तुम्ही कधी बेडवर झोपून मोबाईल स्क्रोल करत असताना, अचानक डोळे जड होऊन तो थेट तुमच्या चेहऱ्यावर पडला आहे का? ही घटना कदाचित तुम्हाला हसवणारी किंवा थोडीशी लाजवणारी वाटू शकते, पण न्यूरोलॉजीच्या जगात यामागे एक अत्यंत रंजक कारण दडलेले आहे.

यावर एका वृत्तसंस्थेशी बोलताना ‘कन्सल्टंट न्यूरोलॉजी’ डॉ. सीमा जमवाल यांनी सविस्तर माहिती दिली आहे, यात त्यांनी झोप येताच आपल्या नर्वस सिस्टममध्ये (मज्जासंस्थेमध्ये) नेमकी काय हालचाल होते याविषयी सांगितले.

झोपेची सुरुवात आणि शिथिल होणारे स्नायू

जेव्हा आपण जागे राहण्याच्या अवस्थेकडून झोपेच्या पहिल्या टप्प्याकडे वाटचाल करतो, तेव्हा आपले मेंदू शरीराला आराम देण्याच्या तयारीला लागतो. या काळात आपली मज्जासंस्था स्नायूंच्या हालचाली मंदावते. मेंदूकडून स्नायूंकडे जाणारे सिग्नल्स कमी होऊ लागतात आणि ते हळूहळू शिथिल (Relax) होऊ लागतात.

यामुळेच पकड कमजोर होते

शरीर रिलॅक्स होण्याच्या या प्रक्रियेचा थेट परिणाम आपल्या हातांवर आणि बोटांवर होतो. आपल्याला जरी वाटत असले की आपण फोन घट्ट पकडला आहे, तरी प्रत्यक्षात आपली पकड सैल झालेली असते. असे घडते कारण तुमचा मेंदू कोणत्याही आवाजाशिवाय तुमच्या शरीराला गाढ झोपेसाठी तयार करत असतो.

काय आहे ‘Hypnic Jerk’चा खेळ?

हातातून फोन पडण्याचे आणखी एक रंजक कारण म्हणजे ‘हायपनिक जर्क’ (Hypnic Jerk), ज्याला ‘स्लीप स्टार्ट’ (Sleep Start) असेही म्हणतात. झोपेच्या आहारी जाताना स्नायूंमध्ये अचानक येणाऱ्या अनैच्छिक पेटक्याला किंवा झटक्याला ‘हायपनिक जर्क’ म्हणतात. अनेकदा या झटक्यामुळे आपण कुठूनतरी पडत आहोत, पाय घसरला आहे किंवा अचानक समतोल बिघडला आहे, असा भास होतो.

मेंदूला होतो ‘पडण्याचा’ भ्रम

हा झटका नेमका का बसतो? याचे कोणतेही एक अचूक कारण अद्याप समोर आलेले नाही, परंतु सर्वात प्रसिद्ध सिद्धांतानुसार (Theory) – जेव्हा आपले स्नायू वेगाने शिथिल होतात, तेव्हा मेंदू काही काळासाठी संभ्रमात पडतो. मेंदूला वाटते की शरीर खरोखरच कुठूनतरी खाली पडत आहे.

या काल्पनिक पडण्यापासून तुम्हाला वाचवण्यासाठी मेंदू त्वरित स्नायूंना स्वतःला सावरण्याचा एक वेगवान सिग्नल पाठवतो. शरीरात अचानक होणाऱ्या या हालचालीमुळे फोन तुमच्या हातातून सुटतो. बहुतांश प्रकरणांमध्ये ही पूर्णपणे सामान्य आणि निरुपद्रवी शारीरिक प्रक्रिया आहे.

डॉक्टरांचा सल्ला केव्हा घ्यावा?

जरी ही एक सामान्य गोष्ट असली, तरी जर तुम्हाला असे झटके वारंवार येत असतील, ज्यामुळे तुमची झोप वारंवार मोडत असेल किंवा शरीरात इतर काही असामान्य हालचाली जाणवत असतील, तर तुम्ही न्यूरोलॉजिस्ट किंवा स्लीप स्पेशलिस्टचा (झोपेच्या विकारांचे तज्ज्ञ) सल्ला आवर्जून घेतला पाहिजे.

डॉ. सीमा जमवाल यांच्या मते, पुढच्या वेळी झोपेत असताना हातातून फोन पडला, तर स्वतःला निष्काळजी समजू नका. हे केवळ या गोष्टीचे लक्षण आहे की तुमची मज्जासंस्था अगदी योग्य काम करत आहे, ज्यासाठी ती बनवली गेली आहे – म्हणजेच तुम्हाला शांतपणे झोपवणे!