What Happens to Your Body After Eating Betel Leaf Following a Meal: भारतात जेवणानंतर विड्याचं पान खाण्याची परंपरा अनेक शतकांपासून जपली जात आहे. अनेक जण ते केवळ तोंडाची चव बदलण्यासाठी खातात. मात्र, आयुर्वेदानुसार तंबाखू किंवा हानिकारक पदार्थांशिवाय खाल्लेलं साधं विड्याचं पान पचनक्रियेला मदत करू शकतं आणि तोंडाच्या स्वच्छतेसाठीही ते उपयुक्त मानलं जातं. मात्र, त्याचबरोबर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणंही तितकंच गरजेचं आहे.

पचनक्रियेला होऊ शकते मदत

आयुर्वेदानुसार जेवणानंतर विड्याचं पान चघळल्यानं तोंडात लाळेचं प्रमाण वाढतं. लाळेमधील नैसर्गिक एंझाइम्स अन्न पचविण्याच्या प्रक्रियेला मदत करतात. त्यामुळे जड किंवा तेलकट जेवणानंतर काहींना पोट हलकं वाटण्यास मदत होऊ शकते. म्हणूनच अनेक घरांमध्ये जेवणानंतर विड्याचं पान खाण्याची परंपरा आजही कायम आहे.

तोंडातील दुर्गंधी कमी करण्यास मदत

विड्याच्या पानामध्ये काही नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्म असल्याचं आयुर्वेदात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे जेवणानंतर ते चघळल्यास तोंडातील दुर्गंधी कमी होण्यास मदत होऊ शकते. तसेच हिरड्यांच्या आरोग्यासाठीही ते काही प्रमाणात उपयुक्त मानलं जातं.

पोटातील अस्वस्थता कमी होण्यास मदत

मसालेदार किंवा जड अन्न खाल्ल्यानंतर काहींना पोट फुगल्यासारखं वाटतं किंवा जळजळ जाणवते. आयुर्वेदानुसार साधं विड्याचं पान काही व्यक्तींमध्ये अशा त्रासात आराम देण्यास मदत करू शकतं. मात्र, याचा परिणाम प्रत्येक व्यक्तीमध्ये सारखाच होईल, याची खात्री देता येत नाही.

शरीराच्या नैसर्गिक कार्याला मिळू शकते चालना

पारंपरिक समजुतीनुसार विड्याचं पान शरीरातील विविध जैविक प्रक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करतं. त्यामुळे अन्नाचं योग्य पचन होण्यास आणि शरीराची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यास काही प्रमाणात हातभार लागू शकतो. तथापि, या दाव्यांना मर्यादित वैज्ञानिक आधार उपलब्ध आहे.

विड्याचं पान खाताना नक्की लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी…

विड्याचं पान खाणार असाल, तर त्यामध्ये तंबाखू, गुटखा किंवा सुपारी मिसळलेली नसावी. हे पदार्थ तोंडाच्या कर्करोगासह अनेक गंभीर आजारांचा धोका वाढवू शकतात. तसेच जास्त प्रमाणात चुना वापरणंही आरोग्यासाठी घातक ठरू शकतं.

बाजारात मिळणाऱ्या गोड विड्यामध्ये साखर, कृत्रिम रंग आणि विविध गोड पदार्थ मोठ्या प्रमाणात वापरले जातात. त्यामुळे अशा विड्याचं वारंवार सेवन करणं टाळावं. विशेषतः मधुमेह असलेल्या व्यक्तींनी याबाबत अधिक काळजी घेणं आवश्यक आहे.

लक्षात ठेवा…

विड्याचं साधं पान काही पारंपरिक आणि आयुर्वेदिक मतांनुसार आरोग्यासाठी उपयुक्त मानलं जात असलं तरी ते कोणत्याही आजारावरील औषध नाही. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि आरोग्यदायी जीवनशैली यांनाच सर्वाधिक महत्त्व आहे. आरोग्याशी संबंधित कोणताही मोठा बदल करण्यापूर्वी किंवा एखादा घरगुती उपाय नियमित सुरू करण्यापूर्वी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

(अस्वीकरण: हा लेख सर्वसाधारण माहितीच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. त्यामधील माहिती हा वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय ठरू शकत नाही. त्यामुळे कोणत्याही आरोग्यविषयक समस्येच्या बाबतीत या संदर्भात उपचार म्हणून विचार करण्यापूर्वी किंवा त्या दृष्टीने आहारात बदल करण्यापूर्वी डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)