Gen Z Burnout High-Functioning Burnout : विशीच्या उंबरठ्यावर उभा असलेला निशांत. आयुष्याच्या खांद्यावर अजून जबाबदाऱ्यांचं ओझं नाही, पण स्वप्नांची बॅग मात्र भरलेली आहे. शिक्षण पूर्ण झालंय, समोर सुरक्षित नोकरीची अपेक्षा आहे, ज्याचून चांगला उदरनिर्वाह होऊ शकेल. हे तेच वय असायला हवी होते, जिथे उत्साह, ऊर्जा आणि नव्या सुरुवातीची धडपड असते. पण निशांतसाठी दिवसाची सुरुवातच थकव्याने होत असे. ज्या शर्यतीत तो अजून पूर्णपणे उतरलेलाही नाही, त्या शर्यतीत तो आधीच दमला होता.

निशांतचा हा अनुभव अपवादात्मक नाही. ही आजच्या पिढीची अवस्था आहे, ध्येय गाठण्याआधीच प्रवासातच थकलेली पिढी. खांद्यावर ओझं येण्याआधीच खांदे दुखू लागलेली पिढी. आधुनिक संशोधन या अवस्थेला ‘क्वार्टर-लाइफ क्रायसिस’ (Quarter-Life Crisis) आणि ‘जेन-झी बर्नआउट’ (Gen Z Burnout) असं नाव देतं.

विशीतच थकवा का जाणवतोय? (Why Gen Z Feels Exhausted in Their 20s)

आजची Gen Z इतक्या लवकर मी आता काही करू शकत नाही(“I am done”), मी थकलोय(“I am exhausted”) असं का म्हणते आहे? हा प्रश्न अनेक पालक, शिक्षक आणि धोरणकर्त्यांना पडलेला आहे. हा थकवा कामाच्या ओझ्यामुळे निर्माण झालेला नाही, कारण यापैकी अनेक तरुण अजून पूर्ण वेळ नोकरीदेखील करत नाहीत. हा आहे डिजिटल थकवा.

‘जर्नल ऑफ बिहेवियरल अ‍ॅडिक्शन्स’मधील संशोधनानुसार, सोशल मीडियावर सतत इतरांचं ‘परफेक्ट’ आयुष्य, करिअर आणि यश पाहिल्यामुळे मेंदूमध्ये FOMO—म्हणजेच ‘मागे पडल्याची भीती’—सतत सक्रिय राहते. ही भीती मेंदूला अखंड तुलना करण्याच्या मोडमध्ये ठेवते. परिणामी डोपामाइन या आनंददायी न्यूरोट्रान्समीटरचं संतुलन बिघडतं आणि मानसिक थकवा वाढतो. अनेक तरुण काम सुरू करण्याआधीच दमलेले वाटू लागतात.

Gen Z Burnout म्हणजे नेमकं काय? (What Is Gen Z Burnout)

जेन-झी बर्नआउट ही आजच्या तरुणांची एक शांत पण खोलवर जाणारी मानसिक आपत्ती आहे. शरीर बाहेरून कार्यरत दिसतं, पण मेंदू आतून एका अदृश्य लढाईत व्यस्त असतो. तज्ज्ञ या अवस्थेला ‘हाय-फंक्शनिंग बर्नआउट’ (High-Functioning Burnout) असं म्हणतात—जिथे व्यक्ती बाह्य जगात आपली कर्तव्ये पार पाडते, पण आतून तिची यंत्रणा ‘शटडाउन’च्या म्हणजेच बंद पडण्याच्या उंबरठ्यावर असते.

डिजिटल आयुष्य आणि मेंदूवरील परिणाम (Digital Overload and Brain Health

२२ ते २५ वयोगटातील तरुणांमध्ये ही अवस्था अधिक दिसते, कारण त्यांचा मेंदू कधीच पूर्णपणे बंद (ऑफलाइन) होत नाही. सतत अपडेट राहण्याचं दडपण, सोशल मीडियावर सक्रिय असण्याची गरज, ट्रेंड पकडण्याची घाई, कमी वयात यशस्वी होण्याची अपेक्षा, करिअर, नोकरी आणि पैशांबाबतची अनिश्चितता—या सगळ्यांचा एकत्रित ताण म्हणजे जेन-झी बर्नआउट.

साधा थकवा की वैद्यकीय स्थिती? (Burnout as a Mental Health Condition)

हा बर्नआउट म्हणजे केवळ दमछाक नाही. ही एक दीर्घकालीन ‘ओव्हरलोड’ अवस्था आहे, जी मानसिक, शारीरिक आणि भावनिक पातळीवर परिणाम करते. लक्ष केंद्रित करण्यात अडचण येते, छोटे निर्णयही गुंतागुंतीचे वाटू लागतात आणि भविष्यासंदर्भात नकारात्मक विचार सतत मनात येतात.

हाय-फंक्शनिंग बर्नआउटची लक्षणं (Signs of High-Functioning Burnout)

याचे प्रतिबिंब शारीरिक आरोग्यावरही दिसते. कोणताही ठोस आजार नसतानाही अंगदुखी, डोळ्यांखाली काळी वर्तुळे, झोप न लागणे (Insomnia), पचनसंस्थेच्या तक्रारी वाढतात. सामाजिक अंतर वाढतं, चिडचिडेपणा आणि रिकामेपणाची भावना मनाला ग्रासते.

जागतिक आरोग्य संघटनेची भूमिका (WHO on Burnout)

जागतिक आरोग्य संघटना (WHO) बर्नआउटला ‘वर्कप्लेस फिनॉमेनन’ मानते—दीर्घकाळ टिकणाऱ्या कामाच्या तणावातून निर्माण झालेली अवस्था. मात्र Gen Z साठी हा तणाव केवळ ऑफिसपुरता मर्यादित नाही. तो जीवनशैलीचा भाग बनला आहे.

निशांतसारख्या तरुणांनी अजून नोकरीही सुरू केलेली नाही, तरी ते बर्नआउट अनुभवतात. कारण सोशल मीडिया, करिअरचा दबाव, जागतिक अनिश्चितता आणि सतत उपलब्ध राहण्याची डिजिटल सक्ती—या सगळ्यांनी आठवड्याचे सातही दिवस, चोवीस तास तणाव कायम ठेवला आहे. संशोधन सांगतं की Gen Z ही पहिली पूर्णपणे ‘डिजिटल नेटिव्ह’ पिढी आहे. अभ्यास किंवा काम फोनमधून थेट बेडरूमपर्यंत पोहोचतं. त्यामुळे शरीराचं ‘रेस्ट अँड डायजेस्ट’ (Rest & Digest) तंत्र सक्रियच होत नाही.

न्यूरोसायन्स काय सांगतं? (Science Behind Gen Z Burnout)

न्यूरोसायन्सनुसार जेन-झी बर्नआउट ही केवळ भावनिक थकवा नाही, तर मेंदूची जैविक दमछाक आहे. स्मार्टफोन, नोटिफिकेशन्स, रील्स आणि सततची स्क्रोलिंग मेंदूला लहान-लहान बक्षिस मिळाल्याचे संकेत देत राहतात. यामुळे डोपामाइनचं अतिसंवेदन (Overstimulation) होतं. सुरुवातीला हे सुखद वाटतं, पण कालांतराने मेंदूची बक्षिस मिळाल्याचे संकेत देणारी प्रणाली बोथट होते. परिणामी उत्साह कमी होतो, प्रत्येक गोष्टीत रुची निर्माण होत नाही.

याच वेळी अभ्यास, करिअर आणि भविष्याची चिंता कॉर्टिसोल (Stress Hormone) या हार्मोनची पातळी सातत्याने वाढवते. त्यामुळे निर्णयक्षमता, लक्ष आणि भावनांवर नियंत्रण ठेवणारा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स थकतो. यालाच ‘ब्रेन फॉग’, निर्णयात अडथळा आणि चिडचिडेपणा कारणीभूत ठरतो.

निर्णयांचा गोंधळ आणि करिअरचा ताण (Decision Paralysis)

आजच्या तरुणांसमोर पर्यायांची कमतरता नाही, उलट पर्यायांची भडीमार आहे. संशोधन सांगतं की,”खूप जास्त पर्याय असतील तर मेंदू निर्णय घेण्यात अडकतो—यालाच ‘डिसिजन पॅरालिसिस’ म्हणतात.” पहिला करिअर निर्णय चुकला, तर आपण कायम मागे पडू, ही भीती विशीतल्या तरुणांना आधीच थकवते.

बर्नआउटमधून बाहेर पडण्याचे वैज्ञानिक उपाय (Science-Backed Recovery Methods)

बर्नआउट ही अवस्था एका रात्रीच्या झोपेने किंवा एका कप कॉफीने बरी होत नाही. ही न्यूरोलॉजिकल आणि जैविक थकवा असल्याने मेंदूच्या सर्किट्सना पुन्हा ‘रीसेट’ करावं लागतं. झोपण्याच्या किमान एक तास आधी फोनपासून दूर राहिल्यास मेलाटोनिन नैसर्गिकरीत्या तयार होतं आणि शरीर विश्रांतीच्या अवस्थेत जातं.

स्टॅनफोर्ड विद्यापीठातील न्यूरोबायोलॉजिस्ट डॉ. अँड्र्यू ह्युबरमन यांच्या मते, योगनिद्रा ही बर्नआउट रिपेअर करण्याची प्रभावी पद्धत आहे. काही मिनिटांची जागृत विश्रांती मेंदू आणि शरीराला खोल विश्रांती देते. यासह संध्याकाळनंतर डिजिटल ‘सनसेट’ स्वीकारणं म्हणजेच सध्याकाळनंतर ठराविक वेळेपासून (उदा. सूर्यास्तानंतर किंवा झोपेच्या १-२ तास आधी) डिजिटल स्क्रीनचा वापर जाणीवपूर्वक थांबवणं किंवा मोठ्या प्रमाणात कमी करणं, निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवणं आणि योग्य पोषण यामुळे मेंदूची कार्यक्षमता पुन्हा पूर्ववत होणं शक्य होते.

पालक आणि समाजासाठी महत्त्वाचा संदेश (Message for Parents and Society)

बर्नआउट एकटेपणात वाढतो. त्यामुळे तरुणांना सतत ‘प्रोडक्टिव्ह’(योग्य काम, योग्य पद्धतीने, योग्य वेळी करणं) राहण्याच्या दडपणातून बाहेर काढणं ही कुटुंबाची आणि समाजाची जबाबदारी आहे. ऐकून घेणं, तुलना टाळणं आणि विश्रांतीला वैध मानणं ही काळाची गरज आहे.

निष्कर्ष (Conclusion)

विशीत जाणवणारा हा थकवा किंवा रिकामेपणा( बाहेरून आयुष्य किती चांगलं असलं तरी आतून रिकामं वाटणं) आळशीपणाचं लक्षण नाही. तो बदलत्या जगाशी जुळवून घेताना शरीर आणि मेंदू देत असलेला जैविक इशारा आहे. निशांतची कथा आपल्याला सांगते की ‘नेहमीच सक्रिय’ राहण्याच्या अंध शर्यतीला ब्रेक दिला नाही, तर संपूर्ण यंत्रणा कोलमडण्याची शक्यता वाढते.

टीप – वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.