Depression in Women Statistics: आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक जीवनशैलीत मानसिक ताणतणाव प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग झाला आहे. मात्र, या ताणाचा सर्वाधिक फटका नेमका कोणाला बसतो याचा विचार केला तर एक धक्कादायक चित्र समोर येते. पुरुष अजूनही तुलनेने आनंदी दिसत असताना, महिलांमध्ये नैराश्य (डिप्रेशन) आणि चिंताग्रस्तता (एंग्झायटी) यांचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याचे समोर आले आहे. ही केवळ चर्चा नसून जागतिक स्तरावरील अहवालातून उघड झालेली वस्तुस्थिती आहे.

World Health Organization (WHO) च्या ताज्या अहवालानुसार, २०११ साली जगभरात सुमारे ५८.२ कोटी महिला कोणत्या ना कोणत्या मानसिक आरोग्य समस्येशी झुंज देत होत्या. त्याच वेळी पुरुषांची संख्या ५१.३९ कोटी इतकी होती. या आकडेवारीतून महिलांवरील मानसिक ताणाचे गंभीर स्वरूप स्पष्ट होते.

अहवालात नमूद केल्याप्रमाणे, नैराश्याच्या एकूण रुग्णांपैकी ६४.९ टक्के महिला आहेत, तर पुरुषांचे प्रमाण ३५.१ टक्के आहे. चिंताग्रस्ततेच्या विकारांमध्येही ६२.६ टक्के महिला बाधित असल्याचे आढळले आहे. विशेष म्हणजे २० ते २४ वयोगटातील तरुण महिलांमध्ये ही समस्या अधिक प्रकर्षाने दिसून येते. अन्नाशी संबंधित विकारांमध्ये (ईटिंग डिसऑर्डर)देखील महिलांचे प्रमाण ६३.३ टक्के असून पुरुषांचे प्रमाण केवळ ३६.७ टक्के आहे. तज्ज्ञांच्या मते, महिलांमध्ये नैराश्य येण्याची शक्यता पुरुषांच्या तुलनेत सुमारे दीडपट अधिक आहे.

मग महिलाच अधिक का प्रभावित होतात? यामागील कारणे बहुआयामी आहेत. मासिक पाळी, गर्भधारणा, प्रसूतीनंतरचा काळ आणि रजोनिवृत्ती यांसारखे हार्मोनल बदल महिलांच्या मानसिक स्थितीवर परिणाम करतात. या जैविक प्रक्रियांमुळे भावनिक चढउतार अधिक तीव्र होतात.

याशिवाय सामाजिक आणि कौटुंबिक दबावही मोठा घटक आहे. घराची जबाबदारी, मुलांची व ज्येष्ठांची देखभाल, कार्यालयातील स्पर्धा आणि भेदभाव, आर्थिक असुरक्षितता या सर्व गोष्टी महिलांवर अतिरिक्त ताण निर्माण करतात. अनेक महिलांना कौटुंबिक हिंसा किंवा लैंगिक अत्याचारालाही सामोरे जावे लागते. अशा अनुभवांमुळे नैराश्य, चिंताग्रस्तता आणि आघातानंतरचा ताण विकार (PTSD) अधिक तीव्र होतो.

करोना महामारीने ही परिस्थिती आणखी गंभीर केली. महामारीच्या काळात महिलांमध्ये नैराश्याच्या घटनांमध्ये सुमारे ३० टक्क्यांनी आणि चिंताग्रस्ततेच्या घटनांमध्ये जवळपास २८ टक्क्यांनी वाढ झाल्याचे अहवालात नमूद आहे. घरातून काम, वाढलेली जबाबदारी आणि सामाजिक एकाकीपण यामुळे मानसिक ताण अधिकच वाढला.

तज्ज्ञांच्या मते, या दरीला कमी करण्यासाठी लिंगसंवेदनशील मानसिक आरोग्य धोरणांची तातडीने अंमलबजावणी आवश्यक आहे. गर्भधारणा आणि प्रसूतीनंतरच्या काळात विशेष समुपदेशन, घरगुती हिंसाचार पीडितांसाठी आधारव्यवस्था, तसेच कार्यस्थळी समानता आणि सुरक्षित वातावरण निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे.

एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, महिला मानसिक आरोग्याच्या लढाईत अधिक जड ओझे उचलत आहेत. हा फरक कमी करणे केवळ महिलांसाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजाच्या निरोगी भविष्यासाठी अत्यावश्यक आहे. मानसिक आरोग्याबाबत जागरूकता, समज आणि संवेदनशीलता वाढविणे ही काळाची गरज बनली आहे.