करोना विषाणूच्या संकटामुळे कॉर्पोरेट क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीला घरी राहून वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून काम करावे लागत आहे. करोनाच्या पहिल्या लाटेपासून अजूनही काही कंपन्यांमध्ये बर्‍याच कालावधीपासून वर्क फ्रॉम होम सुरू आहे. वर्क फ्रॉम होममुळे आपल्याला बऱ्याच वेळ एकाच ठिकाणी बसून काम करावे लागते. या कालावधीत काम करताना आपल्या आठ तासांची ड्यूटी कधी नऊ दहा तासांच्या वर होऊन जाते ते आपल्याला कळत नाही. वर्क फ्रॉम होममुळे एकाच जागी तासंतास बसून काम केल्याने अनेकांना शरीराच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत. त्यात विशेष करून पाठीच्या आणि मानेच्या दुखणाच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. एकाच जागी सतत बसून राहिल्याने आपल्या स्नायूंवर ताण पडल्याने मानेचा व पाठीच्या असह्य वेदना येऊ लागतात. यासाठी मानेच्या त्रासापासून मुक्तता मिळवण्यासाठी काही उपाय करणे गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊयात या खास टिप्स.

काम करताना आपली आसनव्यवस्था नीट असावी.

काम करत असताना आरामदायक खुर्चीचा वापर करा. ज्यात तुम्ही अगदी योग्य पद्धतीने बसून काम कराल. खुर्चीत बसताना तुमचे पाय हे जमिनीवर पुर्णपणे टेकलेले असावे. काम करताना तुमच्या पाठीला ताण पडू नये तसेच पाठीला आधार मिळवा म्हणून एखादी आरामदायक ऊशी ठेवा किंवा तुमच्या सोईनुसार पाठीला आधार द्यावा. याचबरोबर तुम्ही काम करत असलेल्या कंम्युटर किंवा लॅपटॉपची स्क्रीन ही तुमच्या डोळ्यांच्या नजरेपासून योग्य अंतरावर असावी. ज्यामुळे डोळ्यांबरोबर मानेला त्रास होणार नाही.

ब्रेक आणि स्ट्रेचिंग

सतत लॅपटॉप किंवा कंम्युटरसमोर काम करताना शरीराची हालचाल होत नाही. त्यामुळे शरीराच्या मज्जातंतुवर ताण पडतो. म्हणून दर ६० मिनिटांत 2 ते 5 मिनिटांचा ब्रेक घ्या. बसलेल्या जागेवरुन उठा आणि थोडे फिरा. त्याचबरोबर ब्रेक दरम्यान हात आणि पाय यासाठी स्ट्रेचिंग एक्सरसाईज करा.

मान आणि पायांच्या हालचाली

एकाच ठिकाणी तासंतास बसून राहिल्याने हात, पाय तसेच मान, पाठीचा कणा आखडल्यासारखा जाणवतो. त्यामुळे तुम्ही बसल्या ठिकाणी शरीराची हालचाल किंवा व्यायाम करा. हालचाल केल्याने रक्ताभिसरण नीट होते. हात पायंच्या मानेच्या हालचाली केल्याने मास पेशींना आराम मिळतो.

शारीरिक हालचाल

वर्क फ्रॉम होममुळे तुम्ही शारीरिक समस्येतून जात आहात. बराच वेळ एकाच ठिकाणी बसून तुमच्या शरीराची हालचाल झाली नाही, तर पायांना मुंग्या येणे, मानेला कळ बसणे, पाठ ताठणे अश्या अनेक समस्या निर्माण होतात. यासाठी तुम्ही व्यायाम केल्याने फिट रहाल आणि या समस्या दूर होतील. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन(WHO)च्या सल्लानुसार आठवड्यातून कमीत कमी 150 मिनीटे मध्यमस्वरुपाची शारीरिक हालचाल होईल असा व्यायाम आणि कमीत कमी 75 मिनीटे कठीण व्यायाम करणं गरजेचं आहे.

खांद्याचे स्ट्रेचिंग एक्सरसाईज

बसल्या जागी खांद्यांचा व्यायाम करणे सहज शक्य आहे. यासाठी हात कोपरातून दुमडा आणि हाताच्या मुठी खांद्यांवर ठेवा. या स्थितीत खांदे पुढून मागच्या दिशेने आणि पुन्हा मागून पुढच्या दिशेने फिरवा. ज्यामुळे तुमच्या मान आणि पाठीवरचा ताण कमी होईल. यासोबत दिवसभरात कमीत कमी तीस मिनीटे योगासने, प्राणायम, धावणे, पळणे, चालणे, जीममधील एक्सरसाईज केल्यास नक्कीच चांगला परिणाम दिसून येऊ शकतो.

(टीप: या टिप्सचा वापर करण्यापूर्वी आपल्या फॅमेली डॉक्टरचा अथवा या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)