हिवाळा आपल्याला आनंद देणाऱ्या अनेक गोष्टी घेऊन येतो, परंतु कोरडी त्वचा, सर्दी आणि खोकला यासह इतर हंगामी आजारांसह अनेक समस्यादेखील घेऊन येतो. त्यामुळे या ऋतूत तुम्ही तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. हिवाळ्यात आरोग्याशी संबंधित उद्भवणाऱ्या सर्व समस्या टाळण्यासाठी, तुम्हाला तुमच्या आहारात अनेक पोषणयुक्त पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो, ज्यामध्ये आवळ्याचा प्रामुख्याने समावेश करण्यास सांगितलं जातं. कारण आवळा एक सुपरफूड असून तो त्याच्या समृद्ध पोषक गुणधर्मासाठी ओळखला जातो.
आवळा हा आयुर्वेदात अतिशय प्रभावी औषध म्हणून वापरला जातो. आवळ्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, फ्लेव्होनॉइड्स आणि फायबर यांसारखे पोषक घटक शरीराला अनेक फायदे देण्यास मदत करतात. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात आवळ्याचे सेवनदेखील फायदेशीर ठरु शकते. तर हिवाळ्यात आवळा का खावा आणि त्याचे फायदे कोणते याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
आवळा खाण्याचे फायदे –
- त्वचेसाठी
आवळ्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स रक्त शुद्ध करण्यासाठी आणि चेहऱ्यावरली डाग दूर करण्यास मदत करतात. आवळा त्याच्या वृद्धत्वविरोधी गुणधर्मांसाठीही ओळखला जातो, त्यामुळे आहारात आवळ्याचा समावेश केल्यामुळे तुमची त्वचा चांगली आणि निरोगी राहण्यास मदत होते.
- प्रतिकारशक्ती
आवळा व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे, तो शरीराला आतून डिटॉक्स (शरीरातील विषारी पदार्थ काढते) करण्यास मदत करू शकते. आवळ्याच्या रसाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
- लठ्ठपणा
आवळ्यामध्ये असे अनेक गुणधर्म आढळतात जे शरीराला अनेक फायदे देण्यासोबतच वजन नियंत्रित करण्यातही मदत करतात. रोज सकाळी कोमट पाण्यातून आवळ्याचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
- मधुमेह
आवळा हा क्रोमियमचा समृद्ध स्रोत आहे, जो आपल्या शरीराला इन्सुलिनला प्रतिसाद देण्यास मदत करतो. आवळा खाल्ल्याने मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की कोणत्याही गोष्टीचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
(टीप – वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारीत आहे. आवळा कोणी खावा आणि कोणी खाऊ नये, याबाबत डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.)