UTI in Women: युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजेच UTI ही एक सामान्य समस्या आहे. मात्र पुरुषांच्या तुलनेत महिलांना याचा धोका जास्त असतो. यामध्ये लघवी करताना जळजळ होणे, वारंवार लघवीला लागणे, लघवी करताना दुखणे आणि कधी-कधी लघवीत रक्त येणे अशी लक्षणे दिसू शकतात. याबाबत अपोलोच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे की, इन्फेक्शन वाढल्यास ताप येणे, थंडी वाजणे, कंबर किंवा पाठीच्या खालच्या भागात दुखणे आणि उलटी होणे अशा समस्याही होऊ शकतात.

महिलांनाच UTI जास्त का होतो? यामागे फक्त स्वच्छतेचा अभाव कारणीभूत नसतो, तर महिलांच्या शरीराची रचना, काही हार्मोनल बदल आणि जीवनशैलीशी संबंधित गोष्टीही महत्त्वाच्या असतात.

महिलांना UTI जास्त होण्याचे सर्वात मोठे कारण काय?

महिलांची युरेथ्रा म्हणजे ज्या नळीमधून लघवी शरीराच्या बाहेर जाते, ती पुरुषांच्या तुलनेत छोटी असते. तसेच, तिचे तोंड योनीच्या अगदी जवळ असते. आतड्यांमध्ये असलेले बॅक्टेरिया सहजपणे युरेथ्रापर्यंत पोहोचू शकतात आणि तिथून ब्लॅडरमध्ये जाऊन इन्फेक्शन होऊ शकते.

सेक्सुअल अ‍ॅक्टिव्हिटीमुळेही वाढू शकतो धोका

सेक्सच्या वेळी आजूबाजूला असलेले बॅक्टेरिया युरेथ्रापर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे काही महिलांना सेक्सुअल अ‍ॅक्टिव्हिटीनंतर वारंवार UTI होण्याची समस्या जाणवू शकते. काही औषधे घेतल्यामुळे किंवा स्वच्छतेची योग्य काळजी न घेतल्यामुळेही असे इन्फेक्शन होऊ शकते.

प्रेग्नन्सीमध्ये UTI चा धोका का वाढतो?

प्रेग्नन्सीदरम्यान शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात. वाढणाऱ्या बाळामुळे ब्लॅडरवर दबाव येतो. त्यामुळे काही महिलांना ब्लॅडर पूर्णपणे रिकामा करणे कठीण होऊ शकते. ब्लॅडरमध्ये राहिलेल्या लघवीमुळे बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता असते. प्रेग्नन्सीदरम्यान UTI ची लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

मेनोपॉजनंतरही वाढू शकतो धोका

मेनोपॉजच्या काळात इस्ट्रोजेन हार्मोनची पातळी कमी होते. त्यामुळे योनी आणि आजूबाजूच्या भागातील टिश्यूमध्ये बदल होऊ शकतात आणि ड्रायनेस जाणवू शकतो. यामुळे बॅक्टेरिया युरिनरी ट्रॅक्टमध्ये सहजपणे जाऊ शकतात आणि UTI चा धोका वाढू शकतो.

डायबिटीजसारख्या आजारामुळेही वाढू शकतो धोका

डायबिटीज असलेल्या महिलांमध्येही UTI होण्याचा धोका जास्त असू शकतो. याशिवाय किडनी किंवा युरिनरी ट्रॅक्टमध्ये स्टोन असणे, लघवी पूर्णपणे बाहेर न पडणे आणि युरिनरी ट्रॅक्टमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा असणे यामुळेही इन्फेक्शनचा धोका वाढू शकतो.

UTI ची ही लक्षणे दुर्लक्षित करू नका

यापैकी कोणतेही लक्षण तुम्हाला सतत जाणवत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

  • लघवी करताना जळजळ किंवा दुखणे
  • वारंवार लघवीला लागणे
  • थोडी-थोडी लघवी वारंवार होणे
  • लघवीमध्ये रक्त दिसणे
  • लघवीचा रंग बदलणे किंवा दुर्गंधी येणे
  • पोटाच्या खालच्या भागात दुखणे

UTI पासून बचाव करण्यासाठी काय करावे?

अपोलो हॉस्पिटलच्या माहितीनुसार, UTI चा धोका कमी करण्यासाठी पुरेसे पाणी पिणे, जास्त वेळ लघवी रोखून न ठेवणे आणि इंटिमेट एरियाच्या स्वच्छतेची काळजी घेणे फायदेशीर ठरू शकते. सेक्सुअल अ‍ॅक्टिव्हिटीनंतर लघवी केल्यानेही काही महिलांमध्ये इन्फेक्शनचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते.

(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)