मातीच्या भिंती अन् निसर्गाचा ‘इन-बिल्ट एसी’
लडाख, किन्नौर आणि तिबेटमध्ये शतकानुशतके वापरल्या जाणाऱ्या ‘रॅम्ड-अर्थ’ (Rammed-earth) म्हणजेच मातीच्या जाड भिंतींच्या तंत्रज्ञानाचा वापर करून हे घर उभारण्यात आलं आहे. या जाडजूड मातीच्या भिंतींचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्या वातावरणातील तापमानाचा समतोल राखतात. कडक उन्हाळ्यात या भिंती घराला नैसर्गिकरीत्या थंड ठेवतात, तर हिवाळ्यात बाहेरची गोठवणारी थंडी आत येऊ देत नाहीत. यासोबतच लाकडी छताचे तुळई आणि मोठ्या खिडक्यांमुळे घरात दिवसभर मुबलक सूर्यप्रकाश खेळता राहतो, ज्यामुळे घराचा निसर्गाशी थेट संवाद साधला जातो.
ना-इंधन, ना-लाइट तरी घर राहतं उबदार!
लडाखमध्ये हिवाळ्यात तापमान उणे अंशात जातं. अशा कडाक्याच्या थंडीत घर गरम ठेवण्यासाठी सामान्यतः लाकूड किंवा कोळसा जाळणारे ‘बुखारी’ (पारंपरिक हीटर) वापरले जातात. मात्र, वांगचुक यांनी याला एक भन्नाट आणि शाश्वत पर्याय शोधून काढला आहे. त्यांनी घरात ‘पॅसिव्ह सोलर हिटींग’ (Passive Solar Heating) प्रणाली बसवली आहे.
मोठ्या लाकडी चौकटीच्या खिडक्यांमागे, पुनर्वापर केलेल्या पाण्याच्या काळ्या बाटल्यांची एक विशेष भिंत तयार करण्यात आली आहे.
या पाण्याच्या बाटल्या दिवसभरातील सूर्यप्रकाश आणि उष्णता स्वतःमध्ये शोषून घेतात.
रात्रीच्या वेळी हीच शोषलेली उष्णता हळूहळू घरातील हवेत सोडली जाते.
यामुळे कोणत्याही प्रकारचं इंधन न जाळता किंवा विजेचा वापर न करता घरातील तापमान नेहमी १८ ते २० अंश सेल्सिअसच्या आसपास उबदार राहतं.
पाण्याची बचत करणारं इको-फ्रेंडली टॉयलेट
लडाखसारख्या दुर्गम भागात पाण्याची प्रचंड टंचाई असते. त्यामुळे या घरात पारंपरिक फ्लश टॉयलेट ऐवजी ‘कंपोस्टिंग टॉयलेट’ (Composting Toilet) वापरलं जातं.
यात पाण्याचा एक थेंबही न वापरता, दुर्गंधी टाळण्यासाठी लाकडी भुसा किंवा चिखलाचा वापर केला जातो.
मल आणि मूत्र वेगळे करून ते काही काळ साठवले जातात.
नैसर्गिक प्रक्रियेनंतर या कचऱ्यापासून शेतीसाठी उत्तम दर्जाचं सेंद्रिय खत तयार होतं. यामुळे पाण्याची शंभर टक्के बचत होते आणि शेतीला पोषणही मिळतं.
पारंपरिक बाह्यरूप आणि आधुनिक सोयीसुविधा
घराचा बाहेरील भाग जरी पारंपरिक हिमालयीन वास्तुकलेवर आधारित असला, तरी आतली रचना (Interiors) अगदी आधुनिक जीवनशैलीला साजेशी आहे. घरात सुंदर आणि आरामदायक सोफे, मॉड्युलर किचन, बेडरुमला जोडलेले बाथरुम आणि लडाखी संस्कृती जपणारी कमी उंचीची बैठक व्यवस्था आहे. घराबाहेर एक सफरचंदाची सुंदर बाग आणि हिवाळ्यातही भाज्या उगवणारे ‘ग्रीनहाऊस’ आहे.
तुमच्या साध्या घरातही शाश्वतता कशी आणाल?
‘टीम२’च्या पार्टनर शुभ्रा दहिया यांच्या मते, घर शाश्वत किंवा निसर्गपूरक बनवण्यासाठी संपूर्ण घर तोडून नव्याने बांधण्याची अजिबात गरज नसते. साध्या आणि विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयांनीही हे साध्य करता येतं:
- कमी आणि विचारपूर्वक खरेदी: घरात गरजेपेक्षा जास्त वस्तू न आणता चांगल्या दर्जाच्या गोष्टी निवडा.
- जुन्याचा पुनर्वापर: जुनं फर्निचर फेकून न देता त्याला नवा लुक द्या. खुर्चीचं कापड बदलून किंवा कपाटांची दुरुस्ती करून त्यांना दीर्घ आयुष्य द्या.
- निसर्गाशी जोडून राहा: घरातील सूर्यप्रकाश आणि हवा खेळती राहील अशी व्यवस्था करा. नैसर्गिक कापड आणि साहित्याचा वापर वाढवा.
