Heart Attack In Young Women : शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणे, वजन नियंत्रणात ठेवणे आणि नियमित व्यायाम करणे हे निरोगी हृदयासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. सध्या महिलांमध्ये फिटनेसची मोठी क्रेझ पाहायला मिळते. फिट राहण्यासाठी महिला कडक डाएट प्लॅनसुद्धा फॉलो करतात. परंतु, गेल्या काही वर्षांत असे दिसून आले आहे की ३० ते ४० वयोगटातील फिट महिलांमध्येही हृदयविकाराचे प्रमाण वाढले आहे. अशा वेळी हा प्रश्न उपस्थित होतो की इतक्या कमी वयातील फिट महिलांना हार्ट अटॅक का येत आहे? ग्लेनिगल्स हॉस्पिटल्सचे सीनियर कन्सल्टंट कार्डियोलॉजिस्ट डॉ. गोबू पी. यांनी यामागची कारणे आणि घ्यावयाची काळजी याबद्दल माहिती दिली आहे.
डॉक्टर काय सांगतात?
सामान्यतः हृदयविकाराचा संबंध वाढते वय, लठ्ठपणा आणि मधुमेहाशी जोडला जातो. परंतु, प्रत्यक्षात हार्ट अटॅकची प्रक्रिया शरीरात खूप आधीपासूनच सुरू झालेली असू शकते. उच्च कोलेस्टेरॉल, इन्सुलिन रेझिस्टन्स, उच्च रक्तदाब (हाय बीपी), धूम्रपान आणि कुटुंबात कमी वयात हृदयविकार असलेला इतिहास (फॅमिली हिस्ट्री) हे असे घटक आहेत, जे वरवर पूर्णपणे निरोगी दिसणाऱ्या महिलांमध्येही कोरोनरी आर्टरी डिसीजचा (हृदयाच्या धमन्यांशी संबंधित आजार) धोका वाढवू शकतात.
महिलांच्या बाबतीत त्यांच्या गरोदरपणाचा आणि प्रजननाचा इतिहास लक्षात घेणेही गरजेचे आहे. गरोदरपणातील ‘प्री-इक्लॅम्पशिया’ (Pre-eclampsia), गरोदरपणात वाढलेला रक्तदाब आणि गरोदरपणातील मधुमेह (Gestational Diabetes) यांसारख्या समस्यांकडे बाळंतपणानंतर दुर्लक्ष करू नये.
या समस्यांमुळे पुढे जाऊन हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. याशिवाय ‘पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम’ (PCOS) असलेल्या महिलांमध्येही काही मेटाबॉलिक धोके असू शकतात, ज्याकडे वेळेवर लक्ष देणे आवश्यक आहे.
तसेच मेनोपॉजच्या (मासिक पाळी बंद होण्याचा काळ) आसपास महिलांच्या शरीरात होणारे हार्मोनल बदल हेदेखील याचे एक कारण असू शकते. ‘एस्ट्रोजन’ हे संप्रेरक रक्तवाहिन्यांचे कार्य आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते. मेनोपॉजच्या काळात एस्ट्रोजनचे प्रमाण कमी झाल्याने कोलेस्टेरॉल वाढणे, पोटावर चरबी साचणे आणि हृदयाशी संबंधित इतर समस्या निर्माण होऊ शकतात. मात्र, कमी वयातील महिलांमधील हार्ट अटॅकची कारणे फक्त हार्मोनल बदलांशी जोडणे योग्य ठरणार नाही; यामागील इतर कारणांचा शोध घेणेही तितकेच गरजेचे आहे.
महिला अनेकदा ‘आपले वय अजून खूप कमी आहे’ किंवा ‘आपण खूप फिट आहोत’ असा विचार करून सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. हार्ट अटॅकच्या वेळी नेहमीच छातीत तीव्र वेदना होतील असे नाही.
महिलांमध्ये छातीवर दाब किंवा जडपणा जाणवणे, धाप लागणे, अचानक खूप थकवा येणे, घाम येणे, मळमळ होणे किंवा पाठीत, नवड्यात (जबड्यामध्ये) आणि हातामध्ये वेदना किंवा अस्वस्थता जाणवणे अशी लक्षणे दिसू शकतात. या लक्षणांकडे केवळ ॲसिडिटी, गॅस, ताणतणाव किंवा सामान्य थकवा समजून दुर्लक्ष करू नका.
डॉक्टरांच्या मते, प्रत्येक महिलेने आपल्या रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि ब्लड शुगरच्या पातळीची नियमित माहिती ठेवली पाहिजे; विशेषतः जर कुटुंबात कोणाला कमी वयात हृदयविकार झालेला असेल तर अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.
