Early Signs of Thyroid: आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोक सतत थकवा येणे, वजन अचानक वाढणे किंवा कमी होणे, चिडचिड होणे, केस गळणे यांसारख्या समस्यांकडे सामान्य गोष्ट म्हणून पाहतात. मात्र, हे बदल शरीरात सुरू असलेल्या एका गंभीर समस्येचे संकेत असू शकतात. विशेषतः महिलांमध्ये झपाट्याने वाढणारा ‘थायरॉईड’ हा आज मोठ्या चिंतेचा विषय बनत आहे. आज ‘World Thyroid Day’च्या निमित्ताने थायरॉईड म्हणजे नेमकं काय, त्याची सुरुवातीची लक्षणं कोणती आणि त्यापासून बचावासाठी काय खाल्लं पाहिजे, याविषयी जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं.

थायरॉईड म्हणजे नेमकं काय?

थायरॉईड ही मानेच्या आतल्या बाजूला, कॉलरबोनच्या थोडी वर फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी असते. ही शरीरातील एक महत्त्वाची एंडोक्राइन ग्रंथी मानली जाते. या ग्रंथीतून तयार होणारे हार्मोन्स शरीराचा मेटाबॉलिझम, ऊर्जा, वजन, हृदयाची गती आणि शरीरातील अनेक क्रिया नियंत्रित करतात.

जेव्हा ही ग्रंथी जास्त प्रमाणात किंवा कमी प्रमाणात हार्मोन्स तयार करू लागते, तेव्हा थायरॉईडचा त्रास सुरू होतो. मुख्यतः थायरॉईडचे दोन प्रकार सांगितले जातात – हायपरथायरॉईडीझम आणि हायपोथायरॉईडीझम.

आजच्या काळात खराब जीवनशैली, वाढतं वजन, ताणतणाव, झोपेची कमतरता आणि हार्मोन्समधील असंतुलन यांमुळे थायरॉईडचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे.

सुरुवातीच्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

विशेष म्हणजे अनेक लोकांना थायरॉईड झाल्याचं सुरुवातीला लक्षातच येत नाही. शरीरात काही छोटे बदल होऊ लागतात; पण लोक त्याकडे गांभीर्याने पाहत नाहीत.

  • हात-पाय थरथरणे
  • काही लोकांच्या हातांना किंवा पायांना सतत कंप जाणवतो. शरीरात अस्वस्थता वाढू लागते.
  • केस गळणे आणि केस पातळ होणे
  • अचानक केस गळायला लागणे किंवा केस कमकुवत होणे हेदेखील थायरॉईडचे संकेत मानले जातात.
  • झोप न लागणे
  • रात्रभर झोप न लागणे, सतत जाग येणे किंवा शरीराला पुरेशी विश्रांती न मिळणे यामागेही थायरॉईड कारणीभूत असू शकतो.
  • स्नायूंमध्ये वेदना आणि कमजोरी
  • शरीरात सतत थकवा, स्नायूंमध्ये दुखणे आणि ऊर्जा कमी झाल्यासारखं वाटणं ही सामान्य लक्षणं मानली जातात.
  • चिडचिड आणि घाबरल्यासारखं वाटणं
  • मन सतत अस्थिर राहणे, पटकन राग येणे किंवा घाबरल्यासारखं वाटणं हेही हार्मोन्समधील बदलांमुळे होऊ शकतं.
  • जास्त घाम येणे आणि हृदयाचे ठोके वाढणे
  • थोडं काम केल्यानंतरही घाम येणं किंवा हृदय वेगानं धडधडणं हे शरीर देत असलेले इशारे असू शकतात.
  • भूक वाढणे; पण वजन कमी होणे
  • काही लोकांना सतत भूक लागते; पण तरीही वजन कमी होतं. हे थायरॉईडचं महत्त्वाचं लक्षण मानलं जातं.
  • महिलांमध्ये मासिक पाळी अनियमित होणे
  • महिलांमध्ये पीरियड्स अनियमित होणे, जास्त किंवा कमी रक्तस्राव होणे यामागेही थायरॉईड असू शकतो.

थायरॉईडमध्ये आहाराची भूमिका किती महत्त्वाची?

तज्ज्ञांच्या मते, योग्य आहार घेतल्यास थायरॉईड नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.

  • मासे खाणे फायदेशीर

माशांमध्ये आयोडीन मोठ्या प्रमाणात आढळते. विशेषतः समुद्री माशांमध्ये आयोडीन जास्त असतं, जे थायरॉईडसाठी उपयुक्त मानलं जातं.

  • दूध आणि दुग्धजन्य पदार्थ

दूध, दही, पनीर यांसारख्या पदार्थांमध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन्स व मिनरल्स भरपूर असतात. त्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळण्यास मदत होते.

  • ज्येष्ठमध (मुलेठी)

ज्येष्ठमधामध्ये काही पोषक घटक आढळतात, जे थकवा आणि कमजोरी कमी करण्यास मदत करू शकतात.

  • आयोडीनयुक्त पदार्थ

थायरॉईडच्या रुग्णांसाठी आयोडीनयुक्त आहार महत्त्वाचा मानला जातो. मात्र, याचं प्रमाण संतुलित ठेवणं आवश्यक असतं.

  • सोया पदार्थ

सोया मिल्क, टोफू आणि सोयाबीनपासून बनवलेले पदार्थ काही लोकांसाठी उपयुक्त ठरू शकतात. हे हार्मोन्स संतुलित ठेवण्यास मदत करू शकतात, असं मानलं जातं.

वेळेत काळजी घेणं का गरजेचं?

थायरॉईड हा असा आजार आहे, जो सुरुवातीला साधा वाटू शकतो; पण दुर्लक्ष केल्यास शरीरावर मोठा परिणाम करू शकतो. त्यामुळे शरीरात दिसणारे छोटे बदलही गांभीर्याने घेणं गरजेचं आहे.

विशेषतः महिलांनी नियमित तपासणी, संतुलित आहार, व्यायाम आणि योग्य जीवनशैली याकडे लक्ष दिल्यास थायरॉईडसारख्या समस्यांपासून स्वतःचं संरक्षण करण्यास मदत होऊ शकते.