Simple Ways to Digest Udadachi Dal Better : उडदाची डाळ अनेक भारतीय घरांमध्ये आवर्जून वापरली जाते. डाळ मखनी बनवण्यासाठी, इडली-डोशाचे पीठ तयार करण्यासाठी किंवा भाताबरोबर खाण्यासाठी उडदाच्या डाळीचा वापर केला जातो. पण, काही लोकांना उडीद डाळ खाल्ल्यानंतर पोट फुगणे, गॅस होणे किंवा अस्वस्थ, पोट भरल्यासारखे वाटू शकते. उडदाच्या डाळीचे सेवन केल्यानंतर असे का घडते, ही डाळ पूर्णपणे टाळावी का याचबद्दल जाणून घेऊयात.
याचबद्दल इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना कन्सल्टंट डायटिशियन आणि डायबेटिस एज्युकेटर, कनिका मल्होत्रा ,म्हणाल्या की, उडदाच्या डाळीमध्ये काही विशिष्ट शर्करा (शुगर्स) असतात, ज्या मानवी शरीराला पचायला कठीण जाऊ शकतात. उडदाच्या डाळीमध्ये रॅफिनोज आणि स्टॅकिओज या शर्करा भरपूर प्रमाणात असतात, ज्यांचे पचन करण्यासाठी मानवी शरीरात आवश्यक एन्झाइम्स नसतात. त्यामुळे ही शर्करा मोठ्या आतड्यात जाते, जिथे आतड्यातील जीवाणू (बॅक्टेरिया) त्यांचे किण्वन (फर्म) करतात आणि गॅस तयार करतात. यामुळे पोट फुगणे, गॅस होणे अशा समस्या उद्भवू शकतात. विशेषतः ज्यांची पचनसंस्था संवेदनशील आहे.
उडदाच्या डाळीमध्ये प्रथिने व फायबर भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे ती इतर काही डाळींपेक्षा जड वाटू शकते. विशेषतः जेव्हा ती मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते किंवा जड पदार्थांबरोबर बनवली जाते. त्याचबरोबर या डाळीत प्रथिने आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे तिच्या चिकटपणामुळे पोट रिकामे होण्याची प्रक्रिया मंदावते. उदाहरणार्थ, डाळ मखनी अनेकदा लोणी, मलई किंवा इतर जड पदार्थांबरोबर बनवली जाते, ज्यामुळे जेवणानंतर जडपणाची भावना वाढते.
कोणाला अस्वस्थता जाणवते?
इरिटेबल बाऊल सिंड्रोम (IBS), बद्धकोष्ठता किंवा संवेदनशील आतडे असलेल्या लोकांना उडदाची डाळ खाल्ल्यानंतर पोट फुगण्याचा धोका जास्त असतो. ज्यांना फायबरयुक्त पदार्थ खाण्याची सवय नसते. अचानक सेवनाचे प्रमाण वाढवल्यास गॅसचा त्रास होऊ शकतो. त्याचबरोर प्रमाण आणि डाळ शिजवण्याची पद्धत यामुळेही फरक पडू शकतो. त्यामुळे, कमी प्रमाणात आणि व्यवस्थित शिजवलेली डाळ पचायला सोपी असते. मात्र, जास्त प्रमाणात खाल्लेली किंवा नीट न शिजवलेली डाळ पचायला जड जाऊ शकते. त्यामुळे उडदाची डाळ खाल्ल्यानंतर पोट फुगल्यासारखे वाटत असेल. तर ती पूर्णपणे खाणे बंद करण्याची गरज नाही. प्रत्येकाची पचनशक्ती वेगळी असते. त्यामुळे डाळ शिजवण्याच्या किंवा खाण्याच्या पद्धतीत काही बदल केल्यास ती सहज पचण्यास मदत होऊ शकते.

उडदाची डाळ पचायला सोपी करण्याच्या टिप्स
शिजवण्यापूर्वी भिजवून ठेवा
सोललेली उडीद डाळ सहा ते आठ तास आणि अख्खी उडीद डाळ १० ते १२ तास भिजवून ठेवल्यास, पोटात गॅस निर्माण करणारे घटक कमी होण्यास मदत होते. डाळ शिजवण्यापूर्वी भिजवलेले पाणी फेकून द्या आणि डाळ स्वच्छ धुवून घ्या.

मऊ होईपर्यंत शिजवा
उडदाची डाळ प्रेशर कुकरमध्ये नीट शिजवून घ्या. कच्ची किंवा कडक राहिलेल्या डाळीपेक्षा पूर्णपणे मऊ शिजवलेली डाळ पचायला सोपी असते. टोमॅटोसारखे आम्लयुक्त पदार्थ डाळ मऊ शिजल्यानंतरच घाला. कारण – असे पदार्थ आधी घातल्यास डाळ शिजायला जास्त वेळ लागू शकतो.
आंबवलेले (फर्मेन्टेड) पदार्थ वापरून पाहा
इडली किंवा डोशाच्या पिठाप्रमाणे, उडदाची डाळ आंबवल्यास त्यातील गॅस निर्माण करणारे काही शर्करायुक्त घटक (शुगर्स) विघटित होण्यास मदत होते. काही लोकांसाठी डाळीला मोड आणल्यामुळेही ती पचायला अधिक हलकी होऊ शकते.
योग्य प्रकार आणि प्रमाण निवडा
अख्खी काळी उडदाची डाळ, सालीसकट उडदाची डाळ आणि साल काढलेली उडदाची डाळ यांच्यातील फायबरचे प्रमाण आणि पोत (टेक्सचर) वेगवेगळे असते. जर एका प्रकारामुळे तुम्हाला त्रास होत असेल, तर दुसरा प्रकार वापरून बघा आणि तो कसा पचतो तेही तपासा. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, सुरुवातीला कमी प्रमाणात डाळ खावी. यासाठी शिजवण्यापूर्वी साधारण २५ ते ३० ग्रॅम कच्ची डाळ घेणे योग्य ठरू शकते.
पचनास मदत करणारे मसाले वापरा
भारतीय स्वयंपाकात वापरले जाणारे हिंग, जिरे, आले आणि ओवा हे पदार्थ पचनाच्या तक्रारी कमी करण्यास मदत करू शकतात. उडीद डाळीत मूग डाळ मिसळून खाणे हा एक चांगला पर्याय आहे. यासाठी १ भाग उडीद डाळ आणि २ भाग मूग डाळ असे प्रमाण ठेवावे.
काय लक्षात ठेवावे?
डाळीबरोबर भात किंवा तुम्हाला पचायला सोपे वाटणारे इतर पदार्थ खाणे, योग्य प्रमाणात सेवन करणे आणि रात्री उशिरा खाण्याऐवजी दुपारच्या जेवणात तिचा समावेश करणे, जेवणानंतर थोडा वेळ चालणे फायदेशीर ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते उडदाची डाळ पचत नसेल तर ती पूर्णपणे खाणे बंद करू नका.

त्याऐवजी, ती शिजवण्याची आणि खाण्याची पद्धत बदलून पाहा. पण, असे करूनही पोट फुगणे किंवा पोटाशी संबंधित इतर त्रास कायम राहत असतील, त्रास तीव्र असेल किंवा इतर गंभीर लक्षणे दिसत असतील, तर डॉक्टरांचा किंवा आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला घ्या. प्रत्येक त्रासासाठी केवळ उडदाची डाळच कारणीभूत असेल, असे नाही.
