Easy Hacks To Keep milk Fresh In Summer : उन्हाळ्यात दूध लवकर खराब होण्याची किंवा आंबट लागण्याची तुम्हाला काळजी वाटत असेल, तर तुम्ही काही खबरदारी घेणे आवश्यक आहे. पण, जर असं वारंवार होत असेल तर तुमच्याकडून काही चुका होत असाव्यात. त्यामुळे, दूध खराब होऊ नये म्हणून ते गरम करताना आणि साठवताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्याबद्दल बातमीतून जाणून घेऊयात…
उन्हाळ्यात दूध लवकर का खराब होते?
कच्च्या दुधात लॅब (LAB) नावाचे जिवाणू असतात. जे प्रोबायोटिक आणि निरुपद्रवी असतात. जेव्हा दूध उष्ण हवामानात जास्त काळ न गरम करता ठेवले तर तेव्हा हे लॅब (लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया) जिवाणू नैसर्गिकरित्या सक्रिय होतात. जेव्हा दूध गाय किंवा म्हशीपासून काढलं जातं, तेव्हा त्याचा pH साधारण 6.6 असतो. pH 7 हे सामान्य (न्यूट्रल) मानलं जातं, त्यामुळे दूध थोडंसं आम्लीय (आंबटपणाकडे झुकलेलं) असतं. गरम हवामानात दुधात बॅक्टेरिया लवकर वाढतात आणि ते दुधातील साखर तोडून आम्ल तयार करतात. त्यामुळे दुधाचा pH आणखी कमी होऊन 5 पर्यंत जाऊ शकतो.
याच पातळीवर दूध नासायला किंवा फाटायला सुरुवात होते.
उन्हाळ्यात दूध खराब होण्यापासून कसे टाळावे?
- हवामान गरम असेल तेव्हा किंवा उन्हाळ्यात दूध १ ते २ तासांपेक्षा जास्त वेळ बाहेर ठेवू नका.
- पॅक केलेले दूध आधीच पाश्चराइज्ड केलेले असते. त्यामुळे दूध जास्त वेळ उकळवू नका. असे केल्याने दूध नासू शकते.
- दुधाचे पॅकेट उघडल्यानंतर २ ते ३ दिवसांच्या आत त्याचा वापर करा.
- आपल्याला आवश्यक तेवढेच दूध दुकानातून विकत घ्या.
- उन्हाळ्यात जास्त दूध साठवून ठेवू नका. दूध नेहमी गरम करा आणि थंड झाल्यावरच फ्रिजमध्ये ठेवा.
- दूध जास्त काळ फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यात जिवाणूंची वाढ देखील होऊ शकते.
- फ्रिजमध्ये दूध साठवताना काचेच्या किंवा स्टीलच्या भांड्यात ठेवण्याचा प्रयत्न करा.
बेकिंग सोडा वापरा –
दूध फाटू नये म्हणून त्यात चिमूटभर बेकिंग सोडा घाला. नंतर दूध उकळवून घ्या. मात्र, त्याचा जास्त वापर होणार नाही याची काळजी घ्या, कारण त्यामुळे दुधाची चव बिघडू शकते.
