Causes of Low Vitamin D: सूर्यप्रकाश म्हणजेच Vitamin D असं आपण नेहमी ऐकतो. पण तुम्हाला माहीत आहे का, जगभरात Vitamin D ची कमतरता ही सगळ्यात सामान्य पोषण समस्या बनली आहे आणि तिची लक्षणं अनेकदा उशिरा दिसतात, जसे की हाडे कमजोर होणे, थकवा, मूड बदलणे किंवा रोगप्रतिकार शक्ती कमी होणे.

बहुतेकांना वाटतं की, Vitamin D कमी असण्याचं कारण म्हणजे सूर्यप्रकाशाचा अभाव; पण सत्य थोडं वेगळं आहे. कारण- सूर्यप्रकाश हा फक्त ‘एक भाग’ आहे या कहाणीचा. आज आपण जाणून घेणार आहोत त्या पाच गुप्त कारणांचा शोध, ज्यामुळे तुमचं Vitamin D कमी होतंय, जरी तुम्ही सूर्यप्रकाश घेत असलात, चांगला आहार घेत असलात किंवा पूरक आहार घेत असलात तरीही.

१. शरीरात गेलं तरी पचनतंत्र शोषत नाही!

सगळ्यात पहिलं रहस्य म्हणजे तुमचं शरीर Vitamin D शोषतच नाही. Vitamin D हे फॅट-सोल्युबल (चरबीमध्ये विरघळणारं) व्हिटॅमिन आहे. म्हणजेच ते शरीरात योग्य रीत्या शोषलं जाण्यासाठी चरबीचं व्यवस्थित पचन होणं आणि आतडे निरोगी असणं खूप महत्त्वाचं आहे. पण, जर तुम्हाला Celiac disease, Crohn’s disease किंवा IBS (इरिटेबल बाऊल सिंड्रोम) असे विकार असतील, तर शरीर कितीही पौष्टिक अन्न घेतलं तरी व्हिटॅमिन शोषलं जात नाही. संशोधनात दिसून आलं आहे की, Inflammatory Bowel Disease असलेल्या रुग्णांमध्ये Vitamin D ची पातळी खूप कमी आढळते जरी त्यांनी पुरेसं अन्न घेतलं असलं तरी. म्हणजेच प्रश्न नेहमी “काय खाल्लं?” हा नसतो… तर “शरीराने किती घेतलं?” हा असतो.

२. औषधंही व्हिटॅमिन डीची शत्रू असू शकतात!

काही सामान्य औषधं, जी लोक वर्षानुवर्षं घेतात, तीच तुमच्या शरीरातील Vitamin D चं नुकसान करतात! उदा. Corticosteroids (अस्थमा, संधिवातासाठी वापरली जाणारी औषधे) – ही औषधे कॅल्शियम शोषण कमी करतात आणि Vitamin D चा प्रभाव कमी करतात. Anti-epileptic drugs (Phenytoin, Phenobarbital) – ही लिव्हरमध्ये Vitamin D चं विघटन वाढवतात. Weight-loss औषधं – जी चरबी शोषण कमी करतात, त्या Vitamin D सुद्धा कमी शोषतात. दीर्घकाळ वापरल्यास ही औषधं शांतपणे तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन कमी करत राहतात.

३. जास्त चरबी म्हणजे व्हिटॅमिन ‘कैद’ होतं शरीरात!

हे थोडं आश्चर्यकारक आहे; पण Vitamin D ला चरबी खूप आवडते. ती चरबीच्या पेशींमध्ये साठते; पण मग वापरली जात नाही. त्यामुळे अधिक वजन असलेल्या लोकांमध्ये Vitamin D रक्तात उपलब्ध राहत नाही, जरी ते पुरेसं घेत असलं तरी. संशोधन सांगतं की, अधिक वजन असलेल्या व्यक्तींना सामान्य स्तर राखण्यासाठी दोन ते तीन पट अधिक Vitamin D घ्यावं लागतं. म्हणजेच, सूर्यप्रकाश सगळ्यांसाठी सारखा नसतो.

४. यकृत आणि मूत्रपिंड

Vitamin D त्वचेत तयार झाल्यानंतर लिव्हरमध्ये जाऊन ते साठवलं जातं आणि मग मूत्रपिंडात जाऊन सक्रिय रूपात बदलतं. म्हणूनच जर लिव्हरमध्ये (फॅटी लिव्हर, दारूसेवन, हेपॅटायटिस) किंवा मूत्रपिंडात काही बिघाड असेल, तर Vitamin D सक्रिय होतच नाही. त्यामुळे शरीरात असूनही, त्याचा उपयोग होत नाही.

५. जीनचा खेळ – Vitamin D रिसेप्टर कमजोर!

हे सर्वांत कमी चर्चिलं गेलेलं, पण अत्यंत महत्त्वाचं कारण आहे. काही लोकांमध्ये VDR (Vitamin D Receptor)चा जीनमध्ये बदल (mutation) होत असतो, ज्यामुळे शरीराला Vitamin D योग्यरीत्या वापरता येत नाही. जरी रक्तात त्याची पातळी ‘नॉर्मल’ दिसत असली तरी. एका संशोधनानुसार, अशा जीन बदलांमुळे Vitamin D चा इम्युन सिस्टीमवर परिणाम कमी होतो. म्हणजेच काही लोक सूर्यप्रकाश घेतात, सप्लिमेंट घेतात; पण तरीही फायदा होत नाही. कारण- दोष आहे जीनमध्येच!

सूर्यप्रकाश पुरतोय, असं वाटतंय? पुन्हा विचार करा!

Vitamin D ची कमतरता ही फक्त सूर्याशी जोडलेली नाही, तर शरीराच्या आत चालणाऱ्या अनेक नाजूक प्रक्रियांशी जोडलेली आहे. थकवा, हाडदुखी, चिडचिड किंवा रोगप्रतिकार शक्ती कमी वाटत असेल, तर ‘सूर्यप्रकाश मिळाला नाही’ असं समजू नका.

कारण- प्रत्यक्षात व्हिटॅमिन डी तुमच्या आतड्यात, औषधांत, चरबीच्या पेशींमध्ये, यकृतात किंवा अगदी जीनमध्येही लपलेलं असू शकतं.