अन्न आणि पाणी या जीवनाच्या दोन मूलभूत गरजा आहेत. निरोगी आरोग्यासाठी या दोन्ही गोष्टींचा योग्य समतोल राखणे गरजेचे आहे. पौष्टिक अन्न आपल्या शरीराची ऊर्जा पातळी उत्तम राखते, तर आपल्या शरीरात ७० टक्के पाणी आहे, त्यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत होते. अन्न आणि पाणी या दोन्हीचे शरीरासाठी वेगवेगळे फायदे आहेत. पण, अनेकदा जेवताना पाणी प्यायल्यावर घरातील मोठी मंडळी थांबवतात. जेवताना पाणी प्यायचे नाही असा सल्ला देतात. पण, यामागचे खरे कारण काय? याविषयी जाणून घेऊ…

पोट फुगणे

जेवणात किंवा जेवल्यानंतर पाणी प्यायल्याने पोटातील आम्ल आणि आवश्यक पाकाचे एन्झाइम्स पातळ होतात, यामुळे पीएच पातळी वाढते आणि पचनक्रिया मंदावते, यामुळे पोट फुगण्याची समस्या वाढते.

आम्लपित्त आणि अस्वस्थता

आयुर्वेदानुसार, जेवणादरम्यान पाणी प्यायल्याने शरीराच्या तापमानात अचानक बदल होऊ शकतो, ज्यामुळे शरीराला अचानक धक्का बसून आम्लपित्त किंवा अस्वस्थता निर्माण होऊ शकते.

Award Banner

खराब चयापचय

जेवणाबरोबर जास्त पाणी प्यायल्याने कालांतराने चयापचय क्रिया कमकुवत होऊ शकते. पचनसंस्था कमकुवत झाल्यामुळे ऊर्जेची कमतरता भासू शकते, ज्यामुळे पोषक तत्त्वांचे शोषण नीट होत नाही.

पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती?

जेवताना गरजेनुसार कोमट पाणी थोड्या थोड्या प्रमाणात प्या.

जेवणानंतर लगेच पाणी पिणे टाळा.

जेवणानंतर २० ते ३० मिनिटांनीच व्यवस्थित पाणी प्या.

जेवल्यानंतर थोडावेळ चालल्याने पचनास मदत होते.