Makhana Benefits: मखाना हा पारंपरिक भारतीय आहारातील पदार्थ असला तरी हल्ली सोशल मीडियावर सांगितल्या जाणाऱ्या फायद्यांमुळे मखाना खाण्याकडे अनेकांचा कल वाढताना दिसत आहे. कमी तेलात भाजून, विविध मसाले घालून किंवा स्नॅक म्हणून मखाना खाल्ला जातो. उपवासाच्या पदार्थांमध्येही त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. मखाना म्हणजे कमळाच्या बियांचे सुकवलेले आणि फुगवलेले स्वरूप असून, त्यात कार्बोहायड्रेट्स, काही प्रमाणात प्रथिने, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि इतर खनिजे आढळतात. त्याशिवाय मखान्यामध्ये चरबीचे प्रमाण तुलनेने कमी असते आणि साध्या पद्धतीने भाजून खाल्ल्यास तो हलका नाश्ता म्हणून आहारात समाविष्ट करता येतो. मात्र, मखाना कशा पद्धतीने तयार केला जातो. यावर त्याचे एकूण पोषणमूल्य आणि उष्मांकांचे प्रमाण बदलू शकते. भरपूर तूप, लोणी, साखर किंवा जास्त मीठ घालून तयार केलेला मखाना साध्या भाजलेल्या मखान्यापेक्षा वेगळा ठरतो.
मखाना खाण्याचे संभाव्य फायदे पाहिले, तर त्यातील फायबर पचनक्रियेला आणि तृप्तीच्या भावनेला हातभार लावू शकते. त्यामुळे मधल्या वेळेत वारंवार खाण्याची सवय असलेल्या व्यक्तींना नियंत्रित प्रमाणात भाजलेला मखाना हा एक पर्याय ठरू शकतो. त्यातील कार्बोहायड्रेट्स शरीराला ऊर्जा देतात, तर प्रथिने आणि खनिजे संतुलित आहाराचा भाग म्हणून पोषण देण्यास मदत करतात. मखान्यातील कॅल्शियम आणि फॉस्फरस हाडांच्या सामान्य आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत; तर मॅग्नेशियम आणि पोटॅशियम शरीरातील विविध जैविक प्रक्रियांमध्ये भूमिका बजावतात. मखान्यामध्ये काही अँटिऑक्सिडंट संयुगेही आढळतात. त्यामुळे वनस्पतीजन्य विविध खाद्यपदार्थांचा भाग म्हणून त्याचा समावेश करता येतो. वजन नियंत्रणाचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींसाठीही कमी तेलात भाजलेला आणि मर्यादित प्रमाणात खाल्लेला मखाना जास्त कॅलरी असलेल्या तळलेल्या स्नॅक्सचा पर्याय ठरू शकतो; मात्र मखाना स्वतःहून वजन कमी करणारा पदार्थ नाही.
मखाना खाण्याचा आणखी एक फायदा म्हणजे तो अनेक प्रकारे आहारात वापरता येतो. मकाना भाजून, त्यात हळद, जिरेपूड, काळी मिरी किंवा थोडे मीठ घालून कुरकुरीत स्नॅक तयार करता येतो. काही जण मखान्याची पावडर करून, दूध किंवा इतर पदार्थांमध्ये वापरतात; तर खीर, लाडू आणि इतर पारंपरिक पदार्थांमध्येही त्याचा समावेश केला जातो. मात्र, साखर किंवा तुपाचे प्रमाण जास्त ठेवले, तर पदार्थातील उष्मांक झपाट्याने वाढू शकतात. त्यामुळे आरोग्यदायी पर्याय म्हणून मखाना खायचा असेल, तर कमी तेल-तूप, मर्यादित मीठ आणि साखर यांकडे लक्ष देणे योग्य ठरते.
एकूणच सोशल मीडियावर मखान्याला मिळणारी लोकप्रियता पाहून तो ‘सुपरफूड’ किंवा सर्व समस्यांवर उपाय मानणे योग्य नाही. मखाना हा पौष्टिकतेचा एक पर्याय आहे; संतुलित आहारात योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने घेतल्यास तो चांगला स्नॅक ठरू शकतो. आहारातील विविधता, एकूण कॅलरीचे प्रमाण, प्रथिने, भाज्या, फळे, डाळी आणि इतर पौष्टिक पदार्थ यांच्यासोबत मखान्याचा समावेश केल्यास अधिक संतुलित आहार तयार होतो.
मखाना खाण्याचे फायदे
पचनासाठी मदत: फायबरमुळे पचनक्रियेला आधार मिळू शकतो.
तृप्ती वाढवण्यास मदत: मधल्या वेळचा स्नॅक म्हणून योग्य प्रमाणात घेतल्यास पोट भरल्यासारखे वाटू शकते.
हाडांसाठी पोषक : कॅल्शियम, फॉस्फरस व मॅग्नेशियमसारखी खनिजे मिळतात.
ऊर्जादायी : त्यातील कार्बोहायड्रेट्स शरीराला ऊर्जा देतात.
प्रथिनांचा काही प्रमाणात स्रोत: रोजच्या आहारातील एकूण प्रथिनांमध्ये छोटा वाटा देऊ शकतो.
हृदयासाठी अनुकूल स्नॅक : कमी तेलात भाजलेला मखाना तळलेल्या स्नॅक्सचा पर्याय ठरू शकतो.
अँटिऑक्सिडंट संयुगे: मखान्यात काही वनस्पतीजन्य अँटिऑक्सिडंट घटक आढळतात.
आहारात सहजपणे समाविष्ट करणे शक्य : उपवासापासून रोजच्या स्नॅक्सपर्यंत विविध प्रकारे वापरता येतो.
कमी तेलात तयार केल्यास हलका पर्याय: तयारीची पद्धत आरोग्यदायी ठेवल्यास मखाना चांगला स्नॅक बनू शकतो.
