scorecardresearch

थॅलेसेमिया नियंत्रणासाठी लोहयुक्त आहार महत्त्वाचा

रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण योग्य राखण्यासाठी लोह घटकयुक्त आहार घेणे गरजेचे असते.

नवी दिल्ली : ‘थॅलेसेमिया’त रक्तातील हिमोग्लोबिन योग्य प्रमाणापेक्षा कमी असते. त्यामुळे रक्तक्षय (अ‍ॅनिमिया) होतो. त्यामुळे थकवा येतो. या विकाराविषयी व्यापक जागृती व्हावी, यासाठी दरवर्षी ८ मे रोजी जागतिक थॅलेसेमिया दिन साजरा केला जातो. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण योग्य राखण्यासाठी लोह घटकयुक्त आहार घेणे गरजेचे असते.

आहारतज्ज्ञांच्या मते लोहाची मात्रा कमी असल्याने प्रचंड थकवा, दम लागणे, अशक्तपणा, हात-पाय थंड पडणे असा त्रास होतो.

लोहामुळे आपल्या शरीराचा विकास होतो, वाढ होते. लोह ‘न्यूरोट्रान्समीटर’चा सहघटक म्हणूनही काम करते. संप्रेरकांचे (हार्मोन्स) संश्लेषण आणि चयापचय प्रक्रियेतील हा महत्त्वाचा घटक आहे. लोहामुळे ‘हिमोग्लोबिन’चे प्रमाण वाढते. ‘हिमोग्लोबिन’ हे रक्तातील असे प्रथिन आहे, जे फुप्फुसातील प्राणवायू शरीराच्या इतर अवयवांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे काम करते.

भारतात मोठय़ा प्रमाणावर शाकाहारी नागरिक आहेत. त्यामुळे शाकाहाराद्वारे लोहाचे प्रमाण कमी मिळाल्याने लोहाची कमतरता असण्याचे प्रमाण जास्त आहे. शाकाहारात वनस्पती, धान्य, फळांतून लोह मिळते. शाकाहाराद्वारे मिळणारे लोह आपल्या शरीरात योग्यरीत्या शोषले जात नाही. त्यामुळे शाकाहार करणाऱ्यांच्या आहारात लोहयुक्त घटकांचे प्रमाण जास्त असायला हवे. शाकाहारातील लोहघटक आपल्या शरीरात शोषले जाण्यासाठी त्यासह क जीवनसत्त्वयुक्त आहार घ्यावा. धान्य, शेंगदाणे, शेंगा, विविध बीजे, पालेभाज्यांतून लोहघटक मिळतात. मांसाहारातून मुबलक प्रमाणात लोहघटक मिळतात. मटण, चिकन, माशांमधून प्रथिने चांगल्या प्रमाणात मिळतात.

थॅलेसेमियाग्रस्तांना जर रक्त संक्रमित करावे लागत असेल, तर लोहाचे प्रमाण वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे अशा रुग्णांच्या आहाराबाबत तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. लोहाचे योग्य प्रमाण राखण्यासाठी सतत सजग राहावे. ते जास्त प्रमाणात वाढल्यास त्याने शरीरात विषद्रव्ये वाढून आरोग्य बिघडू शकते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: World thalassemia day iron rich diet important for thalassemia control zws

ताज्या बातम्या