Dizziness When Standing Up Suddenly: खाली बसून किंवा झोपून काही वेळाने उभे राहिल्यानंतर अचानक चक्कर येणे (dizziness) ही एक सर्वसाधारण पण काही वेळा गंभीर आरोग्याचा संकेत असू शकते. ही स्थिती ऑर्थोस्टेटिक हायपोटेन्शन (Orthostatic Hypotension) नावाच्या स्थितीवर आधारित आहे आणि त्याचे कारणे, लक्षणे, जोखमी व उपचार याबाबत सविस्तर जाणून घेणार आहे. बसल्यानंतर उठल्यावर अचानक चक्कर येणे, डोळ्यांसमोर अंधारी येणे किंवा पडल्यासारखे वाटणे या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. जेव्हा शरीर बसून किंवा पडलेल्या स्थितीतून अचानक उभे राहिल्यानंतर रक्तदाब लगेच पूर्ववत करू शकत नाही आणि मेंदूपर्यंत पुरेसा रक्तपुरवठा होऊ शकत नाही, त्यावेळी ही परिस्थिती उद्भवते.
तज्ज्ञ काय सांगतात?
नवी दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयातील न्यूरोलॉजिस्ट डॉ. अभिषेक कुमार यांच्या मते, आपण उभे राहताच, गुरुत्वाकर्षणामुळे रक्त पायांकडे धावते. साधारणपणे शरीराची मज्जासंस्थेच्या नसा आकुंचन पावून आणि हृदय गती वाढवून ताबडतोब भरपाई करते. जर ही प्रतिक्रिया मंदावली तर चक्कर येऊ शकते. आहारतज्ज्ञ आणि वजन व्यवस्थापन तज्ज्ञांच्या मते, उभे राहिल्याने पायांमध्ये रक्त साचते त्यामुळे मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. भरपूर पाणी पिणे, इलेक्ट्रोलाइट संतुलन राखणे आणि हळू उभे राहणे यामुळे ही समस्या कमी होऊ शकते.
अशी परिस्थिती का उद्भवते?
डिहायड्रेशन, अशक्तपणा, दीर्घकाळ अपुरी झोप, काही औषधे आणि वृद्धत्वाशी संबंधित शरीराच्या कमी झालेल्या हालचालींमुळे देखील चक्कर येऊ शकते. संशोधनातून असेही दिसून आले आहे की, उभे राहिल्यानंतर पहिल्या मिनिटात रक्तदाब अचानक कमी झाल्यास डिमेन्शियाचा धोका वाढू शकतो. ज्या लोकांचे सिस्टोलिक रक्तदाब उभे राहिल्यानंतर ३० सेकंदात २० mmHg किंवा त्याहून अधिक कमी झाला त्यांना भविष्यात डिमेन्शिया होण्याचा धोका जास्त असल्याचे आढळून आले.
डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?
तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, जर एखाद्या व्यक्तीला उभे राहून वारंवार चक्कर येत असेल तर त्यांनी त्यांच्या डॉक्टरांना कळवावे आणि त्यांचा रक्तदाब तपासावा. यामुळे पडणे, हाडे तुटणे आणि गंभीर दुखापत होण्याचा धोका वाढू शकतो. हे टाळण्यासाठी हळू उभे राहणे, भरपूर पाणी पिणे, पायांचा व्यायाम करणे, आवश्यक असल्यास संपूर्ण तपासणी करून घ्यावी. जीवनशैलीतील बदलांसह या परिस्थितीवर मात करता येऊ शकते.
अचानक उभं होताना चक्कर येणं एक सामान्य अनुभव असू शकतो, पण वेळोवेळी ते वारंवार होत असेल तर ते तुम्हाला सूचित करत असलेल्या स्थितीकडे दुर्लक्ष करू नये. योग्य तपासणी, जीवनशैलीतील बदल आणि डॉक्टरांचा सल्ला या त्रिकुटामुळे या समस्येवर नियंत्रण मिळवता येऊ शकते.

