Forget Dreams After Waking Up: रात्री झोपताना प्रत्येकालाच कधी ना कधी सुंदर, विचित्र, भावनिक किंवा अंगावर काटा आणणारी स्वप्नं पडतात. काही स्वप्नं इतकी खरी वाटतात की झोपेतून जागे झाल्यानंतर काही क्षण आपण त्याच जगात असल्यासारखे भासते. मात्र, डोळे उघडताच काही मिनिटांतच त्या स्वप्नाचा मागमूसही राहत नाही. आपल्याला केवळ स्वप्न पडलं होतं एवढंच अस्पष्टपणे आठवतं; पण त्यात नेमकं काय घडलं होतं, कोण भेटलं होतं किंवा आपण कुठे होतो हे मात्र आठवत नाही.
पण असं नेमकं का होतं? स्वप्न पाहिल्यानंतर आपला मेंदू त्याची आठवण का जपून ठेवत नाही? हा एखादा आजार आहे की त्यामागे आपल्या मेंदूचीच एखादी विलक्षण प्रक्रिया आहे? याचं उत्तर विज्ञानात दडलं आहे.
मेंदूतील ‘हा’ भाग ठरवतो स्वप्न लक्षात राहणार की नाही!
आपल्या मेंदूमध्ये हिप्पोकॅम्पस नावाचा एक महत्त्वाचा भाग असतो. स्मरणशक्तीच्या प्रक्रियेत त्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. साध्या भाषेत सांगायचं झालं तर दिवसभरात आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अनेक गोष्टींच्या आठवणी व्यवस्थित साठवण्याच्या प्रक्रियेत हिप्पोकॅम्पस महत्त्वाची भूमिका बजावतो.
मात्र, आपण झोपेत असताना ही प्रक्रिया जागेपणीसारखी सुरू राहत नाही. विशेषतः स्वप्नांच्या काळात मेंदूची कार्यपद्धती बदललेली असते, त्यामुळे स्वप्नातील घटना दीर्घकाळ टिकणाऱ्या आठवणीमध्ये रूपांतरित होण्याची शक्यता कमी होते. परिणामी, सकाळी जाग आल्यानंतर काही क्षणांतच स्वप्नाची आठवण धूसर होऊ लागते.
नॉरपेनेफ्रिनची पातळीही असते महत्त्वाची
स्वप्न विसरण्यामागे आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे नॉरपेनेफ्रिन हा न्यूरोट्रांसमीटर. स्मरणशक्ती आणि जागरूकतेशी संबंधित मेंदूच्या प्रक्रियांमध्ये या रसायनाची भूमिका असते.
झोपेच्या काही टप्प्यांमध्ये, विशेषतः स्वप्नांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होत असताना, मेंदूमधील नॉरपेनेफ्रिनची पातळी कमी असते, त्यामुळे स्वप्नातील अनुभव कायमस्वरूपी आठवण म्हणून साठवला जाण्याची शक्यता कमी होते; म्हणूनच डोळे उघडताच काही वेळापूर्वी पाहिलेलं स्वप्न हळूहळू स्मरणातून निसटून जातं.
मग काही स्वप्नं वर्षानुवर्षे का लक्षात राहतात?
इथेच या संपूर्ण प्रक्रियेतील रंजक भाग समोर येतो. प्रत्येक स्वप्न आपण विसरतोच असं नाही. काही स्वप्नं मात्र जागे झाल्यानंतर बराच वेळ आपल्या लक्षात राहतात. यामागे स्वप्नाच्या वेळी निर्माण झालेली भावनिक तीव्रता आणि जाग येण्याची वेळ महत्त्वाची ठरू शकते.
उदाहरणार्थ, एखादं भयानक स्वप्न पडत असताना अचानक जाग आली तर त्या स्वप्नाचा शेवटचा भाग अधिक स्पष्टपणे आठवू शकतो. त्याचप्रमाणे अत्यंत आनंददायी, दुःखद किंवा भावनिक स्वप्नांचाही मनावर अधिक खोल परिणाम होऊ शकतो, त्यामुळे अशी स्वप्नं जागे झाल्यानंतर काही काळ स्मरणात राहतात.
स्वप्न लक्षात ठेवायचं असेल तर ही छोटी युक्ती करा!
तुम्हाला तुमची स्वप्नं आठवून ठेवायची असतील, तर सकाळी डोळे उघडल्यानंतर लगेच उठू नका. काही क्षण शांतपणे त्याच स्थितीत पडून राहा. मोबाईल हातात घेणं, लगेच बोलणं किंवा इतर कामांकडे लक्ष देणं टाळा. नुकतंच काय पाहिलं होतं, कोण होतं, कुठे होता आणि काय घडलं याचा विचार करण्याचा प्रयत्न करा.
स्वप्नाची एखादी घटना, व्यक्ती किंवा दृश्य आठवलं तरी ते लगेच लिहून ठेवा. यासाठी पलंगाजवळ वही किंवा स्वप्नांची नोंद करण्यासाठी स्वतंत्र डायरी ठेवता येईल.
म्हणूनच सकाळी उठल्यावर स्वप्न विसरणं ही असामान्य गोष्ट नाही. उलट, स्वप्न आणि स्मरणशक्ती यांच्यातील हे नातं आपल्या मेंदूच्या अत्यंत गुंतागुंतीच्या कार्यपद्धतीचीच झलक दाखवतं. रात्रीच्या स्वप्नांचं जग कितीही खरं वाटलं, तरी जाग आल्यानंतर ते हळूहळू स्मरणातून पुसलं जाण्यामागे आपल्या मेंदूचीच एक अद्भूत प्रक्रिया कार्यरत असते.
