Green Moong Benefits: वयाच्या तिशीनंतर महिलांच्या शरीरात विविध हार्मोनल बदल होतात आणि त्यांची हाडे कमकुवत होऊ लागतात. अशा परिस्थितीत महिलांच्या शरीराला लोह, प्रथिने व कॅल्शियमसह पुरेशा पोषणाची आवश्यकता असते. तथापि, महिलांना अनेकदा स्वतःसाठी वेळ काढणे कठीण जाते किंवा त्या योग्य प्रमाणात अन्न सेवन करू शकत नाहीत. जर तुम्ही शाकाहारी असाल, तर भिजवलेले हिरवे मूग प्रथिनांचा सर्वोत्तम स्रोत मानले जातात.

हिरवे मूग हे भारतीय आहारातील एक महत्त्वाचे आणि पौष्टिक कडधान्य आहे. त्यामध्ये शरीराला आवश्यक असणारी प्रथिने, फायबर, लोह, फोलेट, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि विविध बी-समूहातील जीवनसत्त्वे आढळतात. हिरवे मूग डाळ, उसळ, खिचडी किंवा मोड आलेल्या स्वरूपात खाल्ले जातात. योग्य प्रमाणात हिरव्या मुगांचा आहारात समावेश केल्यास शरीराला अनेक पोषक घटक मिळू शकतात.

भिजवलेले मूग

मुगाचे कोंब हा एक आरोग्यदायी आणि पोषक तत्त्वांनी समृद्ध आहार मानला जातो. शाकाहारी लोकांसाठी ते प्रथिनांचा एक उत्तम स्रोत आहेत. त्यामध्ये व्हिटॅमिन बी६, व्हिटॅमिन सी, लोह, फायबर, पोटॅशियम, तांबे, फॉस्फरस, फोलेट, रायबोफ्लेविन, मॅग्नेशियम, प्रथिने, नियासिन व थायमिन यांसारखी अनेक आवश्यक पोषक तत्त्वे असतात. वयाच्या तिशीत त्यांचे सेवन केल्याने ऊर्जेची पातळी टिकवून ठेवण्यास आणि प्रथिनांची कमतरता टाळण्यास मदत होऊ शकते.

जर तुम्ही दररोज सकाळी १०० ग्रॅम भिजवलेले मूग खाल्ले, तर तुम्हाला ३२ ग्रॅम प्रथिने मिळतील. दिवसाला ३२ ग्रॅम प्रथिने घेणे शरीरासाठी खूप आरोग्यदायी आणि फायदेशीर आहे. एवढ्या प्रथिनांचे सेवन केल्याने तुम्हाला दिवसभर सक्रिय राहण्यास मदत होऊ शकते.

फायदे काय आहेत?

पचनसंस्था – भिजवलेले मूग खाल्ल्याने पचनसंस्था सुधारते. आतड्यांच्या आरोग्यासाठी हे मोड आलेले मूग खाणे आवश्यक आहे. ते केवळ बद्धकोष्ठता आणि आम्लपित्तापासून आराम देत नाहीत, तर पोटाला थंडावादेखील देतात.

वजन कमी करणे – ज्या महिलांना प्रसूतीनंतर वजन कमी करायचे आहे, त्यांनी भिजवलेले मूग खावेत. त्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त आणि कॅलरीज कमी असल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. तसेच, यामुळे पोट भरल्यासारखे वाटते.

रोगप्रतिकारशक्तीसाठी – रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी तुम्ही भिजवलेले मूगदेखील खाऊ शकता. त्यामध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.

त्वचा आणि केस – जर तुमची त्वचा सैल, सुरकुतलेली किंवा इतर प्रकारे खराब झालेली दिसत असेल, तर भिजवलेले मूग खा. भिजवलेल्या मुगामध्ये असे घटक असतात, जे त्वचेची आतून दुरुस्ती करतात. त्यामुळे केसांची वाढदेखील सुधारते.

हाडांसाठी – कॅल्शियमने समृद्ध असलेले हिरवे मूग खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. हिवाळ्यात हाडांचे दुखणे, हाडे कटकटणे व सूज यांपासून आराम मिळू शकतो.

कसे खावे?

मूग रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी ते स्वच्छ पाण्याने धुऊन उकडून खा. तुम्ही त्यात टोमॅटो, भिजवलेले चणे आणि मीठदेखील घालू शकता.