Kidney Failure: मूत्रपिंडे शरीराच्या गाळण प्रणालीप्रमाणे काम करतात आणि त्यांच्यातील बिघाडामुळे संपूर्ण शरीरावर परिणाम होतो. जेव्हा मूत्रपिंडे काम करणे थांबवतात आणि शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यास असमर्थ ठरतात, तेव्हा एखादे मूत्रपिंड निकामी होते. एम्समधील नेफ्रोलॉजीचे प्राध्यापक डॉ. संदीप महाजन, मूत्रपिंड निकामी होण्याची कारणे स्पष्ट करतात. ते या स्थितीमागील दोन प्रमुख वैज्ञानिक कारणांवर प्रकाश टाकतात. याव्यतिरिक्त, कोणत्या रुग्णांना मूत्रपिंड प्रत्यारोपणाची आवश्यकता असते आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणाविषयीची आकडेवारी काय दर्शवते, हे जाणून घ्या.

मूत्रपिंड निकामी होण्याची कारणे काय?

डॉ. संदीप महाजन यांच्या मते, उच्च रक्तदाब आणि मधुमेह ही मूत्रपिंड निकामी होण्याची प्रमुख वैद्यकीय कारणे आहेत. जर रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रित राहिली किंवा दीर्घकाळापर्यंत रक्तदाब जास्त राहिला, तर त्यामुळे मूत्रपिंडांमधील अतिशय नाजूक रक्तवाहिन्यांचे नुकसान होऊ लागते. त्याव्यतिरिक्त, वेदनाशामक औषधांचा अतिवापर, लठ्ठपणा, जास्त मीठ असलेला आहार आणि वारंवार होणारे मूत्रमार्गाचे संक्रमण किंवा वारंवार होणारे मूतखडे यांमुळेदेखील मूत्रपिंड निकामी होऊ शकते.

प्रत्यारोपणाची गरज कधी?

जेव्हा एखादा रुग्ण मूत्रपिंडाच्या आजाराच्या अंतिम टप्प्यात असतो. म्हणजेच ‘एंड-स्टेज रीनल डिसीज’ (ESRD)ने ग्रस्त असतो. तेव्हा साधारणपणे मूत्रपिंड प्रत्यारोपणाची आवश्यकता भासते. या टप्प्यापर्यंत मूत्रपिंडाची ८५ ते ९० टक्के कार्यक्षमता नष्ट झालेली असते; मूत्रपिंडाचे कार्य बंद पडते आणि रुग्णाला डायलिसीसची गरज लागते.

भारतातील मूत्रपिंड प्रत्यारोपण

आरोग्य आणि कल्याणविषयक संसदीय स्थायी समितीच्या अहवालानुसार, ९ फेब्रुवारीपर्यंत देशात ६१,६६८ रुग्ण मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत होते; तर २०२४ मध्ये केवळ १३,४७६ मूत्रपिंड प्रत्यारोपणे करण्यात आली. मूत्रपिंड प्रत्यारोपणाची गरज आणि देशात प्रत्यक्षात झालेली प्रत्यारोपणे यांची संख्या यांमध्ये मोठी तफावत दिसून येते. अवयव प्रत्यारोपणाची सुविधा केवळ दिल्ली, तमिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटक यांसारख्या निवडक राज्यांमध्येच उपलब्ध आहे. याचा अर्थ असा की, इतर राज्यांतील रुग्णांना अधिक मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागतो.