Raw Potato Freezer Hack: स्वयंपाकघरातील अनेक छोट्या छोट्या टिप्स आपल्या रोजच्या कामाला सोपं बनवतात. विशेषतः उन्हाळ्यात फ्रिज आणि फ्रीजरचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. बर्फ तयार करणे, आइस्क्रीम गोठवणे किंवा थंड पेये साठवणे यासाठी फ्रीजरचा सतत वापर केला जातो. मात्र, फ्रीजरशी संबंधित एक अशी युक्ती, जी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि ते पाहून अनेक महिला आणि गृहिणी आश्चर्यचकित झाल्या आहेत.

या व्हायरल ट्रिकमध्ये लोक फ्रीजरच्या आतील भागावर कच्चा बटाटा घासत असल्याचे दिसत आहे. पहिल्यांदा ऐकताना ही कल्पना थोडी विचित्र वाटू शकते. फ्रीजर आणि बटाट्याचा काय संबंध, असा प्रश्नही अनेकांना पडू शकतो. मात्र, त्यामागचं कारण समजल्यावर अनेक जण ही युक्ती वापरून पाहण्याचा विचार करीत आहेत.

फ्रीजरवर बटाटा घासल्यानं नेमकं काय होतं?

घरगुती टिप्समध्ये अनेक वर्षांपासून वापरली जाणारी ही युक्ती असल्याचा दावा केला जातो. यानुसार, फ्रीजर साफ केल्यानंतर त्याच्या भिंतींवर आणि ट्रेवर कच्च्या बटाट्याचा रस लावल्यास बर्फाचा जाड थर लवकर साचत नाही, असे सांगितले जाते.

बटाट्यामध्ये नैसर्गिक स्टार्च असते. हे स्टार्च फ्रीजरच्या पृष्ठभागावर एक अतिशय पातळ थर तयार करू शकते. त्यामुळे ओलावा थेट पृष्ठभागाला चिकटण्याचे प्रमाण कमी होऊ शकते आणि बर्फाचा जाड थर तयार होण्याचीही शक्यता कमी होते, असा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.

त्यामुळे फ्रीजर वारंवार स्वच्छ करण्याची गरज कमी होऊ शकते आणि बर्फ काढण्यासाठी होणारी मेहनतही वाचू शकते.

आणखी एक मोठा फायदा असल्याचा दावा

अनेकांच्या घरी अशी समस्या उदभवते की, बर्फाच्या थरामुळे आईस ट्रे, स्टीलची भांडी किंवा इतर वस्तू फ्रीजरच्या तळाशी घट्ट चिकटतात. त्यामुळे ती काढताना जोर लावावा लागतो.

मात्र या व्हायरल युक्तीनुसार, फ्रीजरच्या पृष्ठभागावर बटाट्याचा रस लावल्यास वस्तू थेट पृष्ठभागाला चिकटत नाहीत. त्यामुळे ट्रे किंवा भांडी सहजगत्या बाहेर काढता येऊ शकतात. त्यामुळे वेळ आणि मेहनत दोन्ही वाचू शकतात.

ही युक्ती वापरण्याची पद्धत काय?

सर्वप्रथम फ्रिज बंद करून फ्रीजर पूर्णपणे डीफ्रॉस्ट करावा. त्यानंतर एक कच्चा बटाटा घेऊन, त्याचे दोन भाग करावेत. बटाट्याच्या कापलेल्या भागावर हलकेसे चिरे द्यावेत, ज्यामुळे त्यातील रस बाहेर येण्यास मदत होईल.

त्यानंतर हा बटाटा फ्रीजरच्या आतील भिंती, ट्रे आणि तळाच्या भाग यांच्यावर चांगला घासावा. त्यामुळे पृष्ठभागावर बटाट्याच्या रसाचा एक हलका थर तयार होऊ शकतो. त्यानंतर फ्रीजर पुन्हा वापरायला सुरुवात करावी.

ही युक्ती खरोखरच काम करते का?

महत्त्वाची बाब म्हणजे ही कोणतीही वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेली किंवा अधिकृतपणे प्रमाणित केली गेलेली पद्धत नाही. सोशल मीडियावर अनेक वापरकर्त्यांनी ही ट्रिक उपयोगी ठरल्याचा दावा केला आहे. काहींच्या मते, यामुळे बर्फाचा थर कमी प्रमाणात तयार होतो आणि भांडीही चिकटत नाहीत.

येथे पाहा व्हिडीओ

तथापि, याकडे चमत्कारी उपाय म्हणून पाहू नये. ही एक घरगुती युक्ती असून, तिचे परिणाम प्रत्येक फ्रीजरमध्ये सारखेच मिळतील याची खात्री देता येत नाही.

(टीप : ही माहिती सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या वापरकर्त्यांच्या दाव्यांवर आधारित आहे. या दाव्यांची स्वतंत्र वैज्ञानिक पडताळणी झालेली असल्याचे स्पष्ट पुरावे उपलब्ध नाहीत. त्यामुळे कोणतीही युक्ती वापरण्यापूर्वी स्वतःच्या विवेकाने निर्णय घ्यावा.)