World cancer day 2026: ४ फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो. २०२६ मध्ये कर्करोगाचा धोका अधिक गंभीर वाटतो, कारण हा आजार जगभरात मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. यानिमित्ताने आज आपण पॅन्क्रियाटिक कर्करोगाविषयी जाणून घेणार आहोत.

पॅन्क्रियाटिक (स्वादुपिंडाचा) कर्करोग एकूण कर्करोगांपैकी फक्त सुमारे ३ टक्के असला, तरी कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी जवळपास ७ टक्के मृत्यू याच आजारामुळे होतात. २०२२ साली, जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO) जगभरात पॅन्क्रियाटिक कर्करोगाचे सुमारे ५ लाख नवीन रुग्ण आढळले आणि जवळपास ४.७ लाख लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे तो त्या वर्षी कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या बाबतीत सहाव्या क्रमांकावर होता.याचा अर्थ असा की या आजाराचे निदान झालेल्या बहुतेक रुग्णांचे आयुष्य जास्त काळ टिकत नाही.

WHO च्या मते, हा कर्करोग बरा होण्याची शक्यता खूप कमी असलेला आहे. हा कर्करोग इतका धोकादायक असण्याचे एक मोठे कारण म्हणजे तो सुरुवातीला फारशी लक्षणे दाखवत नाही. वेदना, कावीळ किंवा अचानक वजन कमी होणे अशी लक्षणे दिसेपर्यंत कर्करोग बराच पुढे गेलेला असतो. तसेच, या कर्करोगासाठी तपासणी करणेही सोपे नाही.

कर्करोग लवकर ओळखला गेला तर तो बरा होऊ शकतो : लक्ष द्यायला हवी अशी लक्षणे

पॅन्क्रियाटिक कर्करोग हा पॅन्क्रियास या अवयवात सुरू होणारा आजार आहे. पॅन्क्रियास आपल्या पचनक्रियेत आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यात मदत करतो. या कर्करोगात पॅन्क्रियासमधील काही पेशी असामान्यरीत्या वाढू लागतात आणि गाठी तयार होतात. या गाठी बहुतेक वेळा पचनासाठी लागणारे एन्झाइम्स वाहून नेणाऱ्या नलिकांमध्ये तयार होतात.

पॅन्क्रियासच्या काही इतर प्रकारच्या गाठींमध्ये (न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर / NET) कर्करोगाच्या पेशी इन्सुलिन आणि ग्लुकागॉनसारख्या हार्मोन्सच्या कार्यात अडथळा आणतात. हे हार्मोन्स रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्याचे काम करतात.

कर्करोग वाढू लागल्यावर रुग्णांमध्ये वजन कमी होणे, पाठी व पोटात दुखणे, कावीळ, लघवीचा गडद रंग, पांढरा किंवा फिकट शौच आणि पचनाच्या तक्रारी अशी लक्षणे दिसू लागतात, असे बंगळुरू येथील KIMS हॉस्पिटलमधील वरिष्ठ सल्लागार डॉ. राघवेंद्र नगराज (GI व HPB सर्जरी, लिव्हर ट्रान्सप्लांट) सांगतात.

पॅन्क्रियास हा अवयव शरीराच्या आत खोल भागात असल्यामुळे ही लक्षणे अनेकदा उशिरा दिसतात. तसेच या आजाराबाबत असलेल्या गैरसमजांमुळे जनजागृती उशिरा होते आणि वेळेवर उपचार होऊ शकत नाहीत. पॅन्क्रियास हा लहान आतडे, पोट आणि यकृताला रक्तपुरवठा करणाऱ्या मोठ्या रक्तवाहिन्यांच्या खूप जवळ असतो. त्यामुळे कर्करोग उशिरा लक्षात आल्यास तो या रक्तवाहिन्यांपर्यंत पसरतो आणि मग पूर्णपणे बरा करणारे उपचार शक्य होत नाहीत, असे ते स्पष्ट करतात.

नोव्हेंबर महिना पॅन्क्रियाटिक कर्करोग जनजागृती महिना म्हणून पाळला जातो. या महिन्यात लोकांना या आजाराबद्दल माहिती देणे आणि त्यासंबंधी असलेले गैरसमज दूर करणे यावर भर दिला जातो. डॉ. राघवेंद्र नगराज यांनी पॅन्क्रियाटिक कर्करोगाबाबत असलेल्या सामान्य गैरसमजांवर प्रकाश टाकला आहे.

पॅन्क्रियाटिक कर्करोग फक्त वयोवृद्ध लोकांनाच होतो, असा गैरसमज आहे. प्रत्यक्षात तरुण व्यक्तींनाही हा आजार होऊ शकतो.

अनेकांना वाटते की या कर्करोगाच्या सुरुवातीलाच तीव्र वेदना होतात, पण खरे पाहता सुरुवातीची लक्षणे खूप सौम्य असतात किंवा कधी कधी अजिबात जाणवतही नाहीत. वेदना असतीलच तर त्या साधारण हलक्या स्वरूपाच्या असतात.

बर्‍याच लोकांना पॅन्क्रियाटिक कर्करोग हा फक्त आनुवंशिक आजार आहे असे वाटते आणि जीवनशैली व चयापचयाशी संबंधित कारणांकडे ते दुर्लक्ष करतात. काही जणांना असेही वाटते की नियमित रक्ततपासणी नॉर्मल आली म्हणजे पॅन्क्रियास पूर्णपणे निरोगी आहे, पण हे पूर्णपणे खरे नसते.

पॅन्क्रियाटिक कर्करोग बरा होत नाही, असे म्हणणेही चुकीचे आहे. हा कर्करोग वेळेत ओळखला गेला, किंवा आजूबाजूच्या काही रक्तवाहिन्या किंवा अवयवांपर्यंत पसरलेला असला तरी त्यांची दुरुस्ती शक्य असल्यास शस्त्रक्रिया करता येते. तसेच नव्या प्रकारच्या केमोथेरपीमुळे अनेक रुग्णांमध्ये बरे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पॅन्क्रियाटिक कर्करोग हळूहळू आणि शांतपणे वाढतो. सुरुवातीच्या टप्प्यात ठळक लक्षणे दिसत नसल्यामुळे लोकांना सगळे ठीक आहे असे वाटू शकते. पण एखादे एकच लक्षण पाहण्यापेक्षा लक्षणांचा एकूण बदल लक्षात घेणे खूप महत्त्वाचे आहे, विशेषतः हे बदल दीर्घकाळ टिकत असतील तर. कर्करोग लवकर ओळखला गेला तर पूर्णपणे बरा करणारे उपचार घेणे शक्य होते, असे त्यांनी लोकांना आवाहन केले आहे.