Why do I not feel hungry the next morning after sleeping hungry : रात्रीचे हलकं जेवलं पाहिजे असे अनेकदा म्हंटले जाते. पण, कधीकधी कामाचा ताण, थकवा, खाण्याची इच्छा नसली किंवा अगदी बाहेरून खाऊन आलो म्हणून आपण न खाता झोपून जातो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, रात्रभर उपाशी राहूनही सकाळी उठल्यावर आपल्याला प्रचंड अशी भूक लागत नाही. हा अनुभव थोडा विचित्र वाटतो, जणू काही शरीराने रात्रभर स्वतःला पुन्हा पूर्ववत केले आहे. तर असे का होते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? नाही… तर त्याचबद्दल आपण बातमीतून जाणून घेऊयात…
जीवशास्त्र आणि आपल्या शरीरातील हार्मोन्स यांनी याबद्दल एक विचार करायला लावणारे कारण सांगितले आहे. पंचकुला येथील पारस हॉस्पिटलमधील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉक्टर मनीष कटारिया याबद्दल म्हणाले की, जेव्हा तुम्ही बराच काळ उपाशी राहता, जसे की रात्रभर उपाशीपोटी झोपणे, तेव्हा शरीर स्वतःला जुळवून घेऊ लागते, शरीर ऊर्जा वाचवण्याच्या मोडमध्ये जाते आणि उपाशीपोटी झोपल्यानंतरही तुम्हाला भूक लागत नाही.
हार्मोन्समधील बदल
भूक लागण्याची आणि पोट भरल्याची भावना शरीरातील घ्रेलिन आणि लेप्टिन नावाच्या दोन मुख्य हार्मोन्सद्वारे नियंत्रित केली जाते. घ्रेलिन हा भूक वाढवणारा तर लेप्टिन पोट भरल्याचा संकेत देणारा हार्मोन आहे. रात्री उपाशीपोटी झोपल्याने या हार्मोन्सचे संतुलन बिघडू शकते, ज्यामुळे सकाळी भूक लागण्याची भावना कमी होते.
सर्वायवल मोड
शरीराला बराच वेळ अन्न मिळालं नाही. तर ते सर्वायवल मोड मध्ये जातं. शरीर ऊर्जा वाचवण्यासाठी आपली गती कमी करतं. मेटाबॉलिजम म्हणजे अन्न पचवण्याची आणि ऊर्जा तयार करण्याची प्रक्रिया मंदावतो. त्यामुळे शरीर कमी ऊर्जा वापरतं आणि आपल्याला भूकही कमी लागते.
रात्री उपाशी झोपणे योग्य आहे का?
डॉक्टरांच्या मते, अधूनमधून असे होणे सामान्य असले तरी, वारंवार उपाशी झोपणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. दररोज रात्री उपाशी झोपल्याने चयापचय क्रिया मंदावते आणि रक्तातील साखरेची पातळी वाढते. उपाशी झोपल्याने पचनक्रियेवरही परिणाम होतो.
आपल्या शरीराच्या फायद्यासाठी रात्री कशाप्रकारे अन्नाचे सेवन करावे?
झोपण्यापूर्वी हलका आणि आरोग्यदायी नाश्ता करा. जड, मसालेदार जेवण टाळा. हे पदार्थ तुमच्या पचनक्रियेत अडथळा आणू शकतात. दिवसभर संतुलित आहार घ्या. जास्त वेळ उपाशी राहणे टाळा. यामुळे पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो आणि रक्तातील साखरेची पातळी असंतुलित होऊ शकते, ज्यामुळे दीर्घकालीन आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.
