Men Weight Loss Diet Tips: वजन कमी करण्याचा विषय निघाला की आपल्या डोळ्यांसमोर लगेच कॅलरी चार्ट, कडक डाएट प्लॅन, आवडते पदार्थ बंद आणि सतत वजन तपासण्याची प्रक्रिया उभी राहते. विशेष म्हणजे डाएटशी संबंधित जाहिराती आणि सोशल मीडिया कंटेंटचा मोठा भाग महिलांना लक्षात घेऊन तयार केला जातो. यामुळे अनेक पुरुष वजन कमी करण्याच्या कार्यक्रमांपासून दूर राहू शकतात असं एका नव्या अभ्यासातून समोर आलं आहे.

अँग्लिया रस्किन युनिव्हर्सिटीच्या (ARU) संशोधकांनी केलेला हा अभ्यास PLOS Oneमध्ये प्रकाशित झाला आहे. या अभ्यासात ३० वर्षांवरील आणि यापूर्वी अतिरिक्त वजनाचा अनुभव असलेल्या ब्रिटनमधील २४ पुरुषांचा सहभाग होता. पुरुष वजन कमी करण्याच्या करण्याकडे कशाप्रकारे पाहतात आणि त्यांना अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यास काय प्रवृत्त करतं, याचा अभ्यास करण्यात आला.

‘डाएट’ शब्द ऐकताच पुरुषांना काय वाटतं?

संशोधनात सहभागी झालेल्या अनेक पुरुषांच्या मते पारंपरिक डाएट म्हणजे खाण्यावर बंधने, आवडते पदार्थ सोडणे आणि काही काळासाठी आवडत्या पदार्थांचा त्याग करणे. अनेकांना डाएट ही संकल्पना महिलांशी अधिक जोडलेली असल्याचंही जाणवलं. मासिकं, सोशल मीडिया आणि वजन कमी करण्याच्या जाहिरातींमध्ये दिसणारा सौंदर्यावर आधारित दृष्टिकोन यामुळे ही भावना आणखी मजबूत होत असल्याचं संशोधकांना आढळलं.

पुरुषांना ‘डाएट’पेक्षा फिटनेसचा पर्याय अधिक आवडतो?

अभ्यासातील निष्कर्षानुसार, पुरुषांना फक्त ‘कमी खा आणि वजन कमी करा’ असा संदेश देण्यापेक्षा वजन कमी करण्याचा संबंध ताकद, फिटनेस आणि शारीरिक क्षमतेशी जोडलेला असेल तर त्यांना तो अधिक आकर्षक वाटू शकतो.

  • ताकद वाढवणे
  • शरीराची सहनशक्ती वाढवणे
  • खेळ किंवा व्यायामात चांगली कामगिरी करणे
  • ठरावीक फिटनेस लक्ष्य गाठणे
  • स्वतःच्या प्रगतीत फरक पाहणे
  • छोटे-छोटे टप्पे गाठून यश मिळवणे

अशा पद्धतीने वजन कमी करण्याची प्रक्रिया मांडल्यास पुरुषांचा सहभाग वाढू शकतो, असा संशोधकांचा अंदाज आहे.

‘वजन कमी करा’ऐवजी ‘स्वतःला मजबूत बनवा’

वजन कमी करण्याच्या कार्यक्रमांची भाषा बदलण्याची गरज असू शकते. ‘डाएट करा’, ‘कमी खा’, ‘वजन घटवा’ याऐवजी ‘फिट व्हा’, ‘ताकद वाढवा’, ‘वेग आणि स्टॅमिना सुधारवा’ किंवा ‘नवं फिटनेस लक्ष्य गाठा’ असा सकारात्मक दृष्टिकोन अधिक प्रभावी ठरू शकतो. स्पर्धेची भावना, आव्हाने आणि सुरुवातीच्या काळात मिळणारे छोटे सकारात्मक परिणाम यामुळेही पुरुषांना प्रेरणा मिळू शकते.

जोडीदार किंवा मित्राची साथ ठरू शकते गेमचेंजर

वजन कमी करण्याच्या प्रयत्नांमध्ये पार्टनर, जोडीदार, मित्र, मार्गदर्शक किंवा फिटनेस बडीची साथ मिळाल्यास पुरुष अधिक सकारात्मक राहू शकतात, असं अभ्यासातून दिसून आलं. भविष्यात पुरुषांसाठी तयार करण्यात येणाऱ्या वजन कमी करण्याच्या कार्यक्रमांमध्ये कपल्स, मित्रांची जोडी किंवा मेंटर-बडी सिस्टम समाविष्ट करणं फायदेशीर ठरू शकतं.

पुरुषांमध्ये अतिरिक्त वजनाचं प्रमाणही मोठं

अँग्लिया रस्किन युनिव्हर्सिटीने दिलेल्या आकडेवारीनुसार, इंग्लंडमध्ये सुमारे ७० टक्के पुरुष अतिरिक्त वजन किंवा लठ्ठपणासोबत जगत आहेत, तर महिलांमध्ये हे प्रमाण सुमारे ६२ टक्के आहे. त्यामुळे पुरुषांना वजन व्यवस्थापनासाठी प्रभावी पद्धतीने सहभागी करून घेणं महत्त्वाचं ठरतं. केवळ पारंपरिक ‘डाएट’ या चौकटीत न पाहता त्यांच्या आवडी, प्रेरणा आणि मानसिकतेचा विचार करून कार्यक्रम तयार करण्याची गरज असल्याचं संशोधन सूचित करतं.

वजन कमी करणं म्हणजे फक्त कमी खाणं नाही. योग्य आहारासोबत नियमित शारीरिक हालचाल, व्यायाम, पुरेशी झोप आणि सातत्य महत्त्वाचं आहे. पुरुष असो वा महिला, वजन कमी करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीच्या गरजा वेगळ्या असू शकतात. त्यामुळे कोणताही कठोर डाएट सुरू करण्यापूर्वी आहारतज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य ठरतं.