How to stop craving sweets after a meal : आपल्यातील अनेकांना गोड खायला प्रचंड आवडते. तिखट लागलं म्हणून, तर कधी गोड खाण्याची इच्छा झाली म्हणून, तर कधी जेवल्यानंतर आपल्यातील बरेच जण हमखास गोड खातात. जेवल्यानंतर कधीतरी गोड पदार्थ खाण्याची इच्छा होणे सामान्य आहे. पण, नेहमीच असं वाटतं असेल आणि या सवयींकडे दुर्लक्ष करता येत नसेल, तर या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जेवणानंतर लगेच गोड खावंसं वाटणं हे शरीरात साखर, इन्सुलिन किंवा आपण खाल्लेल्या अन्नाचं शरीरात कसं पचन होतं यावर अवलंबून असतं. म्हणजेच ही भावना शरीराकडून मिळणारा एक संकेत असू शकतो. त्यामुळे या संकेताकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे, असे ठाणे येथील किम्स हॉस्पिटल्सच्या डायबेटोलॉजी विभागाचे प्रमुख डॉक्टर विजय नेगलूर यांनी स्पष्ट केले आहे.

जास्त प्रमाणात शुद्ध केलेल्या कर्बोदकांनी युक्त पदार्थ खाल्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण लवकर वाढते आणि तितक्याच लवकर ते वेगाने कमी होते. ही घट भुकेचे संकेत देते, ज्याचा अर्थ मेंदू अनेकदा गोड खाण्याची इच्छा झाली आहे, असा घेतो. इन्सुलिन प्रतिरोधकता किंवा मधुमेह असलेल्या लोकांमध्ये असे बदल होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते, ज्यामुळे त्यांना वारंवार गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते.

जेवणात प्रथिने, तंतुमय पदार्थ किंवा चांगली आरोग्यदायी चरबी कमी प्रमाणात असेल तर अन्न पटकन पचते आणि जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटत नाही. असं झालं की, शरीर ऊर्जा मिळविण्याचा प्रयत्न करीत राहतं आणि त्यामुळे मेंदू लगेच ऊर्जा मिळवून देणाऱ्या गोष्टीकडे म्हणजे गोड पदार्थ खाण्याकडे वळतो. म्हणूनच जेवणात प्रथिने, भाज्या आणि पूर्ण धान्य (whole grains) जास्त प्रमाणात घेतले, तर रक्तातील साखर स्थिर राहते आणि प्रत्येक जेवणानंतर गोड खाण्याची इच्छा कमी होते.

ताण वाढला की, शरीरात कॉर्टिसोल नावाचा हार्मोन वाढतो. हा हार्मोन शरीराला पटकन ऊर्जा मिळावी म्हणून गोड खाण्याची इच्छा वाढवतो. तसेच झोप नीट झाली नाही, तर भूक नियंत्रित करणारे हार्मोन्स बिघडतात. त्यामुळे गोड पदार्थांचे आकर्षण होते. म्हणूनच जे लोक सतत तणावाखाली असतात किंवा ज्यांची झोप कमी होते, त्यांना जेवणानंतर गोड खाण्याची इच्छा जास्त प्रमाणात होते.

नेहमीच असे होतेच, असे नाही; पण जर वारंवार गोड खाण्याची तीव्र इच्छा होत असेल, तर तो इशारा असू शकतो. विशेषतः जर त्याबरोबर वजन वाढणे, सतत थकवा येणे, कुटुंबात कोणाला आधी मधुमेह असेल, तर त्याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. त्याचा अर्थ मधुमेह झाला आहे, असे नाही. पण, कदाचित शरीराला रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यात अडचण येत असू शकते. त्यामुळे तपासणी करून घेणे योग्य ठरते…

लोकांनी गोड पदार्थ खाणे पूर्णपणे टाळावे का?

गोड पदार्थ पूर्णपणे बंद केल्यास ते खाण्याची इच्छा आणखी तीव्र होऊ शकते. त्यामुळे गोड पदार्थांचे सेवन मर्यादित प्रमाणातच केले पाहिजे. फळांसारखे नैसर्गिकरीत्या गोड पदार्थ निवडणे किंवा गोड पदार्थ खाण्याचे प्रमाण कमी ठेवणे, जेवणानंतर साखरेचे पेय टाळणे यांमुळे रक्तातील साखरेच्या पातळीवर ताण न येता, गोड खाण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते.

वैद्यकीय सल्ला कधी घ्यावा?

जर गोड पदार्थ खाण्याची इच्छा वारंवार आणि खूप तहान लागणे, वारंवार लघवी होणे आणि कारण न समजता, सतत थकवा येणे अशा लक्षणांसह दिसत असेल, तर रक्तातील साखरेची पातळी तपासणे योग्य ठरेल.