Tea For Mental Health : आपण खातो-पितो त्या गोष्टींचे आपल्या मेंदूवर सकारात्मक आणि नकारात्मक, असे दोन्ही प्रकारचे परिणाम होऊ शकतात. भारतीयांचा विचार केला तर, बहुतांश लोकांची सकाळ चहाशिवाय पूर्ण होत नाही. तसेच जगभरात लोक वेगवेगळ्या पद्धतीनं चहा पितात. तुम्हालाही जेव्हा थकवा किंवा आळस जाणवतो, तेव्हा चहाचा एक कप प्यावासा वाटतो का? चहा आपल्या मेंदू आणि मूडवर कसा प्रभाव टाकतो ते जाणून घेऊया. चॉकलेटप्रमाणेच चहादेखील मनाचा ताण कमी करण्यास मदत करू शकतो का, याविषयी सविस्तर जाणून घेऊ…
आज जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त चहाचा आपल्या मेंदूवर काय परिणाम होतो ते आपण जाणून घेणार आहोत.
मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका
आजही आपल्या समाजात मानसिक आरोग्याला हवे तितके महत्त्व दिले जात नाही. परंतु, यामुळेच बऱ्याच लोकांमध्ये ताणतणाव (Stress) हळूहळू नैराश्यात (Depression) बदलतो. ही स्थिती जीवघेणीदेखील ठरू शकते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO), २०२३ मध्ये जगभरात दर सातपैकी जवळपास एक म्हणजेच सुमारे १.२ अब्ज व्यक्ती मानसिक विकाराने ग्रस्त होत्या. त्यामध्ये चिंता (Anxiety) आणि नैराश्य (Depression) या सर्वांत सामान्य मानसिक समस्या होत्या.
मानसिक आरोग्यासाठी चॉकलेट
उत्तर प्रदेशच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. मीरा पाठक यांच्या मते, मानसिक आरोग्याविषयी बोलताना आपण ताणतणाव, चिंता आणि नैराश्य यांसारख्या परिस्थितींवर चर्चा करतो. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण अशा छोट्या छोट्या गोष्टी शोधतो, ज्यामुळे आपण मानसिकदृष्ट्या ताजेतवाने, शांत आणि आरामदायी अनुभव घेऊ शकू आणि आपले रूटीनही बिघडणार नाही. अशा वेळी खाण्या-पिण्याच्या गोष्टींची भूमिका महत्त्वाची असते. जसे आपण चॉकलेटबद्दल बोललो, तर त्यात साखरेचे प्रमाण असते. जेव्हा एखाद्या पदार्थात गोडवा असतो, तेव्हा तो आपल्या मेंदूमध्ये आनंदाची भावना निर्माण करतो. त्यामुळे आपल्या शरीरात ‘डोपामाइन’ (Dopamine) रिलीज होते, जे एक आनंदी हार्मोन आहे. मात्र, त्यामुळे चॉकलेटची क्रेव्हिंगदेखील वाढते. चॉकलेटमुळे ‘सेरोटोनिन’ (Serotonin)देखील वाढते, तेदेखील एक आनंदी हार्मोन आहे.
चहाबद्दल काय म्हणतात तज्ज्ञ?
तज्ज्ञांच्या मते, याचप्रमाणे जेव्हा आपण चहाचा विचार करतो, तेव्हा त्यात अनेक घटक असतात; जसे की पॉलिफेनॉल्स (Polyphenols), टॅनिन्स (Tannins) व कॅफीन (Caffeine). पॉलिफेनॉल्स आणि टॅनिन्सचे कार्य आपल्या शरीरला बरे करण्याचे असते, तर कॅफीन आपल्या शरीराला अधिक सतर्क (Alert) अनुभवण्यास मदत करते. जेव्हा आपण चहा पितो, तेव्हा त्यात फक्त कॅफीन नसते, तर इतर घटकही असतात. त्यासोबतच याचा अर्थ असाही होतो की, आपण आपल्या व्यग्र दिवसातून एक लहानसा ब्रेक घेऊन आवडता गरम चहाचा कप घेतला आहे. त्यामुळे आपल्याला आनंदी आणि थकवा कमी झाल्याच अनुभव, चहाची अजून एक गोष्ट म्हणजे आपण सहसा तो आपल्या मित्रांसह किंवा जवळच्या लोकांसह बसून पितो. त्यामुळे वैयक्तिक आणि सामाजिक संवाद वाढतो, ज्यामुळे आपल्याला तणावमुक्तीचा (Stress-free) अनुभव मिळतो.
चहाचा मेंदूवर प्रभाव
तुम्हीही चहाचे शौकीन असाल, तर हे जाणून तुम्हाला आनंद होईल की, ‘पबमेड’ (PubMed)मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार, चहा मानसिक आरोग्यासाठी चांगला असतो. हा अभ्यास ४९१ प्रौढांवर (पुरुष: १६९, महिला: ३२२) करण्यात आला होता. त्याच्या निष्कर्षात असे आढळले की, दररोज चार कपपर्यंत कोऱ्या चहाचे सेवन केल्याने ४५०-६५० मिलिग्राम कॅफिन मिळाले, ज्यामुळे नैराश्यापासून बचाव होण्यास मदत होऊ शकते. पण, हे समजून घेण्यासाठी आणखी अधिक संशोधन होण्याची गरज आहे.
अशी चहा पिणे ठरते फायदेशीर
मुख्यतः या अभ्यासात असे सांगण्यात आले आहे की, कोरा चहा (Black Tea) तुमच्या मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. चहामध्ये अनेक अँटिऑक्सिडंट्स आढळतात. आपल्याकडे लोक सहसा साखर आणि दूध घालून चहा पितात; पण त्याचे अति सेवन करण्यामुळे तुमच्या पचनाला नुकसान पोहोचवण्यापासून ते उष्मांक ग्रहण करणे वाढू शकते.
ग्रीन टी आणि मानसिक आरोग्य
कोऱ्या चहाशिवाय ग्रीन टीदेखील तुमच्या मेंदूसाठी खूप फायदेशीर मानला जातो. त्याविषयी केलेल्या अभ्यासातून असे समोर आले आहे की, ज्या लोकांमध्ये नैराश्याची लक्षणे आहेत, त्यांच्यावर ग्रीन टीच्या अर्काचे परिणाम सकारात्मक मिळाले आहेत. एका अभ्यासात असे आढळले की, यामुळे चिंता, नैराश्य व सायकोटिकच्या लक्षणांमध्ये घट होऊ शकते. मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी तुम्ही नियमित ब्लॅक टीव्यतिरिक्त ग्रीन टीचाही आपल्या आहारात समावेश करू शकता.
‘या’ चहाचे सेवनही ठरते फायदेशीर
तणावापासून आराम मिळविण्यासाठी आणि झोप सुधारण्यासाठी ‘कॅमोमाइल टी’ (Chamomile Tea)देखील अत्यंत फायदेशीर मानली जाते. हा एक हर्बल चहा आहे, जो कॅमोमाइलच्या फुलांपासून तयार केला जातो. त्याशिवाय तुळशीचा चहा, अश्वगंधाचा चहा, ब्राह्मी चहा, लेमन बाम चहादेखील आरामदायी वाटण्यास मदत करू शकतात.
