Vitamin Deficiency Teeth: आजकाल लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत दातांच्या समस्या झपाट्याने वाढताना दिसत आहेत. दातात कीड होणे, पिवळेपणा, संवेदनशीलता आणि अचानक दात तुटणे या तक्रारी सामान्य झाल्या आहेत. पण प्रश्न असा आहे की, हे नेमकं का होतं? फक्त नीट ब्रश न केल्यामुळेच का, की यामागे अजून काही कारणं दडलेली आहेत?

आपल्याला वाटतं की दात खराब होण्यामागे फक्त जंतू (बॅक्टेरिया) जबाबदार असतात. मात्र, तज्ज्ञांच्या मते हे पूर्णपणे खरं नाही. शरीरात काही महत्त्वाच्या जीवनसत्त्वांची (व्हिटामिन्सची) कमतरता असेल, तर दात कमकुवत होण्याची प्रक्रिया आतूनच सुरू होते. आणि मग जंतूंना हल्ला करणे अधिक सोपं होतं.

सर्वात आधी लक्षात घ्यावं लागतं ते म्हणजे आहार आणि सवयी. सॉफ्ट ड्रिंक्स, सोडा, कोला यांसारख्या कार्बोनेटेड पेयांमध्ये असलेली रसायने दातांच्या एनॅमलला (बाहेरील संरक्षक थर) हानी पोहोचवतात, त्यामुळे दात पिवळे पडतात आणि हळूहळू कमकुवत होतात. पण खरी समस्या तेव्हा वाढते, जेव्हा शरीरात काही आवश्यक जीवनसत्त्वांची कमतरता असते.

जीवनसत्त्व अ (Vitamin A):

हे दातांच्या बाहेरील थरासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. याच्या कमतरतेमुळे दातांचे संरक्षण करणाऱ्या पेशी कमकुवत होतात, त्यामुळे कॅल्शियमसारखी खनिजे टिकून राहत नाहीत. गाजर, पपई, रताळे, दूध व दुग्धजन्य पदार्थ यातून हे जीवनसत्त्व मिळू शकतं.

जीवनसत्त्व क (Vitamin C):

हे दात आणि हिरड्यांसाठी खूप आवश्यक आहे. यामुळे संसर्गाचा धोका कमी होतो. याची कमतरता असेल तर हिरड्या सुजणे, रक्त येणे अशा समस्या वाढतात. संत्री, लिंबू, मोसंबी यांसारखी आंबट फळे यासाठी उपयुक्त ठरतात.

जीवनसत्त्व ड (Vitamin D):

हे केवळ हाडांसाठीच नव्हे तर दातांसाठीही अत्यावश्यक आहे. शरीरात कॅल्शियम शोषून घेण्यास मदत होते, त्यामुळे दात मजबूत राहतात. सकाळच्या उन्हात बसणे, मासे आणि फिश ऑइल यामुळे हे जीवनसत्त्व मिळतं.

जीवनसत्त्व बी-१२ (Vitamin B12):

हे दातांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचं असून, याच्या कमतरतेमुळे दात सैल होणे किंवा पायरियासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. दूध, अंडी, मांसाहार यामध्ये हे भरपूर प्रमाणात आढळतं.

मग दात मजबूत ठेवण्यासाठी काय करावं?

दातांची स्वच्छता ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. दिवसातून किमान दोनदा ब्रश करणे, गोड किंवा डाग पडणारे पदार्थ खाल्ल्यानंतर तोंड धुणे आवश्यक आहे. आठवड्यातून २-३ वेळा तेल कुळकुळीत (ऑइल पुलिंग) केल्यास दात आणि हिरड्या निरोगी राहण्यास मदत होते.

थोडक्यात सांगायचं तर दात कमजोर होण्यामागे केवळ बाह्य कारणं नाहीत, तर शरीरातील पोषणाची कमतरताही तितकीच जबाबदार आहे. योग्य आहार, जीवनसत्त्वांनी भरपूर अन्न आणि नियमित स्वच्छता यामुळेच तुमचे दात दीर्घकाळ मजबूत राहू शकतात.

(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)