वजन कमी करण्यासाठी आपण बरेच परिश्रम करतो. पण यामुळे केवळ व्यायाम करणाऱ्या व्यक्तीलाच नव्हे तर इतरांनाही फायदा होतो असे एका अभ्यासात पुढे आले आहे. तुम्ही जर काही किलो वजन कमी केले तर जोडीदारालाही त्याचा आपोआप लाभ होतो.

संशोधकांच्या अभ्यासानुसार जोडीदारापैकी एकाने वजन कमी केले तरी दुसरी व्यक्ती पुरेसा व्यायाम करत नसेल तरी काही प्रमाणात त्यालाही त्याचा लाभ होतो. संशोधकांनी यासाठी सहा महिने १३० जोडप्यांवर अभ्यास केला. त्यात जवळपास तीस टक्के जोडप्यांनी फारसा व्यायाम न करता देखील त्यांच्या वजनात तीन टक्के घट झाल्याचा निष्कर्ष अभ्यासकांनी काढला आहे.

तीन टक्के वजन कमी होणे हे देखील काही कमी नाही. एखादी व्यक्ती जर स्वत:मध्ये बदल घडवत असेल तर स्वाभाविकच त्याच्या आजूबाजूला वावरणाऱ्यांवर त्याचे परिणाम होतात, असे मत अमेरिकेतील कनेक्टिकट विद्यापीठातील अमे गोरिन यांनी स्पष्ट केले. अर्थात त्याचे सकारात्मक तसेच नकारात्मक परिणाम देखील आहेत. एखाद्या व्यक्तीला वजन कमी करता येत नसेल तर जोडीदारावरही त्याचे प्रतिकूल परिणाम होतात. खाण्याच्या व व्यायामाच्या सवयी आपण कशा बदलतो त्यानुसार हे परिणाम होतात असे गोरिन यांनी स्पष्ट केले.