Why Do People Sweat More: उन्हाळा असो किंवा थंड वातावरण… काही लोक मात्र कायम घामाने ओलेचिंब दिसतात; तर काही जण त्याच परिस्थितीत अगदी कोरडे राहतात. मग प्रश्न पडतो असं का होतं? काहींच्या शरीरात घामाच्या ग्रंथी जणू ‘ओव्हरड्राइव्ह’मध्ये का जातात? हा केवळ साधा शारीरिक फरक आहे की यामागे काही गंभीर कारण दडलं आहे?

या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आम्ही शारदा हॉस्पिटल, ग्रेटर नोएडा येथील वरिष्ठ अंतर्गत वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. श्रेय श्रीवास्तव यांच्याशी संवाद साधला. त्यांनी घाम येण्यामागील अनेक कारणांचा उलगडा केला आणि त्यातलं काही ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

सर्वांत आधी समजून घेऊया, घाम येणं हे शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी घाम महत्त्वाची भूमिका बजावतो. घाम वाफ बनून निघून जातो आणि शरीर थंड ठेवतो. पण काही लोकांमध्ये ही प्रक्रिया जास्त प्रमाणात का घडते, यामागे अनेक कारणं असू शकतात.

जनुकीय कारणांचा मोठा वाटा

डॉ. श्रीवास्तव सांगतात, “काही लोकांना जास्त घाम येण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे जनुकीय घटक. जर कुटुंबात कुणाला जास्त घाम येण्याची समस्या असेल, तर ती पुढच्या पिढीतही दिसू शकते.”

याचा अर्थ, काही लोक जन्मतःच अशा घर्मग्रंथी घेऊन जन्माला येतात, ज्या इतरांच्या तुलनेत अधिक सक्रिय असतात. उष्णता, ताण किंवा अगदी हलका व्यायाम झाला तरी त्यांच्या शरीरात घामाची प्रक्रिया पटकन सुरू होते. त्यामुळे ते इतरांपेक्षा जास्त घाम गाळतात.

नर्व्हस सिस्टीमचा प्रभाव

फक्त जनुकीय कारणं नाहीत, तर शरीरातील नर्व्हस सिस्टीमही यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते.

डॉ. श्रीवास्तव स्पष्ट करतात, “आपल्या शरीरातील ऑटोनॉमिक नर्व्हस सिस्टीम घाम येण्यासारखी स्वयंचलित क्रिया नियंत्रित करते. काही लोकांमध्ये ही प्रणाली अतिसंवेदनशील असते. त्यामुळे त्यांना विनाकारणही घाम येऊ शकतो.”

काही लोकांना थंड वातावरणात किंवा ताणतणावाच्या क्षणीही घाम फुटतो. उदाहरणार्थ- मुलाखत देताना, स्टेजवर बोलताना किंवा भीती वाटल्यावर अचानक घाम येणे हे याच कारणामुळे घडते.

हार्मोन्समधील बदलही कारणीभूत

शरीरातील हार्मोन्समध्ये होणारे बदलदेखील घाम वाढवू शकतात.

“प्युबर्टी, प्रेग्नन्सी किंवा मेनोपॉजच्या काळात मोठ्या प्रमाणात हार्मोनल बदल होतात. त्यामुळे जास्त प्रमाणात घाम येऊ शकतो,” असं डॉ. श्रीवास्तव सांगतात.

तसेच, तणावाच्या वेळी शरीरात अॅड्रेनालिन आणि कॉर्टिसोलसारखे हार्मोन्स वाढतात. हे हार्मोन्स घर्मग्रंथींना अधिक सक्रिय करतात. त्यामुळे तणावपूर्ण किंवा भावनिक परिस्थितीत काही लोकांना अचानक घाम येतो.

शरीराची रचना आणि वजन

तुमच्या शरीराची रचनादेखील घामावर परिणाम करू शकते.

डॉ. श्रीवास्तव म्हणतात, “ज्यांचं वजन जास्त असतं किंवा शरीरात चरबीचं प्रमाण जास्त असतं, त्यांना अधिक घाम येतो. कारण- त्यांच्या शरीरात जास्त उष्णता निर्माण होते आणि ती कमी करण्यासाठी शरीराला अधिक घाम येणे गरजेचे असते.”

त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे स्नायूंचं प्रमाण जास्त असतं, त्यांनाही जास्त प्रमाणात घाम येऊ शकतो. कारण- स्नायूंची कार्यक्षमता वाढली की, शरीराचं तापमानही वाढतं आणि ते नियंत्रित ठेवण्यासाठी घाम वाढतो.

कधी घ्यावी डॉक्टरांची मदत?

जास्त घाम येणं कधी कधी सामान्य असू शकतं; पण काही वेळा ते गंभीर समस्येचं लक्षणही असू शकतं.

जर घाम अत्याधिक प्रमाणात वाढला की, तो तुमच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम करू लागतो. उदा. सतत हात ओले होणे, कपडे वारंवार बदलावे लागणे किंवा कोणत्याही कारणाशिवाय अचानक घाम येणे आदी लक्षणे म्हणजे हायपरहायड्रोसिस नावाची स्थिती असू शकते.

डॉ. श्रीवास्तव याबाबत सांगतात, “जर घामावर नियंत्रण राहत नसेल किंवा कोणतंही स्पष्ट कारण नसताना घाम येत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत गरजेचं आहे.”

शेवटी महत्त्वाचं काय?

प्रत्येक व्यक्तीचं शरीर वेगळं असतं. त्यामुळे एकाला जे सामान्य वाटतं, ते दुसऱ्यासाठी असामान्य असू शकतं.

डॉ. श्रीवास्तव शेवटी सांगतात, “तुमच्या शरीरातील बदल ओळखा. घाम येणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे; पण जेव्हा ते लक्षण त्रासदायक ठरतं, तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नका.”

डिस्क्लेमर :
या लेखात दिलेली माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणत्याही आरोग्यविषयक समस्येसाठी किंवा उपचारांसाठी कृपया तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.