Soaked Fenugreek Seeds in Morning Benefits: स्वयंपाकघरात सहज मिळणारे छोटेसे मेथीचे पिवळे दाणे आरोग्यासाठी किती प्रभावी ठरू शकतात, हे अनेकांना माहीत नसते; पण आयुर्वेदानुसार या छोट्याशा दाण्यांमध्ये अनेक औषधी गुण दडलेले आहेत. योग्य पद्धतीने मेथीचे सेवन केल्यास शरीरातील अनेक समस्या कमी होऊ शकतात. आयुर्वेद तज्ज्ञ आचार्य बालकृष्ण यांच्या मते, मेथीचे दाणे केवळ चव वाढवण्यासाठी नसून, ते शरीराला आतून निरोगी ठेवण्याचे काम करतात. विशेषतः सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेली मेथी खाल्ल्यास त्याचे फायदे अधिक प्रभावीपणे मिळतात.
डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त
आचार्य बालकृष्ण सांगतात की, मेथीचे दाणे डायबिटीजच्या रुग्णांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. रात्री चार ते पाच ग्रॅम मेथीचे दाणे पाण्यात भिजत ठेवावेत. सकाळी उठल्यावर हे दाणे चावून खावेत आणि त्याचे पाणीही प्यावे. असे नियमित केल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यासोबतच पचनसंस्थाही सुधारते.
सांधेदुखी आणि आर्थरायटिसमध्ये आराम
ज्या लोकांना आर्थरायटिस किंवा सांधेदुखीचा त्रास आहे, त्यांच्यासाठीही मेथीचे सेवन उपयुक्त ठरते. भिजवलेली मेथी खाल्ल्याने शरीरात जास्त उष्णता निर्माण होत नाही आणि सांध्यांतील वेदना कमी होण्यास मदत मिळते. काही ठिकाणी आर्थरायटिसच्या रुग्णांना मेथीचे लाडूही दिले जातात, असेही आचार्य बालकृष्ण सांगतात.
पोटातील संसर्गावर नैसर्गिक उपाय
पोटात संसर्ग किंवा सूज झाल्यास मेथी आणि ओव्याचा काढा फायदेशीर ठरतो. विशेषतः महिलांमध्ये डिलिव्हरीनंतर होणारी सूज किंवा संसर्ग कमी करण्यासाठी मेथीचा उपयोग केला जातो. तसेच गर्भाशय किंवा अंडाशयाशी संबंधित काही त्रासांमध्येही मेथीचे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.
सायटिका आणि वेदनांवर प्रभावी उपाय
ज्यांना सायटिका किंवा तीव्र पाठदुखीचा त्रास असतो. त्यांनी हळद, मेथी व सुंठ समान प्रमाणात घेऊन त्याचे चूर्ण तयार करावे. हे चूर्ण सकाळ-संध्याकाळ एकेक चमचा घेतल्यास वेदनांमध्ये आराम मिळू शकतो. हा उपाय सांधेदुखीवरही उपयोगी ठरतो.
सर्दी-पडशातही मिळतो आराम
सर्दी किंवा पडसे झाल्यास अंकुरित मेथीचे दाणे खाणे फायदेशीर ठरते. तसेच रोजच्या आहारात थोड्या प्रमाणात मेथीचा समावेश केल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते आणि सर्दी-पडशाचा त्रास कमी होऊ शकतो.
दुधासोबत मेथी घेतल्यास पचन सुधारते
ज्यांना दूध पचत नाही किंवा पोटात गॅस होतो, त्यांनी मेथीचे दाणे भाजून त्याची बारीक पूड तयार करावी. ही पूड थोड्या प्रमाणात दुधात मिसळून प्यायल्यास पचनक्रिया सुधारते आणि गॅसची समस्या कमी होते. आचार्य बालकृष्णांच्या मते, कॉफीऐवजी दुधात भाजलेली मेथी घालून पिणे अधिक आरोग्यदायी ठरते.
डोकेदुखी आणि अर्धशिशी मध्येही मदत
ज्यांना वारंवार डोकेदुखी किंवा अर्धशिशीचा त्रास होतो, त्यांनी रात्री मेथीचे दाणे भिजत ठेवून सकाळी ते खावेत किंवा त्याचे पाणी प्यावे. विशेषतः कफ किंवा वातदोषामुळे होणाऱ्या डोकेदुखीत हा उपाय उपयुक्त ठरतो.
एकूणच पाहता, स्वयंपाकघरातील साधेसे मेथीचे दाणे योग्य पद्धतीने घेतल्यास डायबिटीज, पचनाच्या समस्या, सांधेदुखी, सर्दी-पडसे आणि डोकेदुखी यांसारख्या अनेक त्रासांपासून आराम मिळू शकतो. त्यामुळे रोजच्या आहारात मेथीचा समावेश केल्यास आरोग्य अधिक चांगले राहू शकते.
(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
