्या रूपात साचू लागतात. हळूहळू हे स्फटिक मोठे होत जाऊन खड्यांचे रूप धारण करतात. शरीरात पाण्याची कमतरता, कॅल्शियम ऑक्झलेट किंवा युरिक आम्लाचे वाढलेले प्रमाण यांमुळे धोका अधिक वाढतो. जास्त प्रथिनयुक्त आहार, प्रक्रियायुक्त अन्नपदार्थ व अनियमित जीवनशैलीही याला कारणीभूत ठरते.

६० टक्के प्रकरणे टाळणे शक्य

उपचारानंतर अनेक रुग्ण पुन्हा जुन्याच सवयींकडे वळतात. हीच मोठी चूक ठरते. दररोज किमान अडीच ते तीन लिटर पाणी पिणे, मिठाचे प्रमाण कमी ठेवणे व संतुलित आहार घेणे या साध्या सवयी अंगीकारल्या, तर पुन्हा खडे होण्याची सुमारे ६० टक्के प्रकरणे टाळता येऊ शकतात.

‘या’ गोष्टींपासून सावध राहा

अतिरिक्त मीठ : जास्त मिठामुळे मूत्रातील कॅल्शियम वाढते आणि खडे तयार होण्याचा धोका वाढतो.

ऑक्झलेटयुक्त पदार्थ : बीट, पालक, चॉकलेट, सोयाबीन, सुका मेवा यांचे प्रमाण मर्यादित ठेवा.

जास्त प्रथिनयुक्त व लाल मांस : यांमुळे युरिक आम्ल वाढून खडे तयार होऊ शकतात.

पॅकेज्ड रस व शीतपेये : साखर आणि फॉस्फेटचे जास्त प्रमाण धोका वाढवते.

अतिरिक्त चहा-कॉफी : हे मूत्रल (लघवी वाढवणारे) असल्याने शरीरातील पाण्याची कमतरता वाढवू शकतात.

मग आहार कसा असावा?

दिवसभरात ८ ते १० ग्लास किंवा त्याहून अधिक पाणी प्या, जेणेकरून शरीरातील द्रव संतुलन राखले जाईल. लिंबू, संत्रे, मोसंबी यांसारखी आंबट फळे सायट्रिक आम्लाने समृद्ध असतात, जी खडे तयार होण्याची प्रक्रिया कमी करण्यास मदत करतात. दूध, दही, ताक यांसारखे कॅल्शियमयुक्त पदार्थ योग्य प्रमाणात घ्यावेत. फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्यांमधील तंतुमय घटक पचन सुधारतात. नारळपाणी व ताक यांमुळे मूत्रप्रवाह सुरळीत राहतो आणि खनिजे साचण्याची शक्यता कमी होते.

जीवनशैलीत बदल गरजेचे

दररोज हलका ते मध्यम व्यायाम करा. योग्य व्यायामासाठी वैद्यकीय सल्ला घ्या. लघवी रोखून ठेवण्याची सवय टाळा. वजन नियंत्रणात ठेवा. तसेच डॉक्टरांनी सुचवलेल्या तपासण्या नियमित करा, जेणेकरून समस्या सुरुवातीलाच ओळखता येईल.

मूत्रपिंडातील खड्यांचे प्रकार वेगवेगळे असतात कॅल्शियम, युरिक आम्ल इत्यादी. त्यामुळे स्वतःच्या खड्यांच्या प्रकारानुसार आहार नियोजन करणे अत्यावश्यक आहे. उपचारानंतर निष्काळजीपणा न करता, योग्य आहार, पुरेसे पाणी व नियमित तपासणी यांमुळे ही समस्या मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकते. आरोग्यदायी सवयीच दीर्घकाळ सुरक्षितता देऊ शकतात.