What Exactly Causes Drooling During Sleep: रात्री शांत झोपेत असताना सकाळी उठल्यावर उशी ओली झालेली दिसते का? किंवा कुटुंबातील कोणी तुम्हाला झोपेत तोंडातून लाळ गळत असल्याचं सांगितलं आहे का? अनेकजण ही गोष्ट अगदी सामान्य समजून दुर्लक्ष करतात. विशेषतः लहान मुलांमध्ये ही समस्या अधिक दिसून येते. मात्र, काही वेळा झोपेत तोंडातून लाळ गळणं हे केवळ झोपण्याच्या चुकीच्या सवयीमुळे होतं, तर काही वेळा त्यामागे आरोग्याशी संबंधित कारणंही असू शकतात, त्यामुळे ही समस्या सतत होत असेल तर तिच्याकडे दुर्लक्ष न करता कारण जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं.

झोपेत तोंडातून लाळ का गळते?

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, झोपेत तोंडातून लाळ गळण्यामागे अनेक कारणं असू शकतात. काही लोकांची झोपण्याची पद्धत, काही विशिष्ट आजार किंवा काही औषधांचा परिणाम यामुळेही ही समस्या उद्भवू शकते. एखाद्या व्यक्तीच्या तोंडातून नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात लाळ तयार होऊन बाहेर येत असेल, तर त्या स्थितीला वैद्यकीय भाषेत सायलोरिया (Sialorrhea) किंवा हायपरसॅलिव्हेशन (Hypersalivation) असं म्हटलं जातं.

झोपण्याची पद्धत ठरू शकते कारण

जे लोक कुशीवर किंवा पोटावर झोपतात, त्यांच्या तोंडात साचलेली लाळ झोपेत तोंड उघडल्यानंतर बाहेर येण्याची शक्यता अधिक असते. अशा वेळी सकाळी उशी ओली झालेली दिसू शकते, त्यामुळे झोपण्याची पद्धत बदलल्यास काही प्रमाणात ही समस्या कमी होऊ शकते.

नाक बंद असेल तरीही लाळ गळू शकते

सर्दी, सायनसचा त्रास किंवा अॅलर्जीमुळे नाक बंद झालं असेल तर अनेकजण झोपताना तोंडाने श्वास घेऊ लागतात, त्यामुळे तोंड उघडं राहतं आणि तोंडातील लाळ बाहेर येऊ शकते. अशा वेळी मूळ कारणावर उपचार करणं गरजेचं असतं.

अॅसिड रिफ्लक्सचाही असू शकतो परिणाम

पोटातील आम्ल वारंवार अन्ननलिकेत वर येण्याच्या समस्येला अॅसिड रिफ्लक्स म्हणतात. या त्रासामुळे काही व्यक्तींना गिळताना अडचण जाणवू शकते. परिणामी शरीर अधिक लाळ तयार करू शकतं आणि झोपेत ती तोंडातून बाहेर येऊ शकते.

काही औषधांमुळेही वाढू शकते लाळ

काही विशिष्ट औषधांच्या दुष्परिणामांमुळे तोंडात लाळेचं प्रमाण वाढू शकतं. विशेषतः काही मानसिक आजार किंवा अल्झायमरच्या उपचारांसाठी दिल्या जाणाऱ्या औषधांमुळे अशी समस्या काही रुग्णांमध्ये दिसू शकते, त्यामुळे एखादं औषध सुरू केल्यानंतर हा त्रास वाढल्याचं जाणवत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

स्लीप अॅपनियाचंही असू शकतं लक्षण

रात्री झोपेत मोठ्याने घोरणं, झोप वारंवार मोडणं, सकाळी उठल्यावर प्रचंड थकवा जाणवणं आणि झोपेत तोंडातून लाळ गळणं ही काही वेळा स्लीप अॅपनिया या झोपेशी संबंधित समस्येची लक्षणं असू शकतात. अशी लक्षणं वारंवार जाणवत असतील तर वैद्यकीय तपासणी करून घेणं योग्य ठरतं.

झोपेत तोंडातून लाळ गळणं कसं कमी करता येईल?

या समस्येवर काही सोपे उपायही उपयोगी ठरू शकतात.

  • शक्य असल्यास पाठ टेकून झोपण्याची सवय लावा.
  • सर्दी किंवा नाक बंद असेल तर झोपण्यापूर्वी वाफ घ्या आणि नाक मोकळं ठेवा.
  • दिवसभर पुरेसं पाणी प्या, त्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते.
  • एखाद्या औषधामुळे हा त्रास होत असल्याची शंका असल्यास स्वतःहून औषधं बंद करू नका; डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • घोरणं, श्वास घेण्यास त्रास किंवा झोपेत वारंवार जाग येत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
    दुर्लक्ष करू नका

प्रत्येक वेळी झोपेत तोंडातून लाळ गळणं हे गंभीर आजाराचं लक्षण असतंच असं नाही. अनेकदा झोपण्याची पद्धत बदलल्यानंतर किंवा नाकातील अडथळा दूर झाल्यानंतर ही समस्या कमी होऊ शकते. मात्र, हा त्रास सतत होत असेल, त्यासोबत घोरणं, श्वास घेण्यास अडचण, गिळताना त्रास किंवा इतर लक्षणंही दिसत असतील तर वेळ न दवडता डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

(अस्वीकरण : हा लेख सर्वसाधारण आरोग्यविषयक माहितीसाठी आहे. यामधील माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. कोणतीही आरोग्यविषयक समस्या असल्यास किंवा उपचार सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)