5 Lifestyle Changes for Normal Blood Pressure: हिवाळ्यातील कडाक्याची थंडी अनेकांना आवडते. मात्र, याच थंडीत हृदयविकाराचा झटका आणि मेंदूविकाराचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढताना दिसते. यामागचे सर्वांत मोठे कारण म्हणजे रक्तदाब अचानक वाढणे. ही वाढ इतकी शांतपणे होते की, अनेकदा रुग्णांना त्याची जाणीवही होत नाही. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील (एम्स, नवी दिल्ली) हृदयरोग विभागाचे प्रमुख तज्ज्ञ डॉ. राजीव नारंग यांनी थंडीमुळे रक्तदाबात होणाऱ्या बदलांबाबत आणि त्यापासून बचावासाठी अत्यंत महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
डॉ. नारंग सांगतात की, तीव्र थंडी शरीरावर आतून परिणाम करते. थंड हवामानात शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. या प्रक्रियेमुळे रक्तप्रवाहावरील दाब वाढतो आणि परिणामी रक्तदाब धोकादायक पातळीवर पोहोचतो. दरवर्षी हिवाळ्यात अनेक रुग्ण त्यांच्या दवाखान्यात येतात आणि सांगतात की, काही महिन्यांपूर्वीपर्यंत रक्तदाब पूर्णपणे नियंत्रणात होता; मात्र थंडी सुरू होताच मोजमाप अचानक वाढले.
रक्तदाब वाढल्याची काही लक्षणेही दिसू शकतात. चालताना अचानक दम लागणे, थोडेसे अंतर चालल्यावरही थकवा जाणवणे, छातीवर दडपण येणे, अस्वस्थता किंवा छातीत वेदना जाणवणे ही त्यातील प्रमुख लक्षणे आहेत. वेळेत लक्ष दिले नाही, तर ही स्थिती थेट हृदयविकाराच्या झटक्यात रूपांतरित होऊ शकते. चिंतेची बाब म्हणजे रक्तदाबासाठी नियमित औषधे घेणाऱ्या व्यक्तींनाही हा धोका असतो. कारण- थंडीत काही वेळा औषधांचा परिणामही अपुरा ठरतो.
रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी डॉ. नारंग यांनी पाच अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या
पहिली आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे रक्तदाबाची नियमित तपासणी. शक्य असल्यास घरात रक्तदाब मोजण्याचे यंत्र ठेवा. ज्यांना रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी दररोज तपासणी करावी. मोजमाप १४०/९० पेक्षा जास्त आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, जेणेकरून औषधांमध्ये बदल करता येईल.
दुसरी गोष्ट म्हणजे आहारातील मिठाचे प्रमाण कमी ठेवणे. हिवाळ्यात फराळ, चटपटीत पदार्थ आणि तेलकट खाद्यपदार्थांचे सेवन वाढते. त्यामध्ये मीठ अधिक असल्याने रक्तदाब वाढण्याचा धोका वाढतो. त्यामुळे आहारात मिठाचे प्रमाण मर्यादित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
तिसरी गोष्ट म्हणजे पुरेसे पाणी पिणे. थंडीमध्ये तहान कमी लागते. त्यामुळे अनेक लोक पाणी कमी पितात. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते आणि रक्तदाब वाढतो. थंडी असली तरी दिवसातून पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे.
चौथी गोष्ट म्हणजे थंड व प्रक्रिया केलेले अन्न टाळणे. हिवाळ्यात पचनशक्तीवर परिणाम होतो. त्यामुळे गरम, मऊ आणि पचायला हलके अन्न घ्यावे. आठवड्यातून एक-दोन वेळा वरण-भात किंवा खिचडीसारखे साधे अन्न घेणे फायदेशीर ठरते.
पाचवी आणि शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्याबाबत सतर्क राहणे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, आधीपासून हृदयविकार किंवा रक्तदाबाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी अधिक काळजी घ्यावी. नियमित तपासणी, योग्य आहार, पाणी पिण्याची सवय आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला घेतल्यास हिवाळ्यातही आरोग्य सुरक्षित ठेवता येते.
