Health Benefits of Soaking Foods Before Consumption: आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपण आपल्या आहारात बदाम, कडधान्ये आणि विविध प्रकारच्या बिया यासारख्या पौष्टिक पदार्थांचा समावेश करतो. जर या पदार्थांचे योग्य प्रकारे सेवन केले नाही, तर शरीराला पुरेसे पोषण मिळत नाही आणि फायद्याऐवजी ते नुकसान पोहोचवू शकतात. आयुर्वेदिक तज्ज्ञ आचार्य मनीष यांनी सांगितल्याप्रमाणे, जेव्हा सुकामेवा आणि धान्य यासारखे बियांसारखे पदार्थ सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ साठवून ठेवले जातात, तेव्हा त्यांच्यावर अँटीन्यूट्रिएंट्सचा (पोषकद्रव्य विरोधी) एक थर तयार होतो. हा एक प्रकारचा विषारी पदार्थ असतो. सेवन केल्यावर हे विषारी पदार्थ शरीरात प्रवेश करतात आणि आजारपण आणतात.
या कडधान्यांमध्ये संपूर्ण धान्यांमध्ये आणि सुक्या फळांमध्ये नैसर्गिकरित्या फायटिक अॅसिड आणि टॅनिनसारखे घटक असतात, त्यांना अँटीन्यूट्रिएंट्स म्हणून ओळखले जाते. हे घटक शरीराद्वारे लोह आणि कॅल्शियमसारख्या आवश्यक खनिजांच्या शोषणात अडथळा आणतात. त्यांना न भिजवता खाल्ल्याने केवळ पचनाच्या समस्याच उद्भवत नाहीत, तर शरीर त्यांच्या संपूर्ण पौष्टिक मूल्यापासूनही वंचित राहते. तर मग काही ठराविक पदार्थ भिजवून खाणे का महत्त्वाचे हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊ…
डाळ, तांदूळ, अख्खे धान्य, बिया आणि सुकामेवा यासारखी धान्ये अनेकदा भिजवून ठेवण्याचा सल्ला दिला जातो. भिजवणे ही एक महत्त्वाची पद्धत मानली जाते. याचे अनेक फायदे आहेत. पूर्वीच्या काळी अन्न लाकडाच्या किंवा कोळशाच्या आगीवर शिजवले जात असे, त्यामुळे धान्य भिजवल्याने शिजण्याचा वेळ कमी व्हायचा आणि अन्न सहज पचण्यायोग्य बनत असे.
खाण्यापूर्वी भिजवून ठेवावे लागणारे पदार्थ कोणते?
बदाम भिजवणे
बदाम ६ ते ८ तास भिजवल्याने त्यातील आरोग्यदायी चरबी, प्रथिने, व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स ही पोषक तत्वे जास्तीत जास्त प्रमाणात मिळण्यास मदत होते. बदामाच्या सालीमध्ये टॅनिन नावाचा घटक अशतो. तो पोषक तत्वांच्या शोषणात अडथळा आणू शकतो. त्यामुळे बदाम रात्रभर भिजवणे उत्तम ठरते. यामुळे साल सहजपणे काढता येते आणि पचनक्रिया सोपी होते.
चणे भिजवून खाणे
चणे ८ ते १० तास भिजवल्याने ते शिजवायला आणि पचायला सोपे होतात. सुक्या चण्यांमध्ये फायटिक अॅसिड असते. ते लोह, जस्त आणि कॅल्शियम यासारख्या खनिजांच्या शोषणात अडथळा आणू शकते. त्यामुळे शिजवण्यापूर्वी त्यांना रात्रभर भिजवल्याने फायटिक अॅसिड कमी होते आणि पचनक्रिया सुधारते.
राजमा रात्रभर भिजवून खा
राजमा ८ ते १० तास भिजवल्याने तो शिजायला आणि पचायला सोपा जातो. राजमा प्रोटीन, फायबर आणि आवश्यक पोषक तत्वांनी भरपूर असतो, मात्र खाण्यापूर्वी तो भिजवून पूर्णपणे शिजवणे आवश्यक आहे. कच्च्या राजमामध्ये लेक्टिन नावाचे एक संयुग असते, त्यामुळे पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. भिजवल्याने याचे प्रमाण कमी होते आणि पचन सोपे होते.
मेथीचे दाणे
मेथीचे दाणे ६ ते ८ तास पाण्यात भिजवून सेवन केल्यास ते पाचक अमृत ठरतात. दाणे आणि पाणी या दोन्हींचे आरोग्यदायी फायदे आहेत. मेथीचे दाणे पचनक्रिया सुधारण्यास, चयापचय क्रिया वाढवण्यास आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतात. ते खूप कठीण आणि कडू असतात. त्यामुळे त्यांना भिजवल्याने ते मऊ होतात आणि त्यांचा कडूपणा कमी होतो. शिवाय त्यामध्ये असलेले फायदेशीर घटक सक्रिय होतात.
सब्जा बिया
सब्जाच्या बिया १० ते १५ मिनिटे पाण्यात भिजवल्यावर त्यांचा एक जेलीसारखा पदार्थ तयार होतो. ही जेली सरबत किंवा लिंबाच्या पाण्यात मिसळून प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. उन्हाळ्यातील गोड पदार्थांमध्येही त्यांचा वापर केला जातो. वाळलेल्या बिया गिळायला आणि पचायला जड जाऊ शकतात. त्यांना भिजवल्याने त्यांचे थंडावा देणारे आणि शरीराला आर्द्रता देणारे गुणधर्मही वाढतात.
चिया सीड्स
चिया सीड्स १० ते २० मिनिटे पाण्यात भिजवल्याने त्या खाण्यास सोप्या होतात. चिया सीड्सना सुपरफूड मानले जाते. कारण त्या फायबर, ओमेगा-३ फॅटी अॅसिड, प्रोटीन आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असतात. त्या पाणी शोषून घेतात आणि जेलसारखा घट्टपणा तयार करतात. भिजवल्यामुळे त्या पचायला सोप्या होतात आणि पोषक तत्वांचे शोषण सुधारते.
सोयाबीन
सोयाबीन १० ते १५ मिनिटे भिजवल्याने शरीराला पुरेसे पोषण मिळते. सोयाबीन प्रोटीनचा एक उत्तम स्त्रोत आहे आणि त्याचा उपयोग टोफू, सोया मिल्क आणि सोया नगेट्स बनवण्यासाठी केला जातो. कच्च्या सोयाबीनमध्ये एन्झाइम इनहिबिटर आणि अँटीन्यूट्रिएंट्स असतात. ते प्रोटीनच्या पचनाच अडथळा आणतात. त्यामुळे ते खाण्यापूर्वी कोमट पाण्यात भिजवणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे ते मऊ होतात आणि पचायला सोपे जातात.
