Do Not Eat These Food: सध्या महिलांमध्ये पीसीओडी (PCOD – Polycystic Ovarian Disease) ही समस्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. बदलती जीवनशैली, ताणतणाव, अपुरी झोप, असंतुलित आहार व शारीरिक हालचालींचा अभाव ही त्यामागील प्रमुख कारणे मानली जातात. पीसीओडीमुळे मासिक पाळी अनियमित होणे, वजन वाढणे, चेहऱ्यावर मुरमे येणे, केस गळणे, अनावश्यक केसांची वाढ आणि प्रजननक्षमतेशी संबंधित अडचणी निर्माण होऊ शकतात. मात्र, योग्य आहार, नियमित व्यायाम, वजन नियंत्रण, ताण कमी करणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेतल्यास या समस्येवर प्रभावीपणे नियंत्रण मिळवता येते. त्यामुळे लक्षणांकडे दुर्लक्ष न करता, वेळेवर तपासणी करणे आणि आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

PCOD (पॉलीसिस्टिक ओव्हेरियन डिसीज)मध्ये काही घरगुती सवयी आणि जीवनशैलीतील बदलांमुळे लक्षणांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकते.

  • संतुलित आणि प्रथिनयुक्त आहार घ्या आणि साखर व अति प्रक्रिया केलेले पदार्थ कमी खा.
  • दररोज किमान ३० ते ४५ मिनिटे चालणे, योग किंवा व्यायाम करा.
  • पुरेशी (सात ते नऊ तास) झोप घ्या आणि ताण कमी करण्यासाठी ध्यान किंवा प्राणायामाचा आधार घ्या.
  • वजन जास्त असल्यास, अगदी ५ ते १०% वजन कमी झाल्यानेही काही महिलांमध्ये पाळी नियमित होण्यास आणि इन्सुलिन रेझिस्टन्स कमी होण्यास मदत होऊ शकते.
  • दालचिनी, मेथी किंवा जवस यांसारख्या पदार्थांबाबत काही प्राथमिक संशोधन उपलब्ध असले तरी ते PCOD वर निश्चित उपचार आहेत, असे म्हणता येत नाही.

PCOD मध्ये कोणते पदार्थ मर्यादित ठेवावेत किंवा टाळावेत?

PCOD (Polycystic Ovarian Disease)मध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स, हार्मोन्समधील असंतुलन आणि काही महिलांमध्ये वजन वाढण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे आहाराकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असते. परंतु, PCOD ग्रस्त सर्व महिलांसाठी कोणताही पदार्थ कायमचा बंद करणे गरजेचे नाही; मात्र त्यांनी शक्यतो कमी प्रमाणात किंवा मर्यादित खावेत असे पदार्थ खालीलप्रमाणे :

  • साखरयुक्त पदार्थ
  • सॉफ्ट ड्रिंक्स आणि साखरयुक्त पेये
  • मैद्यापासून बनवलेले पदार्थ
  • तळलेले आणि फास्ट फूड
  • जास्त प्रक्रिया केलेले (Processed) पदार्थ
  • ट्रान्स फॅट आणि जास्त संतृप्त चरबी असलेले पदार्थ
  • जास्त साखर असलेले डेझर्ट
  • मद्यपान

PCOD मध्ये काय खावे?

  • भरपूर भाज्या
  • कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेली फळे
  • संपूर्ण धान्य (ज्वारी, बाजरी, ओट्स, ब्राऊन राईस)
  • डाळी, कडधान्ये
  • अंडी, मासे (खात असल्यास)
  • सुका मेवा आणि बिया (बदाम, अक्रोड, जवस, भोपळ्याच्या बिया)
  • पुरेसे पाणी

(महत्त्वाची टीप : PCOD असलेल्या प्रत्येक महिलेची प्रकृती वेगळी असते. त्यामुळे वैयक्तिक गरज, वजन, रक्तातील साखर आणि इतर आरोग्य स्थिती लक्षात घेऊन आहार ठरवावा. कोणताही पदार्थ पूर्णपणे बंद करण्यापूर्वी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.)