scorecardresearch

आपल्या आवाजाची योग्य काळजी गरजेची

फ्लू, सर्दीपासून दूर राहण्यासाठी स्वच्छता राखा, पुरेशी विश्रांती घेतल्याने आवाज चांगला राहतो.

प्रतिनिधिक छायाचित्र

नवी दिल्ली : दरवर्षी १६ एप्रिलला ‘जागतिक वाचा दिन’ साजरा केला जातो. मानवी वाचा किंवा वाणीचे महत्त्व अधोरेखित करणे आणि त्याविषयी जागृती करणे, हा त्यामागील हेतू आहे. मानवी वाचा ही आपल्या दैनंदिन संवादाचे मोठे साधन आहे. त्याद्वारे भाषा वापरत आपण आपल्या भावना, विचार व्यक्त करतो. अशा या महत्त्वाच्या मानवी आवाजाचे आरोग्य राखण्यासाठी थोडी काळजी घेणे गरजेचे आहे, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे सांगणे आहे.

जर आपला आवाज अचानक बदलत असेल, गायक असल्यास तारसप्तक किंवा वरचे स्वर लावता येत नसतील, घसा अचानक बसत असेल, घशात नेहमी दुखत असेल, तणाव जाणवत असेल, बोलताना कष्ट पडत असतील, सारखे खाकरून बोलावे लागत असेल तर स्वरयंत्राची तपासणी करून घ्यावी. स्वरयंत्राचे विकार विविध प्रकारचे असतात. काही अगदी साध्या उपचारांनी बरे होतात. काही विकारांवर दीर्घ उपचार अथवा शस्त्रक्रिया करावी लागते.

आपल्या आवाजाचे आरोग्य चांगले राहावे यासाठी पुरेशी काळजी घ्यावी. त्यासाठी तज्ज्ञ सांगतात, की नियमित योग्य प्रमाणात पाणी प्यावे, विशेषत: व्यायाम करताना ठरावीक वेळाने पाणी प्यावे. चहा-कॉफी अथवा मद्य घेत असाल तर भरपूर पाणी पिऊन त्याचे संतुलन राखा. कधी कधी दिवसभर मौन राखून स्वरयंत्राला संपूर्ण विश्रांती द्या. आवाजाला आराम द्या. निरोगी दिनचर्या राखा आणि योग्य आहार घ्या. धूम्रपानाने आवाजावर दुष्परिणाम होतो. त्यातील धुरामुळे स्वरयंत्रातील तंतू खराब होतात. त्यांच्या कर्करोगाचाही धोका असतो. नियमित मसालेयुक्त आहार टाळा. त्यामुळे आम्लपित्ताचा त्रास होऊन हे पोटातील आम्ल घशाशी येऊन स्वरयंत्राला इजा पोहोचवू शकते. जीवनसत्त्व अ, ई, क यांचा समावेश असलेले धान्य, फळे आणि भाजीपाल्याचा आहारात समावेश करावा. त्यामुळे घशातील श्लेष्मा (स्निग्धता) कायम राहते. त्यामुळे स्वरयंत्र निरोगी राहण्यास मदत होते.

फ्लू, सर्दीपासून दूर राहण्यासाठी स्वच्छता राखा, पुरेशी विश्रांती घेतल्याने आवाज चांगला राहतो. नियमित व्यायाम आणि प्राणायाम करावा. दीर्घकाळ मोठय़ाने बोलत राहू नका. घसा बसलेला असताना किंवा आवाजाला त्रास होताना बोलणे, गाणे टाळावे. आवाजाचा स्तर सामान्य ठेवावा. सारखे किंचाळत बोलणे किंवा कुजबुजत बोलणे टाळावे.  गाताना किंवा बोलताना श्वसनाचे योग्य तंत्र वापरावे, त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: World read aloud day tips to keep singing voice healthy zws

ताज्या बातम्या