World Cancer Day 2026: कॅन्सर हा शब्द मुळात कोणालाही हादरवून टाकणारा आहे. हा भयावह आजार वेळीच ओळखला गेला तर जीव वाचवता येतो, नाहीतर तो जीवघेणा ठरतो. काळाबरोबर वैद्यकीय शास्त्र खूप प्रगती करत आहे. नवीन वैद्यकीय संशोधनात असे म्हटले आहे की, तुमची लाइफस्टाइल अर्थात जीवनशैली आणि आहारात काही बदल केले तर कॅन्सर रोखणे शक्य आहे. जागतिक कॅन्सर दिनाच्या निमित्ताने आरोग्य तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, काही क्षुल्लक दैनंदिन चुकांमुळे कॅन्सरचा धोका वाढत आहे. चुकीच्या आहारपद्धतीमुळे लठ्ठपणा येतो आणि लठ्ठपणामुळे अनेक प्रकारचे कॅन्सर उद्भवू शकतात. लठ्ठ महिलांमध्ये गर्भाशयाचा कॅन्सर अधिक प्रमाणात दिसून येतो.

वरिष्ठ सल्लागार आणि कॅन्सरतज्ज्ञ डॉ. ललित मोहन शर्मा यांनी दि इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, आपली नवीन पिढी पिझ्झा, बर्गर आणि जंक फूडवर अवलंबून आहे. आपले शरीर खूप कमी फायबर वापरत आहे. त्यामुळे आपल्या प्रतिकारशक्तीवर परिणाम होत आहे. कॅन्सरचा सर्वात मोठा शत्रू औषध नाही, तर तुमची जीवनशैली आणि आहार आहे. आपल्या आहारात मांसाहाराचे प्रमाण वाढत आहे, त्यामुळे कोलन कॅन्सरचा धोका वाढत आहे.

जागतिक आरोग्य संशोधनात काय सत्य समोर आले?

२०२६च्या अलिकडच्या अहवालांनुसार, निरोगी जीवनशैली आणि आहाराद्वारे अंदाजे ४० ते ५० टक्के कॅन्सरच्या घटना रोखता यतात. तंबाखू आणि अल्कोहोल सोडणे हे या दिशेने एक मोठे पाऊल आहे. तज्ज्ञांनी काही जीवनशैलीतील सवयी सांगितल्या आहेत ज्या आपल्या शरीराभोवती संरक्षणात्मक कवच निर्माण करू शकतात. या प्राणघातक आजारापासून तुम्ही स्वत:चे संरक्षण कसे करू शकता ते जाणून घेऊ…

तंबाखू आणि अल्कोहोल

तंबाखू आणि अल्कोहोलच्या सेवनामुळे कॅन्सर होऊ शकतो. तंबाखूचा धूर शरीराच्या डीएनएला नुकसान पोहोचवतो, तो दुरूस्त करणे कठीण असते. अल्कोहोल लिव्हर आणि स्तनाच्या कॅन्सरचा धोका वाढवतो. तंबाखू आणि अल्कोहोलचे सेवन टाळा. या सवयी सोडणे सोपे नाही, मात्र तुम्ही निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी वापरू शकता किंवा हळूहळू या पदार्थांचे सेवन कमी करू शकता.

शारीरिक हालचाल अत्यंत आवश्यक

चुकीच्या जीवनशैलीमुळे कॅन्सर उद्भवू शकतो. असंख्य अभ्यासातून हे सिद्ध झाले आहे की, खूप कमी शारीरिक हालचालींमुळे जळजळ वाढू शकते. व्यायामामुळे जळजळ नियंत्रित होते आणि इन्सुलिनची पातळी सुधारते, त्यामुळे कॅन्सरच्या पेशी वाढण्यापासून रोखले जाते. सक्रिय राहण्यासाठी जिममध्ये जाणे आवश्यक नाही. तुम्ही दररोज ३० मिनिटे जलद चालणे असे व्यायाम करू शकता.

आहारातील बदल

साखर, रिफाइंड पीठ आणि प्रक्रिया केलेले मांस यासारखे काही पदार्थ कॅन्सरचा धोका वाढवतात. संशोधनातून असे दिसून आले आहे की, रंगीबेरंगी फळे आणि भाज्यांमध्ये कॅन्सरशी लढणारे फायटोकेमिकल्स असतात. जास्त फायबरयुक्त आहार कॅन्सरचा धोका कमी करतो. तुमच्या आहारात रंगीबेरंगी फळे आणि भाज्यांचा समावेश करा.

झोपेचा अभाव आणि ताण हे सायलेंट किलर

अपुऱ्या झोपेमुळे कॅन्सरचा धोका वाढू शकतो. गाढ झोप शरीरात मेलाटोनिन, हे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडंट तयार करण्यास मदत करते. तणावामुळ वाढणारे कॉर्टिसॉल रोगप्रिताकारक शक्ती कमकुवत करते. कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी ७ ते ८ तास गाढ झोप घ्या आणि किमान १० मिनिटे ध्यान करा.

स्क्रीनिंग आणि तपासणी

प्रतिबंधापेक्षा लवकर निदान चांगले. निदान होईल या भीतीने लोक अनेकदा चाचण्या टाळतात. जर कॅन्सरचे सुरूवातीच्या टप्प्यात निदान झाले तर उपचार ९० ते १०० टक्के यशस्वी होऊ शकतात. ४० वर्षांनंतर तुमच्या वार्षिक दिनचर्येत मॅमोग्राफी, पॅप स्मीअर आणि नियमित रक्त चाचण्यांचा समावेश करा.

कॅन्सर हा केवळ अनुवांशिक असतो असा एक गैरसमज आहे. मात्र, केवळ ५ ते १० टक्के कॅन्सर अनुवांशिक असतात. उर्वरित ९० टक्के आपल्या सवयी आणि वातावरणावर अवलंबून असतात.