स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने पगार मिळण्यासाठी अजून सत्तर वर्षांचा कालावधी लागू शकतो. पुरुषांच्या तुलनेत महिलांना सरासरी ७७ टक्के पगार मिळत असल्याचे अंतरराष्ट्रीय श्रमिक संघटनेने रविवारी सांगितले. लिंगाधारीत पगारातील असमानतेत वाढ झाल्याचे आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी आंतरराष्ट्रीय श्रम आयोगाने जाहीर केले. संतती असलेल्या आणि संतती नसलेल्या दोन्ही प्रकारच्या स्त्रियांबाबत ही असमानता पाहायला मिळते. सर्वसाधारपणे पुरुषांच्या उत्पन्नाच्या तुलनेत स्त्रियांचे उत्पन्न हे सरासरी ७७ टक्के इतके आहे. उच्च वेतन मिळविणाऱ्या स्त्रियांमध्ये हा फरक अधिक आहे. ‘आयएलओ’चे गाय रायडर म्हणाले, २० वर्षापूर्वीच्या तुलनेत कामाच्या ठिकाणी स्त्रियांसाठीच्या स्थितीत चांगले बदल झाले आहेत का? या प्रश्नाचे उत्तर होय असेल. परंतू, या संदर्भातील प्रगती अपेक्षेप्रमाणे झाली आहे का? तर त्याचे उत्तर नाही असेल. अपेक्षित बदल साधण्यासाठी प्रगतीशील होणे आणि स्त्रियांचे कामाचे अधिकार सुनिश्चित करणे यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. संयुक्त राष्ट्राच्या विशेष एजन्सीने सांगितले की, याविषयी लक्षवेधी उपाययोजना न केल्यास स्त्रिया आणि पुरुषांच्या उत्पन्नात समानता येण्यासाठी २०८६ सालापर्यंत किंवा कमीतकमी ७१ वर्षे वाट पाहावी लागेल. सध्या जगभरात नोकरी-धंदा करणा-यांमध्ये पुरूषांचे प्रमाण ७७ टक्के आणि हेच प्रमाण स्त्रियांमध्ये ५० टक्के आहे.
सर्व प्रकारच्या व्यापारक्षेत्रात स्त्रियांचा ३० टक्क्यांपेक्षा अधिक वाटा असून, तो छोट्या उद्योगांवर केंद्रीत असल्याचा निष्कर्ष समोर आला असल्याचेही सर्वेक्षणात समोर आले आहे. तसेच जागतिक पातळीवर १९ टक्के स्त्रिया या कंपनी अथवा संस्थेच्या ‘बोर्ड मेंबर्स’च्या स्थरावर काम करत असल्याचे दिसून आले असून, जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांनध्ये केवळ ५ टक्के स्त्रिया या ‘सीईओ’ पदावर कार्यरत आहेत.