Waking Up at 3 AM Every Night Causes and Remedies: रात्री दिवसभराचा थकवा घेऊन तुम्ही शांतपणे झोपता. काही तास छान झोप लागते; पण अचानक डोळे उघडतात. घड्याळात पाहिलं तर पहाटेचे ३ वाजलेले असतात! पुन्हा झोपण्याचा प्रयत्न केला, कूस बदलली, डोळे मिटून पडून राहिलात तरीही झोप काही केल्या लागत नाही. डोक्यात दिवसभरातील घटना, कामाचा ताण आणि उद्याच्या कामांचे विचार सुरू होतात. सकाळी उठल्यावर मात्र अपुरी झोप आणि थकवा जाणवतो.
तुमच्यासोबतही असं वारंवार घडतं का? अनेकांना रात्री किंवा पहाटे ठराविक वेळी जाग येण्याचा अनुभव येतो. काही जण यामागे गूढ कारणं शोधतात, तर काही जण त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, रात्री एकाच वेळी जाग येण्यामागे झोपेचे नैसर्गिक चक्र, तणाव, वातावरणातील बदल आणि काही आरोग्यविषयक समस्या कारणीभूत असू शकतात. विशेष म्हणजे, पहाटे ३ वाजताच जाग येते, यामागे प्रत्येक व्यक्तीसाठी लागू होईल असं एकच कारण नाही. मग नेमकं काय घडतं? जाणून घेऊया.
१. शरीराचं जैविक घड्याळ देतं महत्त्वाचे संकेत
आपल्या शरीरात एक नैसर्गिक जैविक घड्याळ असतं. याला सर्केडियन रिदम असं म्हणतात. झोपण्याची वेळ, जाग येण्याची वेळ, शरीराचं तापमान आणि काही हार्मोन्सच्या निर्मितीवर या घड्याळाचा प्रभाव असतो.
रात्री झोपताना आपण सतत एकाच प्रकारच्या गाढ झोपेत नसतो. झोपेचे वेगवेगळे टप्पे ठराविक चक्रांमध्ये येत असतात. रात्रीच्या उत्तरार्धात गाढ झोपेचं प्रमाण तुलनेने कमी होतं आणि स्वप्नांशी संबंधित रॅपिड आय मूव्हमेंट (REM) झोपेचा कालावधी वाढतो, त्यामुळे काही वेळा झोप हलकी होते आणि आजूबाजूच्या गोष्टींची जाणीव सहज होऊ शकते.
अशा वेळी किरकोळ आवाज, खोलीतील तापमान, प्रकाश किंवा लघवीला जाण्याची गरज यांमुळेही जाग येऊ शकते. मात्र, ही वेळ प्रत्येक व्यक्तीसाठी सारखी असेलच असं नाही.
२. तणावामुळे मेंदू रात्रीही राहतो सतर्क
रात्री जाग येण्यामागे तणाव हे एक महत्त्वाचं कारण असू शकतं. दिवसभर कामाचा ताण, आर्थिक चिंता, कौटुंबिक जबाबदाऱ्या किंवा भविष्यातील काळजी यांमुळे मन सतत विचार करत राहतं.
शरीर झोपलेलं असलं तरी तणावाशी संबंधित विचार आणि अस्वस्थता झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम करू शकतात. काही व्यक्तींना रात्री जाग आल्यानंतर पुन्हा झोप लागत नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुरेशी झोप न झाल्यामुळे थकवा, चिडचिड आणि एकाग्रतेचा अभाव जाणवू शकतो.
अशा वेळी जाग आल्यावर वारंवार घड्याळ पाहणं किंवा किती वेळ झोप उरली आहे, याचा विचार करणं टाळा, त्यामुळे झोपेबद्दलची चिंता आणखी वाढू शकते.
३. कॉर्टिसोल हार्मोनचाही असतो संबंध
कॉर्टिसोल हा शरीराच्या तणाव प्रतिसादात महत्त्वाची भूमिका बजावणारा हार्मोन आहे. शरीराच्या नैसर्गिक जैविक घड्याळानुसार त्याचं प्रमाण साधारणपणे सकाळ जवळ येताना वाढू लागतं. यामुळे शरीराला जाग येण्यासाठी आणि दिवसाची तयारी करण्यासाठी मदत होते.
मात्र, याचा अर्थ असा नाही की पहाटे ३ वाजता जाग येते, म्हणजे कॉर्टिसोलचं प्रमाण वाढलं आहे किंवा शरीरात काहीतरी बिघाड झाला आहे. केवळ जाग येण्याच्या वेळेवरून हार्मोन्समधील बदलांचं निदान करता येत नाही.
तणाव, अनियमित झोप आणि इतर घटक एकत्र आल्यास झोप खंडित होण्याची शक्यता वाढू शकते.
४. रात्रीचं जेवण आणि पचनाचा त्रास ठरू शकतो अडथळा
रात्री उशिरा किंवा झोपण्याच्या अगदी आधी भरपेट जेवण्याची सवय असेल तर काही व्यक्तींना अॅसिडिटी, छातीत जळजळ किंवा पोटात अस्वस्थता जाणवू शकते. यामुळे झोपेत व्यत्यय येऊ शकतो.
त्याचप्रमाणे रात्री भरपूर चहा, कॉफी किंवा कॅफिन असलेली पेये घेतल्यास झोप लागण्यास उशीर होऊ शकतो किंवा रात्री वारंवार जाग येऊ शकते. मद्यपानामुळे सुरुवातीला झोप येत असल्यासारखं वाटलं तरी रात्रीच्या उत्तरार्धातील झोपेची गुणवत्ता बिघडू शकते.
त्यामुळे रात्रीचं जेवण हलकं ठेवणं, झोपण्यापूर्वी भरपूर खाणं टाळणं आणि संध्याकाळनंतर कॅफिनचं सेवन मर्यादित ठेवणं उपयुक्त ठरू शकतं.
५. हार्मोन्समधील बदल आणि वाढतं वय
वाढत्या वयानुसार झोपेच्या पद्धतीत बदल होऊ शकतात. काही व्यक्तींना रात्री लवकर जाग येते किंवा झोप वारंवार खंडित होते.
महिलांमध्ये रजोनिवृत्तीच्या काळात रात्री अचानक गरम होणं, घाम येणं आणि अस्वस्थता जाणवणं यामुळे झोपमोड होऊ शकते. गर्भावस्थेतही शारीरिक अस्वस्थता आणि वारंवार लघवीला जावं लागल्यामुळे झोपेवर परिणाम होऊ शकतो.
थायरॉईडशी संबंधित काही विकार, वेदना, काही औषधं किंवा इतर आरोग्यविषयक समस्या यांचाही झोपेशी संबंध असू शकतो. मात्र, प्रत्येक वेळी जाग येण्यामागे हार्मोन्सच कारणीभूत असतात असं नाही.
६. घोरणं किंवा झोपेत श्वास अडखळणं हेही असू शकतं कारण
रात्री वारंवार जाग येण्यामागे स्लीप अॅप्नियासारखा झोपेशी संबंधित विकारही असू शकतो. या स्थितीत झोपताना श्वास वारंवार थांबतो किंवा कमी होतो. मोठ्याने घोरणं, झोपेत गुदमरल्यासारखं होणं, सकाळी डोकेदुखी आणि दिवसा खूप झोप येणं अशी लक्षणं काही व्यक्तींमध्ये दिसू शकतात.
याशिवाय रात्री वारंवार लघवीला जाणं, दीर्घकालीन वेदना किंवा अस्वस्थ पायांची समस्या यांमुळेही झोपेचा सलगपणा बिघडू शकतो. अशी लक्षणं वारंवार जाणवत असतील तर त्यामागचं कारण समजून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
रात्री जाग येत असेल तर काय कराल?
१. झोपण्याची आणि उठण्याची वेळ ठरवा : सुट्टीच्या दिवशीही झोपेचं वेळापत्रक शक्य तितकं नियमित ठेवा.
२. झोपण्यापूर्वी मोबाईलचा वापर कमी करा : सोशल मीडिया, कामाचे संदेश आणि सतत स्क्रीन पाहण्यामुळे मन शांत होण्यास अडथळा येऊ शकतो.
३. संध्याकाळनंतर चहा-कॉफी मर्यादित ठेवा : कॅफिनचा परिणाम अनेक तास टिकू शकतो, त्यामुळे त्याचं सेवन झोपेच्या वेळेपासून पुरेसं आधी थांबवण्याचा प्रयत्न करा.
४. रात्री जाग आल्यास स्वतःवर झोपेचा दबाव टाकू नका : जाग आल्यानंतर अस्वस्थ वाटत असेल तर मंद प्रकाशात शांत करणारी एखादी कृती करा. पुन्हा झोप येऊ लागल्यावर अंथरुणावर जा.
५. दिवसभर शारीरिक हालचाल करा : नियमित व्यायाम आणि सकाळच्या नैसर्गिक प्रकाशात काही वेळ घालवणं झोपेच्या चक्रासाठी उपयुक्त ठरू शकतं. मात्र, झोपण्याच्या अगदी आधी जोरदार व्यायाम टाळा.
६. झोपेचं वातावरण आरामदायी ठेवा : खोली शक्य तितकी शांत, अंधारी आणि आरामदायी तापमानाची ठेवा.
कधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा?
रात्री जाग येणं अधूनमधून घडत असेल तर त्यामागे नेहमीच गंभीर समस्या असते असं नाही. मात्र, आठवड्यातून अनेकदा झोपमोड होत असेल, पुन्हा झोप लागत नसेल, दिवसा सतत थकवा जाणवत असेल किंवा कामावर लक्ष केंद्रित करणं कठीण होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
मोठ्याने घोरणं, झोपेत श्वास अडखळणं किंवा वारंवार लघवीला जाणं अशी लक्षणं असल्यास तीही डॉक्टरांना सांगा.
थोडक्यात सांगायचं तर पहाटे ३ वाजता जाग येणं हा स्वतःहून कोणत्याही विशिष्ट आजाराचा किंवा गूढ घटनेचा संकेत नाही. झोपेचं नैसर्गिक चक्र, मानसिक ताण, दैनंदिन सवयी आणि काही आरोग्यविषयक समस्या यांपैकी एक किंवा अनेक घटक त्यामागे असू शकतात. घड्याळात दिसणाऱ्या वेळेपेक्षा तुमची झोप किती वेळा खंडित होते, पुन्हा झोप लागते का आणि दिवसभर तुम्हाला कसं वाटतं, याकडे लक्ष देणं अधिक महत्त्वाचं आहे.
