Weight loss tips in Marathi : धावपळीच्या जीवनशैलीत वाढते वजन ही अनेकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. वजन कमी करण्याआधी लोक नाना उपाय करताना दिसतात. अनेकदा लोकांना वजन कमी करण्यासाठी शार्टकट पर्याय हवा असतो. एका रात्री वजन कधीच कमी होत नाही याचाच लोकांना विसर पडतो. वजन कमी करण्यासाठी संयम, शिस्त आणि सातत्य राखावे लागते. हेच सिद्ध करणारा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. एका मध्यमवयीन महिलेने नुकताच २८ किलो वजन कमी करण्याचा तिचा प्रवास शेअर केला. इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत मीनल पाटील यांनी सांगितले की, जानेवारी २०२६मध्ये माझे वजन तब्बल १२५ किलो होते आणि सध्या ९७ किलो आहे. कारण मला चांगले वाटावे असे वाटत होते म्हणून मी वजन कमी करण्यास प्रयत्न सुरु केले. मला सतत धाप लागत होती. माझे शरीर मला हवे तसे आयुष्य जगण्यापासून रोखत होते. सातत्य आणि संयम राखल्याने वजन कमी करणे शक्य झाले. वेदना, त्या त्याच जुन्या आणि कंटाळवण्या गोष्टी मी करत राहिले. मला पिझ्झा, चीजकेक आणि वडापाव खाता येत नव्हता म्हणून मी रडले. यामध्ये कोणतीही जादू किंवा शार्टकट नाही. माझे ध्येय अजूनही साध्य झालेले नाही. माझे ध्येय ७५ किलो आहे. असे मिनल पाटील यांनी इंस्टाग्रामवर सांगितले.

वजन कमी करण्याबाबत तज्ज्ञांच मत काय

सल्लागार आहारतज्ज्ञ आणि फिटनेस तज्ज्ञ गरिमा गोयल यांनी मीनल यांच्या वजन कमी करण्याचा हा प्रवास अनेकांना आपलासा आणि प्रेरणादायी वाटतो कारण तिने वजन कमी करणे म्हणजे एका रात्रीत घडणारी गोष्ट आहे असे सांगितले नाही.

वजन कमी करताना सातत्य आणि संयम हवाच

तब्बल २८ किलो वजन कमी करणे ही निश्चितच मोठे यश आहे पण यामागे एखादा परिपूर्ण डाएट प्लॅन किंवा व्यायामाचा एकच प्रकार नसून, दीर्घकाळ सातत्याने प्रयत्न करून केले आहेत. मीनल यांनी सांगितल्याप्रमाणे, रोज परिपूर्ण असण्यापेक्षा सातत्य राखणे अधिक महत्त्वाचे आहे,” असे गरिमा गोयल यांनी सांगितले.

अर्थात, काही दिवस व्यक्तीला आपली दिनचर्या ठरल्याप्रमाणे पाळता येत नाही. कितीही मेहनत केली तरी काही वेळा वजनकाट्यावरील आकडा बदलत नाही, तर काही वेळा व्यायाम किंवा आहाराचे पथ्य पाळण्यासाठी मनातून प्रेरणाही कमी होते. अशा वेळी संयम राखणे अत्यंत आवश्यक असते, असे गरिमा गोयल यांनी सांगितले.

वजन कमी करताना निराशा येते पण…

“वजन कमी होण्याची प्रक्रिया नेहमीच एकसारखी नसते. शरीरातील पाण्याचे प्रमाण, अन्नाचे सेवन, हार्मोन्समधील बदल आणि शरीरातील इतर नैसर्गिक प्रक्रियांमुळे वजनात चढ-उतार होत असतात. त्यामुळे दररोज वजनकाट्यावर दिसणाऱ्या आकड्याकडे लक्ष दिल्यास निराशा येऊ शकते,” असे गोयल यांनी स्पष्ट केले.

ज्यांचे सुरुवातीचे वजन अधिक आहे, त्यांच्यासाठी हळूहळू होणारी प्रगतीसुद्धा एकूण आरोग्य आणि शारीरिक तंदुरुस्तीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरू शकते. मात्र, केवळ ७५ किलो वजनाचे अंतिम लक्ष्य शक्य तितक्या लवकर गाठण्यावर लक्ष केंद्रित करू नये. हे लक्ष्य गाठल्यानंतरही दीर्घकाळ टिकवता येतील, अशा आरोग्यदायी सवयी अंगीकारणे अधिक महत्त्वाचे आहे, असे गोयल यांनी सांगितले.

आहाराच्या दृष्टीने काय महत्त्वाचे?

इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना गरिमा गोयल यांनी सांगितले की, लक्षणीय वजन कमी करण्यासाठी शरीराला लागणाऱ्या ऊर्जेपेक्षा कमी कॅलरी घेणे, पुरेशा प्रमाणात प्रथिने, फायबरयुक्त पदार्थ आणि संतुलित आहार यांचा समावेश असणे आवश्यक आहे. त्यासाठी अतिशय कठोर आहारनियम किंवा अन्नपदार्थांवर अनावश्यक बंधने घालणे टाळावे.

“नियमित शारीरिक हालचाल आणि योग्य परिस्थितीत वेट ट्रेनिंग किंवा रेसिस्टन्स ट्रेनिंग केल्याने शारीरिक क्षमता सुधारण्यास तसेच वजन कमी करताना स्नायूंचे प्रमाण टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते,” असेही त्यांनी सांगितले.

मीनल यांचा प्रवास आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधतो. वजन कमी करण्याचे अंतिम लक्ष्य गाठल्यानंतरच आपल्या यशाचा आनंद साजरा करावा, असे नाही. १२५ किलोवरून ९७ किलोपर्यंत पोहोचणे हाच मोठा बदल आहे.

“शारीरिक तंदुरुस्ती, ताकद, हालचालींमधील सहजता आणि आरोग्यदायी सवयी यामध्ये होणारी प्रत्येक सकारात्मक सुधारणा महत्त्वाची असते,” असे गरिमा गोयल यांनी सांगितले.

डिस्क्लेमर : हा लेख सार्वजनिकरीत्या उपलब्ध माहिती आणि तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. कोणताही नवीन आहार किंवा व्यायाम सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा किंवा आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.