Why South Indians Have White Teeth: दक्षिण भारतीय लोकांचे दात अनेकदा पांढरे, चमकदार आणि निरोगी दिसतात, असं तुम्हीही कधी निरीक्षण केलं आहे का? मग यामागे नेमकं कारण काय? त्यांचं पारंपरिक खाणंपिणं, दातांची स्वच्छता की पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेल्या काही सवयी? या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. दंततज्ज्ञ डॉ. रैना ए. मोहंती यांनी यामागचे संभाव्य कारणं स्पष्ट केली आहेत. विशेष म्हणजे, दातांचा नैसर्गिक रंग टिकवण्यासाठी काही सोप्या सवयीही फायदेशीर ठरू शकतात.

दक्षिण भारतीयांचे दात नैसर्गिकरीत्या जास्त पांढरे असतात का?

दक्षिण भारतीयांचे दात इतरांपेक्षा जास्त पांढरे असतात, यामागे कोणताही ठोस आनुवंशिक किंवा प्रादेशिक नियम नाही. प्रत्येक व्यक्तीच्या दातांचा नैसर्गिक रंग वेगळा असतो. काहींचे दात पांढरे दिसतात, तर काहींच्या दातांना किंचित पिवळसर छटा असते. याचा अर्थ त्यांचे दात अस्वस्थ आहेत, असा होत नाही. दातांचा रंग हा आनुवंशिकता, दातांवरील इनॅमलचा थर, त्याखाली असलेला डेंटिनचा रंग, आहार, तंबाखूचे सेवन आणि तोंडाच्या स्वच्छतेच्या सवयी अशा अनेक घटकांवर अवलंबून असतो. त्यामुळे केवळ एखाद्या प्रदेशातील लोकांचे दात अधिक पांढरे दिसतात म्हणून त्यामागे विशिष्ट जनुकीय कारण आहे, असं म्हणता येत नाही.

दक्षिण भारतीयांच्या आहारात दडलेलं आहे दातांच्या आरोग्याचं रहस्य?

दक्षिण भारतातील पारंपरिक आहारात घरगुती पदार्थ, इडली, डोसा, डाळी, नारळ, कढीपत्ता आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश असतो. संतुलित आहारामुळे शरीरासोबतच दात आणि हिरड्यांचं आरोग्य टिकवण्यासही मदत होऊ शकते. याउलट, साखरेचं प्रमाण जास्त असलेले पदार्थ, गोड पेये आणि वारंवार खाल्ले जाणारे प्रक्रिया केलेले पदार्थ दातांवर विपरीत परिणाम करू शकतात. तोंडातील जीवाणू साखरेचा वापर करून आम्ल तयार करतात. या आम्लामुळे दातांवरील इनॅमलचा थर कमकुवत होऊ शकतो आणि दात किडण्याचा धोका वाढतो. मात्र, केवळ इडली-डोसा किंवा पारंपरिक पदार्थ खाल्ल्याने दात पांढरे होतात, असं नाही. संतुलित आहारासोबत नियमित दातांची स्वच्छता राखणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

तेलाने चूळ भरण्याची सवय दातांसाठी फायदेशीर आहे का?

दक्षिण भारतातील अनेक घरांमध्ये नारळाच्या किंवा तिळाच्या तेलाने चूळ भरण्याची पारंपरिक पद्धत म्हणजेच ऑइल पुलिंग. या पद्धतीमध्ये काही वेळ तोंडात तेल फिरवून नंतर ते थुंकून दिलं जातं. या पद्धतीमुळे तोंडाच्या स्वच्छतेला काही प्रमाणात मदत होऊ शकते, असं काही अभ्यासांमध्ये सूचित झालं आहे. मात्र, दातांवरील प्लाक कमी करण्यासाठी, हिरड्यांचे आजार रोखण्यासाठी किंवा दात पांढरे करण्यासाठी ऑइल पुलिंग किती प्रभावी आहे, याचे ठोस वैज्ञानिक पुरावे अद्याप मर्यादित आहेत. त्यामुळे तेलाने चूळ भरणं ही ब्रशिंग किंवा फ्लॉसिंगची जागा घेऊ शकत नाही. दात निरोगी ठेवण्यासाठी फ्लोराइडयुक्त टूथपेस्टने ब्रश करणं हाच अधिक महत्त्वाचा उपाय आहे.

दातांचा नैसर्गिक रंग पांढरा नसून किंचित पिवळसर असतो?

तुम्हाला दात अगदी मोत्यासारखे पांढरे असावेत असं वाटत असेल, तर एक गोष्ट लक्षात घ्या. निरोगी दातांचा रंग नेहमीच पूर्णपणे पांढरा असेल, असं नाही. दातांच्या बाहेरील इनॅमलचा थर काहीसा पारदर्शक असतो. त्याखाली असलेल्या डेंटिनचा रंग नैसर्गिकरीत्या पिवळसर असू शकतो. त्यामुळे दातांना हलकी पिवळसर छटा दिसणं सामान्य आहे. दातांचा रंग अचानक बदलणं, एखाद्या दातावर काळा डाग दिसणं किंवा त्यासोबत वेदना जाणवणं ही मात्र दुर्लक्ष करण्यासारखी बाब नाही. अशा वेळी दंततज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

पांढऱ्या शुभ्र दातांसाठी टिप्स (Photo: AI Generated)

कोणत्या सवयींमुळे दात पिवळे पडतात?

दातांची योग्य काळजी घेतली नाही, तर कालांतराने त्यांचा रंग बदलू शकतो. काही सवयींमुळे दातांवर डाग पडण्याची शक्यता वाढते.

  • चहा आणि कॉफीचं अतिसेवन: यातील रंगद्रव्यांमुळे दातांवर डाग पडू शकतात.
  • धूम्रपान आणि तंबाखू: दात पिवळे किंवा तपकिरी पडण्याचं हे महत्त्वाचं कारण आहे.
  • गोड पदार्थ आणि शीतपेयं: दात किडण्याचा आणि इनॅमल खराब होण्याचा धोका वाढू शकतो.
  • दातांची अपुरी स्वच्छता: प्लाक साचल्यामुळे दातांचा रंग बदलू शकतो आणि हिरड्यांचे आजार होऊ शकतात.
  • अयोग्य पद्धतीने ब्रश करणं: अतिजोराने किंवा चुकीच्या पद्धतीने ब्रश केल्यास हिरड्या आणि दातांच्या पृष्ठभागाला नुकसान होऊ शकतं.

दातांची चमक आणि आरोग्य टिकवण्यासाठी करा या ७ गोष्टी

१. दिवसातून दोनदा ब्रश करा- फ्लोराइडयुक्त टूथपेस्टने सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी साधारण दोन मिनिटं ब्रश करा. मऊ ब्रिसल्सचा ब्रश वापरा आणि दातांवर अतिजोर देऊ नका.

२. नियमित फ्लॉसिंग करा- ब्रश पोहोचू शकत नाही अशा दातांमधील जागेत अडकलेले अन्नकण आणि प्लाक काढण्यासाठी दिवसातून एकदा फ्लॉसिंग करा.

३. पुरेसं पाणी प्या- पाणी प्यायल्याने तोंडातील अन्नकण निघण्यास मदत होते. साखर नसलेलं पाणी हे गोड पेयांपेक्षा दातांसाठी चांगलं आहे.

४. फळं आणि भाज्यांचा आहारात समावेश करा- सफरचंद, गाजर, काकडी यांसारखे पदार्थ चावल्याने लाळ तयार होण्यास मदत होते. मात्र, हे पदार्थ ब्रशिंगचा पर्याय नाहीत.

५. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी घ्या- दूध, दही यांसारखे कॅल्शियमयुक्त पदार्थ आणि व्हिटॅमिन डीचे योग्य स्रोत हाडं व दातांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत.

६. साखर, तंबाखू आणि रंगीत पेयांवर नियंत्रण ठेवा- गोड पदार्थ वारंवार खाणं टाळा. चहा-कॉफीचं अतिसेवन कमी करा आणि धूम्रपान व तंबाखू पूर्णपणे टाळा.

७. दातांची नियमित तपासणी करा- दंततज्ज्ञांकडून नियमित तपासणी केल्यास दातांवरील प्लाक, कॅव्हिटी आणि हिरड्यांचे आजार सुरुवातीच्या टप्प्यात ओळखता येतात.

दात पांढरे करण्यासाठी लिंबू-मीठ वापरता? सावधान

सोशल मीडियावर दात पांढरे करण्यासाठी लिंबाचा रस, मीठ किंवा बेकिंग सोडा वापरण्याचे अनेक घरगुती उपाय सांगितले जातात. मात्र, अशा उपायांचा चुकीचा वापर दातांच्या इनॅमलला नुकसान पोहोचवू शकतो. लिंबातील आम्लामुळे इनॅमलची झीज होऊ शकते, तर घासणाऱ्या पदार्थांचा अतिवापर दातांच्या पृष्ठभागाला हानी पोहोचवू शकतो. त्यामुळे दातांचा रंग उजळवण्यासाठी असे प्रयोग करण्याऐवजी दंततज्ज्ञांचा सल्ला घ्या. दातांचा रंग बदलण्यामागे डाग, प्लाक, कॅव्हिटी किंवा अन्य समस्या असल्यास त्यानुसार उपचार करणं आवश्यक असतं.

थोडक्यात सांगायचं तर, दक्षिण भारतीयांचे दात अधिक पांढरे दिसण्यामागे एखादं खास गुपित किंवा ठरावीक प्रादेशिक वैशिष्ट्य असल्याचा ठोस पुरावा नाही. संतुलित आहार, नियमित ब्रशिंग, फ्लॉसिंग आणि तोंडाची योग्य स्वच्छता या सवयी कोणालाही दातांचं आरोग्य टिकवण्यासाठी मदत करू शकतात. दातांचा नैसर्गिक रंग बदलण्यापेक्षा ते निरोगी ठेवणं अधिक महत्त्वाचं आहे.