Why Watermelon Has Stripe: उन्हाळा सुरू झाला की, घराघरात काही ठरलेली फळं हमखास दिसू लागतात. काकडी, टरबूज आणि सगळ्यांत जास्त लोकप्रिय असलेलं कलिंगड! थंडगार, रसाळ आणि गोड कलिंगड खायला सगळ्यांनाच आवडतं. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, या कलिंगडाच्या सालीवर दिसणाऱ्या हिरव्या पट्ट्या नेमक्या का असतात?
हा प्रश्न अनेकांच्या मनात कधी ना कधी नक्कीच आला असेल. कारण- कलिंगड बाहेरून जसं दिसतं, तसं प्रत्येक कलिंगड सारखंच नसतं. काहींवर गडद हिरव्या रंगाच्या पट्ट्या असतात, काहींवर फिकट हिरव्या, तर काही कलिंगड पूर्णपणे एकसारख्या रंगाचेही दिसतात. मग नेमकं यामागचं रहस्य काय?
जगभरात वेगवेगळ्या प्रकारचे कलिंगड
कलिंगडाच्या जगभरात अनेक जाती आढळतात. काही ठिकाणी पट्टे असलेलं कलिंगड जास्त लोकप्रिय असतं, तर काही ठिकाणी एकसारख्या रंगाचं कलिंगड पसंत केलं जातं. या पट्ट्यांची जाडीही वेगवेगळी असते- कधी रुंद, कधी मध्यम, तर कधी अगदी बारीक. काही कलिंगडांवर पट्ट्यांचा नमुना इतका वेगळा असतो की, तो पाहूनच लोक आकर्षित होतात.
कलिंगडावरच्या पट्ट्यांचे वेगवेगळे प्रकार
बाजारात तुम्ही अनेक प्रकारची कलिंगडं पाहिली असतील. काहींवर गडद हिरव्या रंगाच्या रुंद पट्ट्या असतात, तर काहींवर मध्यम किंवा बारीक पट्ट्या दिसतात.
विशेष बाब म्हणजे काही कलिंगडांवर अजिबात पट्ट्या नसतात. उदाहरणार्थ, गडद हिरव्या रंगाचं ‘शुगर बेबी’ कलिंगड पूर्णपणे एकसारखं दिसतं.
तसेच, काही देशांमध्ये ‘टायगर’ किंवा ‘जुबली’ प्रकारचं कलिंगड विकसित करण्यात आलं आहे, ज्यावर अगदी वेगळ्या प्रकारच्या, कोनीय आणि बारीक पट्ट्या असतात.
पट्ट्या का तयार होतात?
आता मुख्य प्रश्न म्हणजे कलिंगडावर या हिरव्या पट्ट्या का असतात?
कृषी आणि वैज्ञानिक अभ्यासांनुसार, या पट्ट्यांचं मुख्य कारण म्हणजे आनुवंशिकता (Genetics). कलिंगड वाढताना त्याच्या सालीखालील पेशींमध्ये एक विशिष्ट प्रकारचा नमुना तयार होतो, ज्याला ‘क्लोनल मोजेक पॅटर्न’, असं म्हटलं जातं.
त्यामध्ये काही जीन्स फिकट हिरव्या रंगाच्या पार्श्वभूमीवर गडद हिरव्या पट्ट्या निर्माण करतात; तर काही जीन्स पूर्ण सालीचा रंग नियंत्रित करतात.
म्हणजेच कलिंगडावरच्या पट्ट्या हा नैसर्गिक आणि आनुवंशिक प्रक्रियेचा परिणाम आहे. त्याशिवाय तो कोणताही वेगळा चमत्कार नाही.
पट्ट्यांचा गोडीशी काही संबंध आहे का?
सर्वांत महत्त्वाचं म्हणजे या पट्ट्यांचा कलिंगडाची चव किंवा गोडी याच्याशी काहीही संबंध नसतो.
कलिंगड गोड आहे की नाही, पिकलेलं आहे की नाही हे त्याच्या आतील भागावर अवलंबून असतं; बाहेरील पट्ट्यांवर नाही. त्यामुळे पुढच्या वेळी कलिंगड घेताना फक्त पट्ट्यांवरून त्याचा अंदाज बांधू नका.
निष्कर्ष
कलिंगडावर दिसणाऱ्या हिरव्या पट्ट्या या फक्त दिसण्यासाठी नसून, त्या त्याच्या आनुवंशिक रचनेचा एक भाग आहेत. प्रत्येक कलिंगडाची रचना वेगळी असते आणि त्यामुळेच प्रत्येक फळ खास असतं.
आता पुढच्या वेळी कलिंगड कापताना या पट्ट्यांकडे पाहून तुम्हाला नक्कीच त्यामागचं विज्ञान आठवेल.
(सूचना : या बातमीतील माहिती विविध अहवाल आणि उपलब्ध माहितींवर आधारित आहे. त्यातील दावे स्वतंत्रपणे पडताळलेले नाहीत.)
