Liver Disease Pruritus Symptoms: तुम्हाला माहीत आहे का की, यकृताशी संबंधित आजार असलेल्या रुग्णांना अनेकदा अंगाला खाज सुटण्याचा त्रास होऊ शकतो? वैद्यकीय भाषेत ‘प्रुरिटस’ (Pruritus) म्हणून ओळखली जाणारी ही समस्या अनेकदा यकृताच्या जुनाट आजारांशी संबंधित असते. मात्र, यकृताचा त्रास असलेल्या प्रत्येक व्यक्तीलाच खाज सुटेल, असे नाही.
साधारणपणे ही खाज हातांचे तळवे आणि पायांचे तळवे या भागांपुरती मर्यादित असू शकते. मात्र, काही वेळा संपूर्ण शरीरावर अस्वस्थता, जळजळ किंवा खाज जाणवू शकते. त्यामुळे वारंवार त्वचा खाजवण्याची तीव्र इच्छा होऊ शकते.
कधीतरी होणारी खाज सहसा गंभीर किंवा हानिकारक नसते. मात्र, सतत किंवा तीव्र स्वरूपाची खाज असल्यास त्याचा झोपेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे व्यक्तीला दिवसभर अस्वस्थता, चिडचिड आणि तणाव जाणवू शकतो. जर वारंवार खाज येत असेल किंवा दीर्घकाळ कायम राहत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष न करता, डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
यकृताशी संबंधित आजारांमध्ये खाज का येते, त्यामागील संभाव्य कारणे कोणती आहेत, या समस्येपासून आराम मिळविण्यासाठी काय करता येऊ शकते आणि कोणत्या वेळी डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे, याबाबतची महत्त्वाची माहिती जाणून घेऊया.
यकृताच्या कोणत्या आजारांमध्ये होऊ शकतो खाजेचा त्रास?
यकृताच्या काही विशिष्ट आजारांमध्ये शरीरात खाज सुटण्याची समस्या जाणवू शकते. त्यामध्ये प्रामुख्याने समाविष्ट होणारे आजार खालीलप्रमाणे :
प्रायमरी बिलियरी कोलॅंजायटिस (PBC)
प्रायमरी बिलियरी कोलॅंजायटिस हा यकृतातील लहान पित्तवाहिन्यांवर परिणाम करणारा दीर्घकालीन आजार आहे. या आजारामध्ये पित्ताच्या प्रवाहात अडथळा निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे शरीरात काही पदार्थ साचल्याने खाज येण्याची समस्या निर्माण होऊ शकते.
प्रायमरी स्क्लेरोसिंग कोलॅंजायटिस (PSC)
प्रायमरी स्क्लेरोसिंग कोलॅंजायटिसमध्ये पित्तवाहिन्यांमध्ये सूज आणि जखमेसारखे बदल होऊ शकतात. त्यामुळे पित्ताचा प्रवाह प्रभावित होतो आणि काही रुग्णांमध्ये त्वचेवर तीव्र खाज येऊ शकते.
गर्भावस्थेतील इंट्राहेपॅटिक कोलेस्टेसिस
गर्भावस्थेदरम्यान काही महिलांना यकृताशी संबंधित बदलांमुळे पित्ताच्या प्रवाहात अडथळा निर्माण होऊ शकतो. या स्थितीला इंट्राहेपॅटिक कोलेस्टेसिस ऑफ प्रेग्नन्सी, असे म्हणतात. त्यामध्ये विशेषतः हातांचे तळवे आणि पायांचे तळवे याठिकाणी तीव्र खाज जाणवू शकते.
मात्र, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, यकृताच्या आजाराशी संबंधित खाजेमागे नेमके एकच कारण अद्याप निश्चितपणे स्पष्ट झालेले नाही. या विषयावर अजूनही संशोधन सुरू आहे. तज्ज्ञांच्या मते, शरीरातील विविध रासायनिक घटक, पित्ताशी संबंधित बदल आणि मज्जासंस्थेची प्रतिक्रिया यांसारख्या अनेक घटकांच्या एकत्रित परिणामामुळे ही समस्या निर्माण होऊ शकते.
कशी कमी करता येईल ही समस्या?
यकृताच्या आजारामुळे होणारी खाज नेहमीच आपोआप कमी होईल, असे नाही. त्यामुळे खाजेचे मूळ कारण शोधून, त्यानुसार उपचार करणे आवश्यक ठरू शकते. यकृताशी संबंधित खाज ही काही वेळा गुंतागुंतीची समस्या असू शकते आणि तिच्यामागील नेमकी कारणे समजून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
लक्षणे नियंत्रित करण्यासाठी परिस्थितीनुसार विविध उपचार पद्धतींचा वापर केला जाऊ शकतो. डॉक्टर तुमच्या यकृताची स्थिती, इतर लक्षणे आणि आवश्यक तपासण्यांचा विचार करून योग्य उपचार सुचवू शकतात.
इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर अँड बायलरी सायन्सेस (ILBS) यांच्या माहितीनुसार, खाज येत असताना वारंवार त्वचा खाजवणे टाळणे योग्य ठरते. सतत खाजवल्यामुळे त्वचेवर लालसरपणा, जखमा किंवा इतर त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकतात. खाजवण्याची इच्छा खूप तीव्र असल्यास नखे लहान ठेवणे आणि रात्री झोपताना हातमोजे वापरणे काही लोकांसाठी उपयुक्त ठरू शकते.
खाज कमी करण्यासाठी साह्यभूत ठरणाऱ्या गोष्टी खालीलप्रमाणे :
- आंघोळीसाठी खूप गरम पाण्याऐवजी कोमट किंवा थंड पाण्याचा वापर करा.
- खूप उष्ण वातावरणात राहणे आणि जास्त वेळ उन्हात राहणे टाळा.
- सौम्य आणि सुगंधरहित साबणाचा वापर करा.
- त्वचा कोरडी पडू नये यासाठी नियमितपणे मॉइश्चरायझर लावा.
- खाज येत असलेल्या भागावर थंड पट्टी ठेवल्याने काही प्रमाणात आराम मिळू शकतो.
- त्वचेला घर्षण होणार नाही असे सैल आणि आरामदायी कपडे वापरा.
- हवा खूप कोरडी असलेल्या ठिकाणी ह्युमिडिफायरचा वापर केल्यास वातावरणातील ओलावा टिकून राहण्यास मदत होऊ शकते.
- डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खाज कमी करण्यासाठी औषधे, क्रीम किंवा तोंडावाटे घेण्याची औषधे वापरली जाऊ शकतात.
मात्र, स्वतःहून कोणतीही औषधे घेणे किंवा क्रीम वापरणे टाळावे. विशेषतः यकृताशी संबंधित आजार असल्यास कोणतेही औषध घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
डॉक्टरांना कधी भेटावे?
जर अंगाला वारंवार खाज येत असेल आणि ती खूप तीव्र स्वरूपाची असेल किंवा त्यामुळे रात्रीची झोप वारंवार मोडत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. सततच्या खाजेमुळे मानसिक तणाव, चिडचिड आणि दैनंदिन कामांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो.
त्याशिवाय खाजेसोबत त्वचा किंवा डोळे पिवळे पडणे, लघवीचा रंग गडद होणे, पोटाच्या उजव्या बाजूला दुखणे, असामान्य थकवा किंवा इतर नवीन लक्षणे जाणवत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक ठरते.
काही वेळा सततची खाज ही यकृताच्या कार्यामध्ये बिघाड होत असल्याचे किंवा पित्ताच्या प्रवाहाशी संबंधित समस्या असल्याचे संकेत देऊ शकते. त्यामुळे अंगाला वारंवार आणि कोणतेही स्पष्ट कारण नसताना खाज येत असेल, तर केवळ त्वचेची समस्या समजून, त्याकडे दुर्लक्ष न करता त्यामागील कारण शोधणे आवश्यक आहे.
(महत्त्वाचे : अंगाला खाज येण्यामागे यकृताच्या आजाराव्यतिरिक्त त्वचेचे आजार, अॅलर्जी, कोरडी त्वचा, काही औषधांचे दुष्परिणाम किंवा इतर वैद्यकीय कारणेही असू शकतात. त्यामुळे केवळ खाज येत असल्याने यकृताचा आजार आहे, असा निष्कर्ष काढू नये. योग्य कारण समजून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला आणि आवश्यक तपासण्या करून घेणे महत्त्वाचे आहे.)
