How do protein and fiber work together in your diet : प्रथिने शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतात. ती अमिनो ॲसिडपासून तयार होतात. प्रथिनांना शरीराचे ‘बांधकाम करणारे घटक’ असेही म्हटले जाते. कारण स्नायू, हाडे, त्वचा आणि केस यांच्या वाढीबरोबर त्यांची झीज भरून काढण्याचे कामही प्रथिने करतात. त्यामुळे आहारात प्रथिनांचे सेवन केल्याने स्नायू मजबूत होतात आणि व्यायामानंतर त्यांची दुरुस्तीही होते. प्रथिने रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात, हिमोग्लोबिनद्वारे संपूर्ण शरीरात ऑक्सिजन वाहून नेतात. त्यामुळे शरीराच्या दैनंदिन गरजेनुसार सेवन केल्यास तुमच्यासाठी वरदान ठरू आणि अतिरिक्त सेवन केल्यास शरीरासाठी घातक सुद्धा ठरू शकते.
अलीकडेच, यूकेमधील सर्जन डॉक्टर करण राजन यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात त्यांनी स्पष्ट केले आहे की, शरीराला आवश्यकतेपेक्षा जास्त प्रथिने घेणे आणि कमी फायबरयुक्त आहारामुळे आतड्यातील जीवाणूंच्या संतुलनावर परिणाम होऊ शकतो. तर जास्त प्रथिनयुक्त आणि कमी फायबरयुक्त आहार आतड्यातील जीवाणूंचे संतुलन कसे बिघडवतात याबद्दल तज्ज्ञांकडून जाणून घेऊ.
जास्त प्रथिनयुक्त आहाराचा आतड्यांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो?
आपण जेव्हा प्रथिनांचे सेवन करतो तेव्हा त्यातील बहुतांश प्रथिने लहान आतड्यात पचतात आणि शरीरात शोषली जातात. मात्र, गरजेपेक्षा जास्त प्रथिने खाल्ली आणि आहारात फायबरचे प्रमाण कमी असेल, तर काही प्रथिने मोठ्या आतड्यापर्यंत पोहोचतात. मोठ्या आतड्यात असलेले जीवाणू या प्रथिनांचे विघटन करतात. या प्रक्रियेला किण्वन (Fermentation) म्हणतात. सामान्यतः, आतड्यातील चांगले जीवाणू फायबरचे विघटन करून शॉर्ट-चेन फॅटी ॲसिड तयार करतात. हे घटक आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करतात. मात्र, आहारात प्रथिने जास्त आणि फायबर कमी असल्यास प्रथिनांचे किण्वन वाढू शकते. यामुळे आतड्यातील जीवाणूंचे संतुलन बिघडू शकते आणि काही हानिकारक घटक तयार होऊ शकतात.
आतड्यात प्रथिनांच्या किण्वन प्रक्रियेमुळे अमोनिया, पी-क्रेसोल, इंडोल, फिनॉल आणि हायड्रोजन सल्फाइडसारखे पदार्थ तयार होऊ शकतात, ज्यामुळे आतड्यांमधील दाह वाढू शकतो आणि आतड्यांच्या संरक्षक थरावर दाब येऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, जास्त प्रथिनयुक्त आहारामुळे जिवाणूंच्या काही प्रजातींमध्ये बदल होतो. याचा अर्थ असा नाही की, प्रथिनयुक्त आहार आरोग्यासाठी चांगला नाही. तज्ज्ञांच्या मते स्नायू मजबूत करण्यासाठी आणि त्यांची दुरुस्ती करण्यासाठी शरीराच्या गरजेनुसार प्रथिनयुक्त आहाराचे सेवन करणे आवश्यक आहे.
आरोग्यासाठी दररोज किती प्रथिने आवश्यक आहेत?
स्नायू मजबूत करण्यासाठी दररोज व्यायाम करणाऱ्या खेळाडूंनी शरीराच्या वजनानुसार प्रति किलोग्राम १.६ ते २ ग्रॅम प्रथिने सेवन करावीत. उदाहरणार्थ, ८० किलो वजन असलेल्या आणि व्यायाम करणाऱ्या व्यक्तींसाठी दररोज अंदाजे १२८ ते १६० ग्रॅम प्रथिने सेवन करणे पुरेसे आहे. प्रथिनांची नेमकी गरज वय, शारीरिक हालचाल, आरोग्य आणि व्यायामाच्या पातळीवर अवलंबून असते.
प्रथिनांबरोबर करा फायबरचा समावेश
जर तुम्हाला आतड्यांचे आरोग्य सुधारायचे असेल आणि स्नायू मजबूत करायचे असतील तर तुम्ही प्रथिनयुक्त आहाराबरोबर फायबरवर देखील भर दिला पाहिजे. केवळ व्हे प्रोटीन, चिकन किंवा मटण यांसारख्या प्रथिनांच्या स्रोतांवर अवलंबून राहण्याऐवजी, तुमच्या आहारात दही, अंडी, बीन्स, टोफू आणि डाळी यांसारख्या विविध पदार्थांचा समावेश करा. या पदार्थांमध्ये प्रथिनांबरोबर शरीरासाठी आवश्यक असलेली इतर पोषक तत्वेही असतात.
जेव्हा तुम्ही गरजेपेक्षा जास्त प्रथिनांचे सेवन करता, तेव्हा शरीर काय संकेत देते?
डॉक्टर आदित्य व्ही. नरगुंड, वरिष्ठ सल्लागार, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आणि हेपॅटो-पॅनक्रिएटिक सर्जरी, साईटकेअर हॉस्पिटल, बंगळुरू यांच्या मते, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या आहारात प्रथिने जास्त आणि फायबर कमी असते, तेव्हा पचनाच्या इतर समस्या उद्भवतात. जास्त प्रथिनेयुक्त आहार घेतल्याने पोट फुगणे आणि गॅस वाढू शकतो. तसेच बद्धकोष्ठता, शौचास वारंवार जावे लागणे, पोटात अस्वस्थता, भूक न लागणे आणि तोंडाला दुर्गंधी येणे यांसारखी लक्षणे देखील दिसू शकतात.
आहारात प्रथिने आणि फायबरचा समतोल कसा साधावा?
आपल्या आहारात प्रथिने आणि फायबरचा समतोल साधण्यासाठी, आपण कडधान्ये, अंडी, दूध, दही, चीज किंवा प्रथिनांचे इतर योग्य स्रोत समाविष्ट करू शकता. आपल्या आहारात हिरव्या भाज्या, संपूर्ण धान्य, फळे आणि इतर फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करणे देखील महत्त्वाचे आहे. दही आणि ताकासारखे आंबवलेले पदार्थ देखील संतुलित आहाराचा भाग असू शकतात. आपल्या आहारात संपूर्ण धान्य आणि भाज्यांचा समावेश केल्याने आतड्यांचे आरोग्य सुधारते.
