Brain fatigue : आजकाल लोकांना कामाचा इतका ताण आहे की, घरी आल्यानंतरही ते अर्धी चर्चा त्यावरच करताना दिसतात. त्यामुळे लोकांना शारीरिक थकव्यापेक्षा मानसिक थकवा अधिक जाणवतोय आणि त्याचा सामना करणं अनेकांना अवघड जातंय. सकाळी उठल्यावर ताजंतवानं वाटत नाही किंवा कामावर नीट लक्ष केंद्रित करता येत नाही, अशा स्वरूपाच्या तक्रारी लोकांकडून केल्या जात आहेत.

दरम्यान, ही समस्या का जाणवते यावर डॉ. सुधीर कुमार (एमडी, डीएम) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मानसिक थकवा शारीरिक श्रमामुळे नव्हे, तर आपल्या आधुनिक जीवनशैली आणि सवयींमुळे वाढतोय. पण, हा थकवा नेमका कशामुळे जाणवतो याची कारणं जाणून घेऊ….

१) डिजिटल स्टिम्युलेशन आणि इन्फॉर्मेशन ओव्हरलोड

सध्या मोबाईल, टीव्ही आणि इतर माध्यमांमधून सतत आपल्या कानावर काही ना काही माहिती पडत असते. सकाळी उठल्यानंतर सोशल मीडियावर स्क्रोल करण्यापासून ते रात्री उशिरापर्यंत व्हिडीओ पाहण्यापर्यंत आपला मेंदू सतत माहितीवर प्रक्रिया करत असतो. त्याला माहितीचा अतिभार (information overload) म्हणतात. जेव्हा मेंदूला गरजेपेक्षा जास्त माहिती मिळते, तेव्हा तो थकून जातो आणि त्यामुळे आपली चिडचिड होते.

Award Banner

२) झोपेची खराब गुणवत्ता

केवळ झोप पुरेशी नाही; गाढ झोप अत्यावश्यक आहे. स्क्रीनमधून निघणारा निळा प्रकाश आपल्या झोपेच्या हार्मोन, मेलाटोनिनवर परिणाम करतो . त्यामुळे आपल्याला झोप लागण्यास मदत होत असली तरी आपला मेंदू पूर्णपणे शांत होत नाही, ज्यामुळे सकाळी उठल्यावरही आपल्याला ताजेतवाने वाटत नाही.

३) दीर्घकालीन ताण आणि सामाजिक तुलना

परिपूर्ण दिसण्याच्या आणि इतरांपेक्षा सरस ठरण्याच्या सततच्या धडपडीमुळे ताण वाढतो. सोशल मीडियावर इतरांच्या फोटोंशी आपल्या आयुष्याची तुलना केल्याने आपली मनःशांती हिरावली जाते.

४) मानसिक विश्रांतीचा अभाव

पूर्वी लोक रिकामे बसायचे किंवा खिडकीबाहेर बघत बसायचे, ज्याला मानसिक विश्रांती म्हटले जायचे. आजकाल मोकळा वेळ मिळताच लोक आपला फोन बाहेर काढतात आणि तासन् तास तो स्क्रोल करत राहतात. त्यामुळे मेंदूला आराम मिळत नाही. अशाने आपल्या मनालाही विश्रांती घेण्याची किंवा आराम करण्याची संधीच मिळत नाही.

मानसिक थकवा कसा कमी करावा?

  • डिजिटल डिटॉक्स आणि स्क्रीनपासून दूर राहणे

झोपण्यापूर्वी किमान एक-दोन तास फोन, लॅपटॉप आणि टीव्हीपासून दूर राहा. तुमचे मन शांत करण्याचा आणि गाढ झोपेची तयारी करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे.

  • टिफिकेशन्स बंद करा

जेव्हा तुम्ही एखादे महत्त्वाचे काम करत असाल, तेव्हा तुमच्या फोनचे नोटिफिकेशन्स बंद करा. वारंवार होणाऱ्या विचलनामुळे मेंदूचा ऊर्जावापर दुप्पट होतो.

  • शारीरिक हालचाल आणि सर्गभ्रमण करा

दररोज ३० मिनिटांचा व्यायाम मेंदूला ऊर्जा देतो. तसेच, उद्यानात फिरायला जा. निसर्गरम्य वातावरणात वेळ व्यतीत केल्याने तणावाची पातळी लक्षणीयरीत्या कमी होते.

  • पुरेशी झोप घ्या

मेंदूच्या आरोग्यासाठी, लक्ष केंद्रित करण्यासाठी ७-८ तासांची गाढ झोप अत्यावश्यक आहे.

  • सामाजिक संबंध

डिजिटल चॅटिंगऐवजी प्रत्यक्ष जीवनात लोकांना भेटा आणि त्यांच्याशी संवाद साधा. आपल्या प्रियजनांबरोबर मनमोकळ्या भावना व्यक्त केल्याने मानसिक ताण त्वरित कमी होतो.