Sleep And Fitness Connection : सध्या धावपळीच्या जीवनात खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे, यामुळे लोकांना आपल्या फिटनेसकडे लक्ष केंद्रित करणं अवघड झालंय. आजची तरुण पिढी आहार आणि व्यायामाकडे खूप लक्ष देते, पण रोज जिम आणि हेल्दी डाएट घेणचं पुरेसं आहे का? व्यायाम आणि हेल्दी डाएटसह ८ तासांची झोप घेणं अत्यंत महत्त्वाचे आहे. झोपेकडे दुर्लक्ष करणे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. यावर एशियन हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ कोमल मलिक यांनी सविस्तर माहिती दिली ती जाणून घेऊ…
झोप अत्यंत महत्त्वाची
तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायाम करणे आणि सकस आहार घेणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच झोपही आवश्यक आहे. डॉक्टर दररोज ७ ते ८ तास झोप घेण्याची शिफारस करतात. झोपेमुळे शरीराला स्वतःची दुरुस्ती करण्यास मदत होते आणि मनाला विश्रांती मिळते.
झोपेच्या कमतरतेमुळे हार्मोन्सचे असंतुलन, वजन वाढणे, थकवा आणि मानसिक ताण येऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, झोपेच्या कमतरतेचा शरीरातील चयापचय आणि हार्मोन्सवर परिणाम होतो. झोपेच्या कमतरतेमुळे भूक वाढवणारे हार्मोन्स सक्रिय होतात, ज्यामुळे अति खाणे होते आणि परिणामी वजन वाढू शकते.
आजकाल फिट राहणं खूपच अवघड झालं आहे. विशेषतः दिल्ली, मुंबईसारख्या शहरांमध्ये फिटनेसकडे लक्ष देणं अधिक अवघड झालयं. भेसळयुक्त अन्न आणि वाढत्या प्रदूषणाचा फिटनेसवर परिणाम होतो. तज्ज्ञांच्या मते, फिट राहण्यासाठी संतुलित आणि हेल्दी डाएट अत्यंत महत्त्वाचा आहे. संतुलित आहारात प्रथिने, कर्बोदके, हेल्दी फॅट, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा समावेश असतो. काही लोक फिट राहण्यासाठी कमी खाणे पसंत करतात, जी एक वाईट सवय आहे.
कमी खाल्ल्याने शरीर कमजोर होऊ शकते आणि चयापचय क्रिया मंदावते. तंदुरुस्त राहण्यासाठी तुम्ही भाज्या, फळे, धान्य यांचा समावेश असलेला सकस आहार घ्यावा आणि ८ ते ९ ग्लास पाणी प्यावे.
दररोज ३० मिनिटे व्यायाम करा
तुम्ही दिवसातून किमान ३० मिनिटे व्यायाम केला पाहिजे. यामध्ये तुम्ही योगा, जॉगिंग किंवा जिममधील व्यायामाचा समावेश करू शकता. व्यायामामुळे केवळ वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होत नाही, तर स्नायूदेखील मजबूत होतात. तसेच, त्यामुळे मानसिक आरोग्यातही सुधारणा होते. जर तुम्ही व्यायाम करत असाल पण झोपेकडे दुर्लक्ष करत असाल, तर तुम्हाला अपेक्षित फिटनेस मिळणार नाही. फिटनेससाठी या तिन्ही गोष्टींचा समतोल राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
‘या’ सवयी सुधारा
आजच्या डिजिटल युगात लोक रात्री उशिरापर्यंत जागे राहतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उशिरा उठतात, यामुळे त्यांचे संपूर्ण रूटीन विस्कळीत होते, ज्याचा थेट परिणाम त्यांच्या आहारावर आणि व्यायामावर होतो. निरोगी राहण्यासाठी एक निश्चित रूटीन आवश्यक आहे. फिटनेससाठी कोणताही शॉर्टकट नाही.
