Hemophilia 2026 Symptoms Guide : पडल्यानंतर किंवा किरकोळ दुखापत झाल्यानंतर अनेकदा रक्त साखळून काळं निळं झाल्यासारखं दिसतं, जे काही दिवसांच्या उपचारानंतर ठीकही होते. पण, तुम्ही कधी पाहिलं आहे का की काही लोकांच्या शरीरावर कोणतीही दुखापत झाली नसतानाही असे रक्त साखळल्यासारखे काळे- निळे डाग दिसून येतात. मुख्यत: मांडी किंवा पोटरीवर हे डाग दिसून येतात. कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय वारंवार हे डाग दिसतात, पण कशामुळे त्यामागे नेमकं कारण काय जाणून घेऊ…
डॉ. उर्मी शेठ (सल्लागार क्लिनिकल हेमेटोलॉजिस्ट, इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, पुणे) सांगतात की, तुमच्याही शरीरावर असे काळे निळे डाग दिसत असतील तर हे सामान्य समजून त्याकडे दुर्लक्ष करू नका, हे हिमोफिलियासारख्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते.
हिमोफिलिया म्हणजे काय? आणि त्याची लक्षणं काय आहेत?
हिमोफिलिया ही एक अशी स्थिती आहे, ज्यामध्ये शरीरातील रक्त व्यवस्थित गोठत नाही. हे प्रामुख्याने रक्तामध्ये रक्त गोठवण्यासाठी आवश्यक असलेल्या घटकांच्या कमतरतेमुळे होते.
बहुतेक लोकांना वाटते की, हिमोफिलिया म्हणजे फक्त दुखापतीनंतर रक्त साखळणं, पण ते खरे नाही. विशेषतः मुलांमध्ये आणि तरुण प्रौढांमध्ये खालील प्रमुख लक्षणं दिसून येतात.
१) वारंवार निळे डाग दिसणे : कोणत्याही कारणाशिवाय किंवा अगदी किरकोळ दुखापतीमुळे शरीरावर निळे डाग दिसतात.
२) सांधेदुखी : गुडघे, घोटे आणि कोपरांमध्ये वेदना आणि सूज.
३) दातांच्या उपचारानंतर : दीर्घकाळ रक्तस्त्राव होतो.
४) नाकातून रक्त येणे : वारंवार नाकातून रक्त येणे.
सांध्यांसाठी धोकादायक का आहे?
डॉक्टर सांगतात की, हिमोफिलियामुळे अनेकदा शरीरात विशेषतः सांध्यांमध्ये रक्त साठते. सुरुवातीला याची लक्षणे सौम्य वेदना, ताठरपणा, तो उष्ण जाणवणे किंवा हालचाल करण्यास अडचण या स्वरूपात दिसू शकतात. जर यावर त्वरित उपचार केले नाहीत, तर यामुळे सतत वेदना आणि सांध्यांचे कायमचे नुकसान होऊ शकते, ज्यामुळे कायमस्वरूपी हालचाल करण्याच्या समस्या निर्माण होतात.
शरीरावरील प्रत्येक निळा डाग हिमोफिलियाचे लक्षण असते का?
शरीरावर दिसणारा प्रत्येक निळा डाग हिमोफिलियाचे लक्षण आहे असे मानणे चुकीचे आहे. हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की, शरीरावर निळसर डाग पडणे किंवा सांधेदुखी हे नेहमीच हिमोफिलियाचे लक्षण नसते, याची इतर कारणे असू शकतात, जसे की :
१) प्लेटलेट्सशी संबंधित कोणतीही समस्या
२) शरीरात जीवनसत्त्वांची कमतरता
३) यकृताशी संबंधित आजार
४) वॉन विलेब्रँड रोग
५) काही औषधांचे दुष्परिणाम
६) सांध्याच्या सुजेशी संबंधित इतर आजार
त्यामुळे कोणतीही तपासणी न करता इंटरनेटवर वाचून किंवा लक्षणे पाहून स्वतःहून कोणताही निष्कर्ष काढणे पूर्णपणे चुकीचे आहे.
या आजाराचे अचूक निदान कसे केले जाते?
अचूक निदान करण्यासाठी डॉक्टरांकडून सखोल तपासणी करणे आवश्यक आहे. अचूक निदान करण्यासाठी डॉक्टर खालील गोष्टींचा विचार करतील :
वैद्यकीय आणि कौटुंबिक इतिहास : रुग्णाचे पूर्वीचे आजार आणि कुटुंबातील कोणाला पूर्वी तो आजार झाला होता का, हे जाणून घेणे.
शारीरिक तपासणी : रुग्णाच्या शारीरिक स्थितीची बारकाईने तपासणी.
रक्त चाचण्या : या चाचण्यांमध्ये प्रामुख्याने रक्त गोठण्याची प्रक्रिया आणि रक्त गोठवणारे घटक तपासले जातात, यामुळे डॉक्टरांना हे ठरवण्यास मदत होते की, तुम्हाला फॅक्टर VIII किंवा फॅक्टर IX ची कमतरता आहे का आणि असल्यास ती स्थिती किती गंभीर आहे.
‘या’ गोष्टी ठेवा लक्षात
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाला विनाकारण वारंवार शरीरावर निळे डाग दिसणे, किरकोळ दुखापतीनंतर सांध्यांना सूज येणे, वारंवार नाकातून रक्त येणे किंवा दुखापतीनंतर दीर्घकाळ रक्तस्त्राव होणे यांसारख्या समस्या जाणवत असतील, तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
अशा परिस्थितीत ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. लवकर निदान आणि योग्य उपचाराने, हिमोफिलियावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवता येते, ज्यामुळे रुग्ण सामान्य जीवन जगू शकतो.
